विघ्नमालिकांच्या गर्तेत मुंबई-गोवा महामार्ग

    10-Sep-2024   
Total Views |
mumbai goa highway roads


सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई-गोवा महामार्गावरुन गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूककोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावरील रस्त्यांची अपूर्ण कामे, खड्डे आणि एकूणच अपुर्‍या सोयीसुविधांमुळे हा प्रवास नकोसा ठरला. त्यानिमित्ताने विघ्नमालिकांचे ग्रहण लागलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती, यासंबंधी न्यायालयीन लढाई यांचा आढावा घेणारा हा लेख...

मुंबई-गोवा महामार्गावरील अलिबाग जंक्शनजवळील सर्व्हिस रोड अरुंद असल्याने नेहमीच वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो. खेडनंतरच्या भोष्टेघाटामध्ये धक्कादायक वळणांमुळे गंभीर अपघातांचा धोका कायम राहतो. डोलवी गाव व रेल्वे क्रॉसिंग या ठिकाणी अंडरपासचा वापर अवघड असून उड्डाणपुलाची गरज व्यक्त होत आहे. जगबुडी नदीवरील पुलाला जोडणारा मार्गही अपघातांना कारणीभूत ठरलेला दिसतो. वसिष्ठी नदीवरील नव्या पुलाचे कामही ठप्प झाले आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून मात्र प्रवाशांच्या संकटांकडे दुर्लक्ष झालेले दिसते. महामार्गाची योग्य देखभाल होत नसतानाच, काही भागांत टोलवसुली होत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.


मुंबई ते गोवा अवघ्या सहा तासांत; पण कोकण द्रुतगती मार्गावरून

मुंबई-गोवा मार्ग सुकर व अतिवेगवान करण्यासाठी 388 किमी लांबीचा नवीन कोकण द्रुतगती मार्ग बांधण्याचे सरकारकडून नियोजन सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम दहा वर्षे झाली तरी पूर्ण झाले नसतानाही, राज्य सरकारने मुंबई-वरळी मार्गाने ‘सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती एक्सप्रेस’ मार्गाच्या कामाची घोषणा केली आहे. दि. 6 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयाद्वारे हा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्याला रु. 70 हजार कोटी खर्च येणार असल्याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांत झळकले होते. या मार्गावर एकूण 41 बोगदे, 41 मोठे पूल, 49 छोटे पूल, तीन रेल्वेवर पूल, 51 व्हायाडक्ट, 20 भुयारी मार्ग अशी बांधकामे असणार आहेत.
या मुद्द्यांवर न्यायालयाने संताप व्यक्त करून राज्य सरकारला धारेवर धरले आणि न्यायालयाने मुंबई-गोवा मार्गाचे काम पुरे होईपर्यंत अन्य विकास प्रकल्प करण्यास परवानगी देणार नसल्याचा इशारा दिलादेखील आहे.


मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जनआंदोलन


मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन पुकारलेल्या मंडळींनी काही सूचना केल्या. त्या पुढीलप्रमाणे-
एका वर्षात दर्जेदार व खड्डेमुक्त महामार्ग तयार करावा. संपूर्ण काम झाल्याशिवाय टोल आकारु नये.

शाळा व गावाच्या ठिकाणी अंडरपासची व्यवस्था असावी. महामार्गाच्या कामासाठी डोंगर न पोखरता नदीचा गाळ वापरण्यात यावा.


गणेशभक्तांसाठी यंदाही कोकणची वाट खडतर

गेली 12 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे आणि ते काम आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नाही. पळस्पे ते इंदापूर पाठोपाठ आता इंदापूर ते झाराप या टप्प्यातील कामही रखडले आहे. पेण ते इंदापूर या टप्प्यातील काम दयनीय अवस्थेत आहे. इंदापूर ते महाडपर्यंतचा रस्तादेखील खराब आहे. वडखळ ते गडब, नागोठणे ते कोलाड, इंदापूर ते माणगाव, टोळ ते महाड आणि महाड ते पोलादपूर यांदरम्यान परिस्थिती बिकट आहे.

बांधकामाच्या अयोग्य नियोजनामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणे कठीण जाते. पेणसह अनेक आजूबाजूंच्या गावांना पुराचा धोका संभवतो. याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारने कोकण विभागाला दिले आहेत. या कामाची यावर्षीकरिता फेर-तपासणी घेणे आवश्यक आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा खरोखर कोकणवासीयांचा (रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे) महत्त्वाचा मार्ग समजला जातो. कोकणवासीयांकरिता सरकारने हे काम लवकर व चांगल्या दर्जाचे करून त्यांची असुरक्षिततेची भीती दूर करायला हवी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महामार्गाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. त्यांनी आश्वासन दिले की, दि. 3 सप्टेंबर रोजीपूर्वी सर्व खड्डे बुजविले जातील. या महामार्गावर मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश या दौर्‍यात त्यांनी दिले होते. खड्डे बुजविण्यासंबंधीची आश्वासने पुरी झाली की नाही, हे जनआक्रोश समितीच्या सदस्यांनी पाहिले व त्यांना खड्ड्यांसंबंधी समाधान मिळाले. परंतु, समितीच्या सदस्यांनी महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे.


कोकणासाठी 500 कोटी

‘शासन आपल्यादारी’ कार्यक्रमातून आतापर्यंत 2 कोटी, 1 लाख, 91 हजार, 803 लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. 26 लाख लाभार्थींना 1 हजार, 700 कोटींचा लाभ रायगड जिल्ह्यात दिला आहे. विकास प्राधिकरणासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. कोकणच्या विकासासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही ,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2024 च्या अखेरीस पूर्ण होणार!

या महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. पर्यायी कंत्राटदार आवश्यकतेनुसार नेमले गेले आहेत. या महामार्गावरची सर्व कामे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केली जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या टप्प्याचे काम हे महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. पनवेल ते कासू या टप्प्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून, कासू ते इंदापूर मार्गावरील काम 72 टक्के पूर्ण झाले असून त्या मार्गावर सेवा रस्ते व भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.


अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.