घोसाळगडावर गिधाडांचे दर्शन;फणसाडमधील गिधाड संवर्धनाच्या आशा उंचावल्या

    01-Sep-2024   
Total Views |
vultures in ghosalgad



मुंबई (अक्षय मांडवकर) -
रोहा तालुक्यातील घोसाळगडावर शुक्रवारी सायंकाळी गिधाडांचे दर्शन झाले (vultures in ghosalgad). गिधाडाच्या दोन संकटग्रस्त प्रजातींची नोंद यावेळी पक्षीनिरीक्षकांनी केली (vultures in ghosalgad). घोसाळगडावरील गिधाडांच्या दर्शनाने फणसाडमध्ये सुरू असलेल्या गिधाड संवर्धनाच्या आशा उंचावल्या आहेत. (vultures in ghosalgad)
 
 
महाराष्ट्रात गिधाडांच्या वीण वसाहती या फार मोजक्या ठिकाणी उरल्या आहेत. कोकणात केवळ रायगड जिल्ह्यात आपल्याला गिधाडांच्या वीण वसाहती पाहायला मिळतात. जिल्ह्यातील रोहा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पक्षीनिरीक्षक रोशन म्हात्रे यांना गिधाडांचे दर्शन झाले. गडाच्या परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलो असतो, पांढऱ्या पुठ्ठ्याची आणि लांब चोचीचे गिधाडे दिसली यातील एका गिधाडाने गडावरील झाडावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाडावर बसलेल्या माकडांनी त्याला हुसकावून लावल्याची माहिती म्हात्रे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.

 
 
रायगड जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागात लांब चोचीचे गिधाड आणि पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड अशा दोन प्रजातींच्या वीणवसाहती आहेत. श्रीवर्धन आणि म्हसळा याठिकाणी पांढऱ्या पुठ्ठयाच्या गिधाडाची वीण वसाहत असून रायगड, नाणेमाची, सुधागड-पाली याठिकाणी लांब चोचीच्या गिधाडांच्या वीण वसाहती आहेत. गेल्या वर्षी महाडच्या सिस्केप या संस्थेने घोसाळगड परिसरातून लांब चोचीच्या गिधाडाच्या घरट्यांची नोंदही केली आहे.
 
फणसाडच्या आशा उंचावल्या
घोसाळगडावर झालेल्या गिधाडांच्या दर्शनामुळे फणसाड वन्यजीव अभायरण्यात सुरू असणाऱ्या गिधाड संवर्धन प्रकल्पाच्या आशा उंचावल्या आहेत. घोसाळगडापासून काही किलोमीटर हवाई अंतरावर फणसाड अभयारण्य आहे. अभयारण्यात सध्या 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट' व एस बी आय फाऊंडेशन CONSERW प्रकल्पाअंतर्गत आणि वन विभाग, ठाणे (वन्यजीव) यांच्या सहयोगाने  गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू आहे. याअंतर्गत गिधाड उपहारगृहाच्या माध्यमातून याठिकाणी गिधाडांचा वावर पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. उपहारगृहात मृत जनावरांची कलेवर टाकण्यासाठी 'ग्रीन वर्क ट्रस्ट'ने २१७ ग्रामपंचायतींसोबत समन्वय साधला आहे. मे महिन्यापासून आम्ही उपहारगृहात गिधाडांसाठी नऊ कलेवर टाकले असून मृत गुरांच्या शरीरात आढळणारा प्लास्टिकचा कचरा ही आमच्यासमोरील मोठी समस्या असल्याची माहिती ट्रस्टचे निखिल भोपळे यांनी दिली. पोटात प्लास्टिकचा कचरा असणारे गुरांचे कलेवर आम्ही गिधाडांना खाण्यासाठी टाकत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागासोबत आम्ही मृत गुरांच्या उपलब्धतेविषयी चर्चा केली असून ते देखील या कामात सहभागी होणार असल्याचे भोपळे यांनी सांगितले.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.