चिनी सांस्कृतिक मंत्रालयाने ’उलान मुगीर’ पथकांना पुनरुज्जीवित केले आहे. ही पथके पुन्हा ‘इनर मंगोलिया’त गावगन्ना फिरून करमणूक आणि पक्ष प्रचार करत आहेत. याला ते ‘सर्वसामान्य लोकांची सेवा’ असे नाव देतात.
कृत्रिम हिरवळ किंवा ‘अॅस्ट्रोटर्फ’ या प्रकाराचा शोध 1965 साली युरोपात लागला. पावसामुळे खेळाची मैदाने ओली होतात. त्यातून खेळाची गती मंदावणे, सामने पूर्णपणे रद्दच करावे लागणे, खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होणे, खेळाडू जखमी होणे अशा अनेक समस्या उद्भवत असत. कृत्रिम हिरवळ हा या सगळ्यावरचा उत्तम उपाय ठरला. जमिनीवर एखादा गालिचा अंथरावा, तशी ही कृत्रिम हिरवळ सहजतेने अंथरता येते. त्यामुळे बघता-बघता जगभर सर्वत्र सर्व खेळांमध्ये कृत्रिम हिरवळीचा वापर सर्रास झाला.
अमेरिकन राजकीय परिभाषेत मात्र कृत्रिम हिरवळ किंवा ‘अॅस्ट्रोटर्फ’ या शब्दाला वेगळा अर्थ आहे. एखाद्यारव्यक्तीविरुद्ध, पक्षाविरुद्ध, कंपनीविरुद्ध किंवा बाजूनेदेखील लोकमत मुळापासून उभे करणे. म्हणजे, समजा एखाद्याचा राजकीय जीवनातून निःपात करायचा आहे, तर त्याच्याविरोधात समाजाच्या अगदी मुळापासून खोटे प्रतिकूल लोकमत तयार करणेे किंवा तसे लोकमत उभे राहिले आहे, असा आभास निर्माण करणे. याच्या उलट, जो आज कुणीही नाही त्याला अनुकूल असे लोकमत मुळापासून उभे करणे किंवा तसे ते उभे राहिले आहे, असा आभास निर्माण करणे. या ‘अॅस्ट्रोटर्फिंग’करिता राजकीय पक्ष आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या अधिकृतपणे अर्थसाहाय्य करतात. म्हणजे असे करणे अमेरिकेत अधिकृत आहे. सध्या आपल्याकडे यासाठी ‘नॅरेटिव्ह सेटिंग’ हा जास्त प्रचलित शब्द आहे.जशी लेनिनने 1917 साली रशियात साम्यवादी क्रांती घडवून सत्ता हडपली, तशीच 1949 साली माओ झेडाँगने (जुना उच्चार-माओ त्से तुंग) चीनमध्ये राज्यक्रांती घडवली आणि साम्यवादी सरकार स्थापन केले.
शोषित, वंचित शेतकर्यांचे राज्य असल्याचा उद्घोष करीत सतेवर आलेले माओ आणि त्याचे सहकारी ही लेनिन-स्टालिनचीच चिनी आवृत्ती होती. ते युरोपीय लोकशाही देशांइतकेच साम्राज्यवादी होते. दुसर्या महायुद्धापूर्वी जपानने चीनकडून जिंकून घेतलेला मांचुरिया हा प्रदेश तर त्यांनी घेतलाच, पण चीन आणि त्याच्या उत्तरेकडचा देश जो मंगोलिया, यांच्या दरम्यानचा ’इनर मंगोलिया’ नावाचा प्रदेशही त्यांनी घेऊन टाकला. जसा भारताचा तिबेट गिळंकृत केला तसाच. म्हणजे आजचा जो मंगोलिया नावाचा स्वतंत्र देश आहे, ’मुळात ’आऊटर मंगोलिया’ आहे आणि ’इनर मंगोलिया’ हा चीन देशाचा एक मोठा प्रांत आहे. गंमत अशी आहे की ’इनर मंगोलिया’ या चीनच्या ताब्यातल्या प्रांतात सुमारे 40 लाख मंगोलवंशीय लोक राहतात, तर मंगोलिया या त्यांच्या मूळ देशाची एकंदर लोकसंख्याच सुमारे 35 लाख एवढी आहे नि त्यातले निम्मे लोक उलान बटोर या राजधानीच्या शहरातच राहतात. कारण, मंगोलियाची भूमी मैलोन्मैल पसरलेली गवताळ स्टेप्स मैदाने, गोबीचे विस्तीर्ण वाळवंट आणि अल्ताई पर्वताच्या दुर्गम रांगा यांनी बनलेली आहे. या भूमीत गवताळ जमिनीवर गुरांचे कळप घेऊन फिरणारे गुराखी, भटके टोळीवाले हेच इथले रहिवासी होते.
पुढची गोष्ट तर आणखीनच गमतीदार किंवा विस्मयकारक आहे. या मंगोलियाचा राष्ट्रपुरुष जो चंगेझखान त्याचे थडगे मंगोलियात नसून ‘इनर मंगोलिया’त म्हणजेच चीनमध्ये आहे. ‘खान’ हा शब्द आज मुसलमानी मानला जातो, पण मुळात तो अरबी, तुर्की, फारसी यांपैकी काहीच नसून मंगोली-चिनी आहे. याचा अर्थ आहे नायक किंवा नेता. चंगेझखान मुसलमान नव्हता. 13व्या शतकात चंगेझने मंगोलांच्या टोळ्यांना एकत्र करून एकाबाजूला थेट युरोपपर्यंत धडक मारली, तर दुसरीकडे, चीन देश जिंकला, चंगेझने जिंकलेल्या मुसलमानांना सरळ ‘गुलाम’ असे संबोधले आणि त्यांना हलाल मांस खायला नि सुंता करायला सक्त मनाई केली. पुढे चंगेझचा नातू बर्की याने एका दरवेशाच्या नादाने इस्लाम स्वीकारला. चंगेझचा दुसरा नातू कुब्लाई याने चीनची राजधानी बीजिंग (जुने नाव पेकिंग) इथून स्वतःचे युआन साम्राज्य चालवले.
कदाचित म्हणूनच आज चीनला चंगेझची कबर असणारा ‘इनर मंगोलिया’ आपल्या ताब्यात ठेवण्यात आणि तिथल्या 40 लाख मंगोलांवर राज्य करण्यात सूडाचे समाधान मिळत असेल. ते कसेही असो. माओ झेडाँग याने साम्यवादाच्या नावाखाली व्यवस्थित साम्राज्यवाद जोपासून अनेक प्रदेश हडपले. भारताचे कविहृदयी पंतप्रधान पंडित नेहरू यांना माओ आणि त्याचा पंतप्रधान चाऊ एन् लाय यांनी गोड-गोड बोलून बेसावध ठेवले आणि 1962 साली अचानक आक्रमण करून भारताचा तब्बल 40 हजार चौरस कि.मी. प्रदेश घेऊन टाकला. हा दणका इतका जबरदस्त होता की, या धक्क्याने पंडित नेहरू मरण पावले. ‘इनर मंगोलिया’ प्रांतातल्या गुराखी मंगोलांनी माओविरुद्ध बंड पुकारले. का एक तर त्याने जाहीर केले की, तुमचे गुरांचे प्रचंड कळप ही तुमची व्यक्तिगत मालमत्ता नसून देशाची सामुदायिक मालमत्ता आहे. तुम्ही पूर्वीप्रमाणेच गुरांना चारा-पाणी करायचे, निगा-निगराणी करायची, दूध काढायचे, मेल्यानंतर चामडी कानडी काढून कमवायची. पण, या सगळ्यातून निर्माण होणारी संपत्ती देशाच्या खजिन्यात जमा होईल. तुम्हाला फक्त कर्मचार्यांप्रमाणे ठराविक पगार दिला जाईल. 1922-23 साली लेनिनने रशियात शेतीचे अगदी असेच ’सामुदायिकीकरण’ केले होते. याच्याविरुद्ध बंड केलेल्या रशियन शेतकर्यांना लेनिनने गोळ्या घातल्या. कष्टकर्यांच्या राज्यातली श्रमिकांची ही कत्तल 1924 साली सुखरूप पार पडली होती. माओने तोच कित्ता गिरवला. 1955-56 साली असंख्य मंगोलांना माओच्या ’रेड गार्ड्स’नी गोळ्या घातल्या.
या हत्याकांडाचा नव्या पिढीला विसर पडावा आणि नव्या मंगोल तरुणांनी साम्यवादी तत्वज्ञान आत्मसात करावे म्हणून माओच्या सांस्कृतिक सल्लागारांनी एक वेगळीच कल्पना काढली. शहरांपेक्षा नगरांमध्ये, नगरांपेक्षा छोट्या गावांमध्ये, बसत्या. वाड्यांमध्ये, शेतांवर, मळ्यांवर, गुरांच्या चरण्याच्या कुरणांवर जाऊन सांस्कृतिक कार्यक्रम करणारे छोटे-छोटे गट यांनी निर्माण केले. यांचे नाव ’उलान मुगीर’ म्हणजे ’लाल कन्या’. 1957 सालापासून हे छोटे कलावंत गट ‘इनर मंगोलिया’ प्रांतात सर्वत्र फिरू लागले. समोर प्रेक्षक शंभर असोत वा दहा असोत, हे कलाकार त्या ग्रामीण प्रेक्षकांसमोर गाणी-बजावणी, छोटी नाटुकली - स्किट्स्, पथनाट्ये सादर करायचे. या सगळ्यांमधून माओ आणि चिनी साम्यवादी पक्षाची ध्येयधोरणे, तत्वज्ञान हेच कसे सर्वश्रेष्ठ, कल्याणकारक आहे याचा उदोउदो केलेला असायचा.
गीत, संगीत, काव्य, नाटके यांद्वारे विचारांचा, संस्कृतीचा प्रचार-प्रसार हा विषय अगदी प्राचीन काळापासून जगभर अस्तित्वात असावा. आपला भारत देश तर याबाबतीत अतिसमृद्ध आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर वासुदेव, गोंधळी, भराडी, डोंबारी, बाळसंतोष, पिंगळा, कथाकथन, प्रवचनकार, पुराणिक, कीर्तनकार इत्यादी मंडळींनी शतकानुशतके समाजाचे मनोरंजन आणि वैचारिक उद्बोधन केलेले दिसते. रामायण, महाभारत, पुराणे यांच्यामधल्या कथा आणि या कथांमधली चिरंतन मानवी मूल्ये यांचे समाजातले भरण-पोषण गेली कित्येक शतके याच सर्व मंडळींनी केलेले आहे. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण संत एकनाथांचे आहे. मुसलमान सुलतानांच्या असा वरवंट्याखाली मराठी-हिंदू समाज भरडून निघत असताना नाथांनी या लोककलांच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे-ठेवण्याचे फार मौल्यवान काम केलेले आहे. भारूड हा एक विशिष्ट काव्यप्रकार आहे. नाथांनी रचलेली तीनशे भारूडे उपलब्ध आहेत नि त्यातून त्यांनी किमान सव्वाशे वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत.
लोककाव्यातून प्रबोधनाप्रमाणेच करमणूक करणे म्हणजेच तमाशा- उत्तर पेशवाईत हा तमाशा अधिकाधिक लोकप्रिय आणि महा सवंग, वाह्यात बनला. भारताबाहेर युरोपमध्ये आणि मग अमेरिकेत भटक्या जिप्सी लोकांनी ही परंपरा कायम ठेवली. हे जिप्सी लोक छोट्या-छोट्या तंबूमध्ये राहायचे. बैलगाड्या घेऊन वस्त्या वाड्या-शेते-मळे अशा ठिकाणी फिरायचे नि नाच-गाणी-गोष्टी नाटुकली यांतून ग्रामीण प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे. बदल्यात शेतकरी त्यांना धान्य द्यायचे. ते पदरात पडले की, भटके जिप्सी चालले पुढच्या मुक्कामाला. गंमत म्हणजे हे जिप्सी लोक म्हणतात की, आम्ही मूळचे भारतातले आहोत.
युरोपप्रमाणेच चीनमध्येसुद्धा असे भटके जिप्सी, तमासगीर होते का? माहीत नाही. पण, माओच्या सांस्कृतिक खात्याने मंगोल नवतरुणांना साम्यवादी विचारांचे पाईक बनवण्यासाठी 1957 सालापासून ही ’उलान मुगीर’ प्रचार मोहीम सुरु केली. मंगोलांनी कळी असतानाच लाल रंगात रंगावे, म्हणजे कळ्यांची फुले आपसूकच लाल होतील, असा या नावामागचा विचार असावा.
1976 साली माओ मेला, तेव्हा चीनचा आर्थिक बोजवारा उडण्याच्या बेतात होता. 1978 साली सत्तेवर आलेल्या डेंग झियाओ पिंग याने साम्यवाद नावापुरता ठेवून बेधडक भांडवलवाद स्वीकारला आणि चीनला आर्थिक स्थैर्य दिले. हे करत असताना तो सांगायचा, ’आमचे तत्वज्ञान समाजवाद हेच आहे, फक्त ते चीनच्या आपल्या वैशिष्ट्यांसह आहे.’ यालाच पुढे ‘डेंग झियाओ पिंग सिद्धांत’ असे म्हटले जाऊ लागते.
चीनचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा राजकीय उत्कर्ष 2012 साली सुरु झाला. 2017 सालच्या साम्यवादी पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी असे विचार मांडले की, ’आम्ही समाजवादाची अगदी मूलभूत मूल्ये जगून दाखवली पाहिजेत. मार्क्सवाद-लेनिनवाद हे सगळे त्यातच येतात. लोकांचे जीवनमान वाढवणे आणि त्यांचे कल्याण करणे हा आमच्या विकासकामांचा अग्रक्रम असला पाहिजे.’
हे होणे थांबले आहे. कारण, आमच्या पक्षाचा, पक्ष कार्यकर्त्यांचा अगदी सर्वसामान्य लोकांशी-ग्रासरूट पातळीवरील जनतेशी संपर्कच उरलेला नाही. तो वाढवला पाहिजे, जनतेमध्ये पुन्हा एकदा ही समाजवादी-साम्यवादी मूल्ये प्रस्थापित केली पाहिजेत.’ अलीकडे या राजकीय विचाराला ’शी जिनपिंग थॉट’ असे म्हटले जाऊ लागले आहे.
तर या प्रेरणेमुळे चिनी सांस्कृतिक मंत्रालयाने ’उलान मुगीर’ पथकांना पुनरुज्जीवित केले आहे. ही पथके पुन्हा ‘इनर मंगोलिया’त गावगन्ना फिरून करमणूक आणि पक्ष प्रचार करत आहेत. याला ते ‘सर्वसामान्य लोकांची सेवा’ असे नाव देतात.
आता यावर या सर्वसामान्य मंगोल गुराख्यांची काय प्रतिक्रिया आहे? ‘इनर मंगोलिया’त एका ‘उलान मुगीर’ कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पाश्चात्य वार्ताहराशी बोलताना एक मंगोल गुराखी म्हणाला, ’लोकांची सेवा? तुमच्या आवशीचो घो!’ प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.