आम्ही आरक्षण दिलं पण जरांगेंना समाधान नाही, त्यांच्या अपेक्षा जास्त!
रावसाहेब दानवेंचं विधान
07-Aug-2024
Total Views | 153
जालना : आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पण मनोज जरांगेंचं समाधान होत नाही. त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केले आहे. तसेच मनोज जरांगेंनी खुशाल २८८ जागांवर उमेदवार उभे करावे, असेही ते म्हणाले.
रावसाहेब दानवे म्हणाले की, "आम्हाला कायद्याच्या चौकटीत बसवून जसं आरक्षण देता येत होतं तसं आम्ही दिलं. पण यावर मनोज जरांगेंना समाधान नाही. त्यांना यापेक्षा काहीतरी जास्त लागतं आणि ते मागण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आता जो कुणी निवडून येईल त्यांनी फक्त एकच मागणी करावी. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहोत, असं सांगावं आणि त्यांनी जाहीरनाम्यात टाकावं," असे ते म्हणाले.
मनोज जरांगेंनी विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. याबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, "जरांगेंनी खुशाल २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत. त्यांना तो अधिकार आहे. उमेदवार उभे करु नका असं कुणीही म्हणू शकत नाही," असेही ते म्हणाले.