नाशिक : पूर ओसरला,परिस्थिती पूर्वपदावर...

गंगापूर धरण 86.94 शेती कामांना वेग

    07-Aug-2024
Total Views |

Nashik
 
नाशिक: दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत उसंत घेतली आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बहुसंख्य धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आला आहे. दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाल्यानंतर मंगळवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पावसाने विश्रांती घेतली.
 
शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 86 टक्के भरले असून भोजापूर, भावली, वालदेवी, हरणबारी व केळझर ही धरणे 100 टक्के भरली आहेत. पावसाने केलेल्या कृपादृष्टीमुळे विभागातील धरणांमधील जलसाठा 61.62 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी ही आकडेवारी 60.52 टक्के इतकी होती.
 
त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात असलेल्या 24 लहान-मोठ्या धरणांचा एकूण जलसाठा 65 हजार, 664 दलघफु पैकी 40 हजार, 460 दलघफु जलसाठा निर्माण झाला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात सध्या 86.94 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जून व जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला.
 
त्यामुळे धरणांतील जलसाठ्याची परिस्थिती दयनीय होती. बहुतांश प्रकल्पांमध्ये शून्य ते दहा टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शुक्रवार, दि. 2 ऑगस्टपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने चार दिवसांमध्ये धरणांमधून विसर्ग करावा लागला.
 
मशागतीच्या कामांची लगबग
पहिल्या पावसातच जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीपाची पेरणी केली. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिके वाचवण्याचा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा राहिला. त्याचप्रमाणे मशागतीची कामेदेखील खोळंबली होती. दोन दिवस पाऊस कोसळल्यानंतर सोमवार, दि. 5 ऑगस्टपासून ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून मशागतीच्या कामांची लगबग वाढली असून पिकांची खुरपणी व कोळपणीला वेग आला आहे.
 
गोदावरीचा जलस्तर घटला
घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे रविवार, दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झाली होती. दुपारच्या वेळी गंगा घाटावरील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात झाली होती. त्यात रात्री 8 वाजता वाढ करुन आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाऊस थांबल्याने हा विसर्ग टप्याटप्याने कमी करण्यात आला असला, तरी अजूनही 470 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
 
द्राक्षपंढरीत जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील द्राक्षपंढरीतील शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या पालखेड धरणसमूहात आश्वासक जलसाठा सध्या उपलब्ध झाला आहे. या समूहाची एकूण साठवणक्षमता 3 हजार, 208 दलघफु इतकी असून यंदा समूहात 1 हजार, 358 दलघफु म्हणजेच 42.33 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी या दिवसांत 37.53 टक्के म्हणजेच फक्त 1 हजार, 204 दलघफु इतकाच जलसाठा उपलब्ध होता. अजून दीड ते पावणेदोन महिने पावसाळा शिल्लक असल्याने यंदा द्राक्षबागादेखील जोमदारपणे फुलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
कोणत्या धरणातून किती विसर्ग?
गंगापूर : 470
पुणेगाव : 890
पालखेड : 723
दारणा : 5,356
भावली : 588
वालदेवी :183
नांदूरमध्यमेश्वर:15,775
भोजापूर:539
हरणबारी:2,104
केळझर:1,364
 
सद्यस्थितीत धरणांमधील उपयुक्त जलसाठा (टक्क्यांमध्ये)
गंगापूर :86.94
काश्यपी:54.32
गौतमी गोदावरी:90.36
आळंदी:81.37
पालखेड:65.54
करंजवण:57.92
वाघाड :77.11
ओझरखेड:38.50
पुणेगाव:76.08
तिसगाव:14.07
दारणा :85.93
भावली:100
मुकणे :54.03
वालदेवी:100
कडवा:80.98
नांदूरमध्यमेश्वर:54.47
भोजापूर:100
चणकापूर:73.01
हरणबारी:100
केळझर:100
नागासाक्या:00
गिरणा:37.20
पुनद:50.08
माणिकपुंज:00