बांगलादेशच्या आंदोलनात हिंदूंचे बळी का? - Exclusive Interview

    07-Aug-2024   
Total Views |

Hindu under Attack


बांगलादेशातील अस्थिरता आणि अमेरिकेचा स्वार्थ हिंदू अत्याचाराची बांगलादेशात परंपराच
 
 
बांगलादेशातील सत्ताबदलाने आशिया खंडात पुन्हा अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील अस्थिरता, हिंदूंवर होणारे अत्याचार, सरकार उलथविण्यात अमेरिकेचा संभाव्य हात, शेख हसीना आणि बांगलादेशचे भवितव्य याविषयी वरिष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आदित्य राज कौल यांच्याशी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’चे दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी साधलेला विशेष संवाद.

 
प्रश्न १ – बांगलादेशातील सद्यस्थितीकडे आपण कसे पाहता ?
 
- बांगलादेशातील स्थिती पूर्णपणे अस्थिर आहे. परिस्थिती स्थिर होण्यास लागणारा कालावधी सांगणे आज अवघड आहे. गेल्या काही आठवड्यातील घडामोडी पाहता जमात ए इस्लामी, बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी (बीएनपी) यांनी विद्यार्थ्यांची चळवळ ताब्यात घेऊन त्यास कट्टरतावादी वळण दिले आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेत्यांना देशातील वेगवेगळ्या ठिकाणी ठार करण्यात आले आहे. हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदीया समुदायातील लोकांनाही निवडून ठार केले जात आहे. बांगलादेश पोलिस, बांगलादेशचे लष्कर आणि निमलष्करी दले हा हिंसाचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

प्रश्न २ – आरक्षणविरोधी आंदोलनास वेगळे वळण लागण्याचे कारण काय ?

- विद्यार्थ्यांनी आरक्षणाविरोधात सुरू केलेल्या आंदोलनात बीएनपी आणि जमात ए इस्लामी घुसले आणि त्यांनी या आंदोलनास प्रथम राजकीय आणि त्यानंतर कट्टरतावादी वळण दिले. अर्थात, यामध्ये शेख हसीना यांच्याकडूनही भरपूर चुका झाल्या आहेत. त्यांनी दीर्घकाळपर्यंत पोलिस आणि प्रशासनाचा गैरवापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परिणामी देशात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. बीएनपी आणि जमात ए इस्लामीने याचा फायदा घेतला आणि बांगलादेशात अराजकता निर्माण केली.

प्रश्न ३ - बांगलादेशातील अस्थिरतेमध्ये परकीय शक्तींचा हात असेल का ?

- बांगलादेशातील अस्थिरतेमागे परकीय शक्तींचा हात असल्याचे मानण्यात जागा आहे. अनेक दिवसांपासून यामागे पाकिस्तान, चीन किंवा अमेरिका असल्याचेही मानले जाते. मात्र, यामध्ये अमेरिकेचाच हात असल्याची सर्वाधिक शक्यता आपल्याला वाटते. अमेरिकेच्या सीएआयएने यापूर्वीही अनेक देशांमध्ये सत्तांतरे घडविली आहेत. बांगलादेशात आपला एक हवाईतळ असावा, असे अमेरिकेचे मनसुबे अनेक दशकांपासून आहेत. बांगलादेशच्या भूराजकीय स्थानामुळे येथील हवाईतळावरून चीनला काबूत ठेवणे अमेरिकेला शक्य आहे. शेख हसीना यांनी अमेरिकेची ही विनंती नाकारली. त्यानंतर त्यांच्या अनेकदा दबावही टाकण्यात आला, मात्र शेख हसीना यांनी त्यास भीक घातली नाही. त्यामुळे अमेरिकेच्या सीएआयएने षडयंत्र रचले आणि प्रथम विद्यार्थी चळवळीद्वारे देशात असंतोष पसरवला. त्यानंतर बीएनपी, जमात ए इस्लामीला हाताशी धरून राजकीय आंदोलन घडवून सत्तापालट करण्यात आला, असे मानण्यास जागा आहे.

Adityaraj Kaul

(Aditya Raj Kaul, Senior journalist of international affairs.)

प्रश्न ४ - आंदोलनात हिंदू लक्ष्य का झाले ?

- बांगलादेशात हिंदू समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदू कुटुंबे, अवामी लीगचे हिंदू समर्थक, हिंदू व्यापारी आणि व्यावसायिक यांचे बळी घेतले जात आहेत. अनेक हिंदू पत्रकारांना मारण्यात आले आहे, इस्कॉनचे कालीमातेचे मंदिरही जाळण्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे शेख हसीना सरकारविरोधातील आंदोलनात बहुसंख्य हिंदूदेखील सहभागी झाले होते. बीएनपी आणि अन्य आंदोलकांनीही हे मान्य केले आहे. मात्र, हा मानसिकता आणि विचारसरणीचा प्रश्न आहे. बांगलादेशात हिंदूंवर दीर्घकाळापासून अत्याचार होत आहेत. हे अत्याचार गेल्या २४ अथवा ४८ तासात सुरू झालेले नाहीत. नेमकेपणाने सांगायचे तर हिंदूंवर तेथे ८० च्या दशकापासून अत्याचार होत आहेत. हिंदूविरोधात स्वातंत्र्यपूर्ण काळातील बंगालच्या फाळणीपासूनचे संदर्भ आहेत.

बांगलादेशातील लोकशाहीवादी कार्यकर्ते, पत्रकार, ब्लॉगर्स, लेखक यांच्यावरही अनेक वर्षांपासून अत्याचार होतच आहेत. आता तर देशात पूर्णच अराजकता आहे, त्यामुळे वाटेल ते कृत्य करण्यास येथील कट्टरतावाद्यांना मोकळीक मिळाली आहे. त्यामुळेच हिंदूंची घरे जाळणे, २७ जिल्ह्यांमधील हिंदूंचे कारखाने जाळले, मंदिरे जाळली. त्यामुळे कट्टरतावादी इस्लामी विचारसरणीमुळेच हे झाले आहेत.

प्रश्न ५ - हिंदूवरील अत्याचाराविषयी पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे गप्प का ?

- पाश्चात्त्यांचा दुतोंडीपणा तर आपण अनेक दशकांपासून पाहत आहोत. काश्मीरचा मुद्दा असो, सीएएचा विषय असो, हिंदूंवरील अत्याचार असो किंवा मोदी सरकारला नियोजनबद्ध रितीने लक्ष्य करणे असो; या प्रसारमाध्यमांनी सोयीस्ककपणे मौन बाळगणे आणि लक्ष्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बांगलादेश संदर्भातही बीबीसी, सीएनएन, अल् जझिरा, न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट आदींनी लेख तर सोडाच पण बातम्याही दिलेल्या नाहीत. त्याचवेळी भारतात मुस्लिमांविरोधात काही घडले असते तर भारतविरोधी अजेंडा त्यांनी हिरिरीने चालवला असता. याचे प्रमुख कारण म्हणजे ही प्रसारमाध्यमे आपापल्या देशातील ‘डीप स्टेट’च्या हातातील बाहुले असतात. त्यामुळे ‘डीप स्टेट’ जे सांगेल, ते करणे त्यांना भाग असते. अनेक देशातील डाव्या विचारांची प्रसारमाध्यमेही आपला अजेंडा चालवत असतात. हे लोक आपल्याला तटस्थ असल्याचा, अजेंड्याशिवाय वार्तांकन करण्याते प्रवचन देतात. मात्र, प्रत्यक्षात भारतविरोधी अजेंडा हेच त्यांचे सत्य आहे.


Hindu Teacher

(हिंदू शिक्षक म्रिनाल कांती चॅटर्जी यांची कट्टरपंथींकडून निर्घृण हत्या - Photo Credit - Nupur J sharma.)

प्रश्न ६ - बांगलादेशचे भवितव्य काय ?

- बांगलादेशात शेख हसीना यांनी प्रथम हुकूमशाही पद्धतीनेच कारभार केला होता. मात्र, गेल्या १५ वर्षांत त्यांनी लोकशाही मार्ग स्वीकारून बांगलादेशच्या विकासाला प्राधान्य दिले होते. त्यांनी सेक्युलर कारभार केला. भारतासह जगातील अनेक देशांसोबत त्यांनी संबंध वाढवून देशात शांतता प्रस्थापित केली होती. आता मात्र बांगलादेशच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे. सरकार कधी स्थापन होणार, ते सरकार कसे असेल, सरकारमध्ये कोण कोण सहभागी असेल, त्यांची विचारसरणी काय असेल, भारतासोबत संबंध कसे ठेवले जातील हे आणि असे प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत. अर्थात, बांगलादेशमध्ये कोणतेही सरकार सत्तेत आले; तरी त्यांना भारताशी वैर पत्करणे परवडणारे नाही.

प्रश्न ७ - भारताला काय काळजी घ्यावी लागेल ?

- भारतासाठी दोन आव्हाने आहेत. पहिले म्हणजे चीनचा हस्तक्षेप. चीनचा कर्जविळखा बांगलादेशवर पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. बीएनपीचे चीनसोबत चांगले संबंध आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दुसरे आव्हान म्हणजे जमात ए इस्लामी आणि आयएसआयचे घनिष्ठ संबंध. यापूर्वी ७० च्या दशकात जमात ए इस्लामीने आयएसआयच्या मदतीनेच हिंदूंचे हत्याकांड घडवले होते. त्याचप्रमाणे कट्टरपंथी गट आणि दहशतवादी गटांनी बांगलादेशमध्ये सीमावर्ती भागात आश्रय घेतल्यास ती भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. असे झाल्यास ईशान्य भारतातील फुटीरतावादी गट, पाक आणि आयएसआय प्रायोजित दहशतवादी, अल् कायदा व इसिसप्रणित गटांना बळ मिळू शकते.

शेख हसीना यांचे भारत सोडणे महत्त्वाचे

शेख हसीना यांनी लवकरात लवकर भारत सोडून अन्य देशात राजकीय आश्रय घेणे आवश्यक आहे. कारण, त्या जेवढा जास्त काळ भारतात राहतील किंवा आश्रय घेतील; तेवढा भारतीय सुरक्षा आणि राजनैतिक धोरणास धोका वाढेल.