ढाका : बांगलादेशात अद्यापही हिंसाचार (Bangladesh Violence Against Hindus) थांबलेला नाही. कट्टरपंथींनी हिंदूंच्या मंदिरांवर, घरांवर हल्ले केले. तसेच काहींच्या दुकांनांची तोडफोडही केली आहे. मात्र, अशातच आणखी एक काळीज पिळवटून टाकणारे कृत्य त्यांनी केले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अवामी लीग पक्षातील नेत्याचे हॉटेल जाळण्यात आले आहे. ही घटना बांगलादेशातील जशूर येथे ५ ऑगस्ट रोजी घडली आहे. हॉटेलमध्ये माणसे आहेत याची माहिती असूनही कट्टरपंथींनी या हॉटेलला आग लावली. हॉटेलमध्ये काही भारतीय नागरिकही वास्तव्याला होते.
बांगलादेशात पंतप्रधानांनी राजीनामा दिला असला तरीही बांगलादेशातील हिंसाचारात वाढ होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशातील जशूर शहरातील अवामी लीग पक्षाचे नेते आणि जबीर हॉटेलचे मालक शाहीन चकलादार यांच्या पंचतारांकित हॉटेल पेटवण्याचे कृत्य करण्यात आले आहे. चकलादार हे जशूऱ शहरातील अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस आहेत. यामध्ये तब्बल २४ जण भाजले गेले आहेत. मात्र याघटनेत भारतीय नागरिक थोडक्यात बचावले गेले आहेत.
दरम्यान, यावेळी कट्टरपंथींनी हॉटेलात घुसून कहर करत लुटमार केली आहे. यावेळी हॉटेलजवळ अनेक नागरिक उपस्थित होते. आगीमुळे अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलल्यांपैकी एकजण इंडोनशियाचा नागरिक होता. या घटनेत दीडशेहून अधिक नागरिक जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
यावेळी मदतकार्य करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, केवळ २० ते २५ लोकांना वाचवता आले होते. हॉटेल जाळण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत हॉटेल जाळलेले दिसत आहे. तसेच अवामी लीग या पक्षाचे कार्यालय देखील जाळण्यात आले आहे. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
हॉटेल जाळण्यात आले तेव्हा यामध्ये भारतीय नागरिक शाहिद आणि त्याचा भाऊ फैजान हे आसामचे रहिवासी असून पुन्हा भारतात यायला निघाला होता. मात्र,परिस्थिती पाहता ते हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी या हल्ल्यात ते कसे बसे थोडक्यात बचावले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाला शाहिदने सांगितले की, जेव्हा तो आवाज ऐकून बाहेर आला तेव्हा त्याने हॉटेल पेटताना पाहिले होते. तो हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होता. खालच्या मजल्यावर आग लागल्याने त्यांना बाहेर पाडण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता. यानंतर शाहिदने उडी मारण्याचा निर्णय घेतला. यामुळे शाहिदचे दोन्ही पाय मोडले. यानंतर त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याने रूग्णवाहिका घेऊन भारतात आला. सध्या त्याच्यावर कोलकाता येथे उपचार सुरू आहेत.