पंजाबमधील बदलती हवा

    05-Aug-2024   
Total Views |
bjp shiromani akali dal alliance


भाजपनेही पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये रवनीत सिंग बिट्टू यांना सोबत घेऊन भाजपने पंजाबमध्ये जाट-शीख चेहरा पुढे करून राज्याच्या राजकारणात नव्या प्रयोगाचे संकेत दिले आहेत. बिट्टू यांनीदेखील पंजाबमध्ये भाजपचे सरकार आणण्याचे आपले ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी रविवारी त्यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीची पुनर्रचना केली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या एका गटाने बंडखोरी केल्यामुळे सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था बरखास्त करण्यात आली होती. शिरोमणी अकाली दलाच्या पुनर्गठित कोअर कमिटीमध्ये 23 सदस्य आणि चार पदसिद्ध विशेष निमंत्रित आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख हरजिंदर सिंग धामी यांचाही समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती प्रमुखांव्यतिरिक्त एसएडीचे ज्येष्ठ नेते बलविंदर सिंग भूंदर, नरेश गुजराल, गुलजार सिंग राणीके, जनमेजा सिंग सेखों, महेशिंदर सिंग ग्रेवाल, हिरा सिंग गाबरिया, बिक्रम सिंग मजिठिया, डॉ. दलजीत सिंग चीमा, अनिल जोशी, शरणजीत सिंग धिल्लन, सोहन सिंग ठंडल आणि परमजीत सिंग सरना यांचा कोअर कमिटीचे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

पक्षाची पूर्वीची कोअर कमिटी दि. 23 जुलै रोजी बरखास्त करण्यात आली होती. अकाली दलाचे वरिष्ठ नेते दलजीत सिंग चीमा यांनी रविवारी सांगितले की, कार्यकारिणीच्या प्रस्तावानुसार पक्षाच्या कोअर कमिटीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या कमिटीने सुखबीर सिंग बादल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. ते म्हणाले की, “संसदेतील शिरोमणी अकाली दलाचे नेते, युवक, महिला आणि पक्षाच्या कायदेशीर शाखांचे अध्यक्ष कोअर कमिटीचे पदसिद्ध सदस्य असतील.”

पंजाबमधील 103 वर्षे जुन्या राजकीय पक्षाला - शिरोमणी अकाली दलास इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाचा सामना करावा लागत आहे. पंजाबमधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या नेत्यांच्या एका गटाने सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधात बंड केले आणि त्यांनी पक्षप्रमुख पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी केली. माजी खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा हे अनेक प्रमुख नेत्यांमध्ये होते, ज्यांनी गेल्या महिन्यात बादल यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. माजी अकाली दल प्रमुख बीबी जागीर कौर, माजी आमदार गुरप्रताप सिंग वडाला आणि माजी मंत्री परमिंदर सिंग धिंडसा, सिकंदर सिंग मलुका आणि सुरजित सिंग राखरा, चंदूमाजरा, मलुका, वडाला आणि राखरा यांच्यासह पक्षाचे इतर नेते कोअर कमिटीचे सदस्य होते.

अकाली दलाने पक्षाचे संरक्षक सुखदेवसिंग धिंडसा आणि आठ बंडखोर नेत्यांना पक्षविरोधी कारवायांचा हवाला देत हकालपट्टी केली. धिंडसा यांच्याशिवाय चंदूमाजरा, बीबी जागीर कौर, वडाला आणि माजी मंत्री परमिंदर सिंग धिंडसा, सिकंदर सिंग मलुका, सुरजित सिंग राखरा, सुरिंदर सिंग कॉन्ट्रॅक्टर आणि चरणजीत सिंग ब्रार यांनाही बाहेर काढण्यात आले. दि. 1 जुलै रोजी बंडखोर नेता अकाल तख्तच्या जथेदारासमोर हजर झाला आणि सन 2007 ते 2017 या काळात सुखबीर बादल उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाची राज्यात सत्ता असताना त्यांनी केलेल्या चुकांसाठी माफी मागितली होती.

अकाली दलामधील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये रवनीत सिंग बिट्टू यांना सोबत घेऊन भाजपने पंजाबमध्ये जाट-शीख चेहरा पुढे करून राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग करण्यास सुरूवात केली आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका 2027 साली होतील. बिट्टू यांनीदेखील पंजाबमध्ये भाजपचे सरकार आणण्याचे आपले ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव होऊनही त्यांना केंद्रीय रेल्वे आणि अन्नप्रक्रिया राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री बिट्टू यांचा चेहरा भाजपच्या विचारधारेशी आणि मुद्द्यांशी पूर्णपणे जुळतो. पंजाबमध्ये राष्ट्रवादी विचारसरणी आणि कट्टरतावादी शक्तींविरोधात आवाज उठवण्यात बिट्टू अग्रसेर असतात. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपला त्यांच्या नेतृत्वाचा लाभ होऊ शकतो. पंजाबमधील दहशतवादाचा नायनाट करणार्‍या हुतात्मा बेअंत सिंग यांचे बलिदान आजही पंजाबमधील नागरिक विसरलेले नाहीत. पंजाबच्या लोकांना आजही बिट्टू यांच्यामध्ये दिवंगत मुख्यमंत्री बेअंत सिंग दिसतात, हे नाकारता येणार नाही.

पंजाबमध्ये भाजपला म्हणावे तसे मजबूत नेतृत्व नाही. भाजपने 2014 सालापासून पंजाबमध्ये विस्तार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. दिवंगत अरुण जेटली यांना भाजपने 2014 साली लोकसभा निवडणुकीत उतरवले होते. मात्र, त्यात ते पराभूत झाले. पुढे विजय सांपला हे होशियारपूरमधूनही विजयी झाले आणि केंद्रीय राज्यमंत्री झाले. मात्र, फगवाडा विधानसभा निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाले. त्यानंतर 2019 साली हरदीपसिंग पुरी पंजाबमधून मंत्री झाले, मात्र तेही पक्षाचा चेहरा होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता पंजाबमध्ये भाजपने नवा चेहरा देण्याचे निश्चित केल्याचे दिसते.

पंजाबमध्ये भाजपने ज्या ज्या नेत्यांना संधी दिली, त्यांना फारसे यश आलेले नाही. पंजाबमधील ‘हेवी वेट’ राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे शांत आहेत. त्यांच्या कन्या जयइंद्र कौर यांच्याकडे भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख आहेत, मात्र त्यांनीही स्थिरस्थावर होणे अद्याप बाकी आहे. याशिवाय राणा गुरमीत सोढील, केवल ढिल्लो, फतेहजंग बाजवा, माजी मुत्सद्दी तरनजीत सिंग संधू, भटिंडामधून पराभूत झालेले माजी आयएएस अधिकारी परमपाल कौर सिद्धू हे पंजाबचा चेहरा बनू शकलेले नाहीत. त्यामुळे आता तरुण, संघटनकौशल्य असलेले आणि खलिस्तानी दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेणारे केंद्रीय राज्यमंत्री रवनितसिंग बिट्टू पंजाबमध्ये केंद्रस्थानी आले आहेत.