धुळ्यात पांढऱ्या सुरय पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन; महाराष्ट्रामधील पहिलीच नोंद

    31-Aug-2024   
Total Views |
white tern



मुंबई (अक्षय मांडवकर) -
गुरुवारी धुळ्यामध्ये पांढरा सुरय (white tern) या पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन झाले (white tern). जखमी अवस्थेत हा पक्षी सोनावद तलावाजवळ आढळून आला (white tern). या पक्ष्याचा बचाव केल्यानंतर शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला (white tern). पांढरा सुरय या खोल समुद्रात राहणारा समुद्र पक्षी असून महाराष्ट्रातील ही त्याची पहिलीच नोंद आहे. (white tern)



धुळे येथील सोनावद तलावाजवळ कल्पेश पाटील यांना जखमी अवस्थेत एक पक्षी आढळून आला. त्यांनी पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांना संपर्क साधून या पक्ष्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, हा पक्षी पांढरा सुरय असल्याची माहिती त्यांनी दिली. वन्यजीव अभ्यासक तेजस पोद्दार आणि उमाकांत पाटील यांनी पक्षी ताब्यात घेऊन त्यावर योग्य उपचार केले. मात्र, शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
 
पांढरा सुरय हा जगातील उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये आढळणारा एक छोटासा समुद्री पक्षी आहे. शुभ्र पांढऱ्या रंगामुळे त्याला परी सुरय म्हणून ओळखले जाते. याशिवाय या पक्ष्याला इंग्रजीमध्ये 'एंजेल टर्न' आणि 'व्हाईट नोडी' अशी नावे असून हवाईयनमध्ये त्याला 'मनु-ओ-कु', असे म्हणतात. प्रौढ पक्षी सर्वांगाने पांढरे असतात. तर त्यांचे डोळे काजळ भरल्यासारखे काळेभोर असतात. किशोरवयीन पक्ष्याची पाठ तपकिरी-राखाडी असते आणि त्याच्या डोळ्यांमागे काळे चिन्ह असते. पांढरे सुरय उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरांमध्ये प्रजनन करतात. पांढरे सुरय एकपत्नीक असतात आणि जोड्या अनेक ऋतूंपर्यंत एकमेकांसोबत राहतात. हे पक्षी घरटे बांधत नाहीत. उलटपक्षी फांद्यांवरील खोलगट भाग हेरुन त्याठिकाणीच उघड्यावर अंडी घालतात आणि जन्मास आलेल्या पिल्लाचे पालनपोषन करतात.


धुळ्यातील पक्षीवैभव जपणे गरजेचे
धुळ्याजवळील सोनवद तलाव हा पक्षी वैविध्याने समृध्द आहे.येथील स्थानिक वन्य जीव अभ्यासकांनी २०१२ साली सोनवद धरणाला IBA दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते, परंतु २०१३ साली धरण आटल्यानंतर धरणातून बेसुमार गाळ काढण्यात आला. त्यामुळे अनेक दशकात तयार झालेली जलीय जैवविविधता कोलमडली. परिणामी येथे पक्ष्यांची संख्या कमी झाली. असे असले तरी येथे पक्ष्यांची विविधता दिवसेंदिवस वाढत असून दरवर्षी येथे कुठल्या ना कुठल्या नवीन पक्ष्याची नोंद होत असते. यापूर्वी या धरणावर White Stork, Common Shelduck, White-tailed Lapwing Indian Skimmer, Golden Plover, Common Starling, Black-Bellied tern, Pied Avocet, तसेच महाराष्ट्रातील इतर IBA पक्षी अधिवासात आढळणारे जवळपास सर्वच महत्वाचे पक्षी सोनवद तलाव परिसरात आढळले आहेत.


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.