हिंदूहिताकरिता शतप्रतिशत मतदान!

    31-Aug-2024   
Total Views |
talk with vhp milind parande


हिंदू समाजाचे संघटन करणे, हिंदू धर्माचे रक्षण करणे आणि समाजाची सेवा करणे, या विचाराने सुरू झालेली संघटना म्हणजे ‘विश्व हिंदू परिषद’. तिथीनुसार कृष्ण जन्माष्टमीला आणि तारखेनुसार दि. 29 ऑगस्टला स्थापना झालेल्या या संघटनेला 60 वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्रांसह काही राज्यांत लवकरच विधानसभेच्या निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. मागील काही निवडणुकांमधील पूर्वानुभव लक्षात घेता, हिंदूंचे मतदान काही प्रमाणात विभाजित होताना दिसते. मात्र, मुसलमान समाजाचे बहुतांशी मतदान हे विभाजित होत नाही. त्यामुळे येत्या काळात शतप्रतिशत हिंदूहिताकरिता मतदान झाले पाहिजे, असे आवाहन विहिंपचे केंद्रीय संघटनमंत्री मिलिंद परांडे यांनी केले आहे. विहिंपचा षष्ट्यब्दीपूर्तीचा आजवरचा प्रवास, वर्तमान आणि भविष्यातील हिंदू समाजासमोरची आव्हाने, यांसारख्या मुद्द्यांवर दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी ओंकार मुळ्ये यांनी मिलिंद परांडे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...


मागे वळून बघताना, विश्व हिंदू परिषदेच्या आजवरच्या वाटचालीविषयी काय सांगाल?
विश्व हिंदू परिषदेची स्थापना हिंदू समाजाकरिता झाली. जगभरात राहणार्‍या हिंदू समाजाचे संघटन व्हावे, त्यांचे रक्षण व्हावे, हिंदू संस्कृतीची रक्षा व्हावी, हिंदू जीवनमूल्यांचा प्रचार-प्रसार व्हावा, याकरिता पूज्य साधुसंतांनी एकत्र येऊन दि. 29 ऑगस्ट 1964 रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विश्व हिंदू परिषदेची स्थापना मुंबईत स्वामी चिन्मयानंदजींच्या सांदीपान आश्रमात केली. देशभरातील सर्व संप्रदायांचे साधुसंत, विचारवंत एकत्र आल्याने ही पुण्याई विहिंपच्या पाठीशी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. श्री गोळवलकर गुरुजी यांनीसुद्धा या कामात पुढाकार घेतला होता. त्या काळापासून जगभरातील हिंदूंकरिता मुख्यतः भारतातील हिंदूंकरिता विश्व हिंदू परिषद आज कार्यरत आहे. गेल्या 60 वर्षांत संघटनेचे काम जगभरातील 33 देशांत विस्तारले आहे. मुख्य काम भारतात सुरू आहे. भारतातसुद्धा सेवाकार्याचे प्रचंड मोठे जाळे समाजातील कमजोर आणि वंचित वर्गाकरिता आपण विणले आहे. शिक्षण, स्वास्थ्य, आर्थिक रोजगार, महिला सशक्तीकरण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत साडेचार हजारांपेक्षा अधिक प्रकल्प सुरू आहेत. आज मतांतरण झालेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात स्वीकारले पाहिजे, असे एकमुखाने साधुसंतांनी विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरून सांगितले. म्हणजेच, ज्या समाजातून बाहेर जायचे दरवाजे उघडे होते, त्या धर्मात परत यायचे दरवाजे परत उघडले गेले आणि लाखो जणांचा घरवापसीचा प्रवास सुरू झाला. अस्पृश्यता, जातीभेद अशा विषयांना धर्माची मान्यता नाही, धर्माची शिकवण नाही. असे म्हणत सामाजिक समरसतेचा संदेशही त्याकाळी देण्यात आला. पुढे हिंदू अस्मितेचे जबरदस्त जागरण श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे झाले आणि देशाच्या वैचारिक केंद्रबिंदूमध्ये हिंदुत्व येऊन बसलं. हिंदूंचा अपमान करून राजकारण करणे आता अशक्य आहे. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार्‍या मुलींना परत आणण्यात विश्व हिंदू परिषदेचा सिंहाचा वाटा आहे. विश्व हिंदू परिषदेचे देशभर 72 लाख हितचिंतक आहेत. 60 हजारांपेक्षा जास्त गावांत काम पसरले आहे.

गेल्या दहा वर्षांत व्यापक पातळीवर हिंदू जनजागृती झालेली दिसते. या एकूणच वैचारिक, धार्मिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतील विश्व हिंदू परिषदेच्या योगदानाकडे आपण कसे पाहता?
मंदिरांचा विषय घेऊन विश्व हिंदू परिषद सध्या खूप मोठे कार्य करी0त आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणामुळे समाजात मंदिरांबद्दलची मोठी जनजागृती झाली. मात्र, हिंदू मंदिरे अधिकाधिक समाजाभिमुख कशी बनतील? ती संघटित होऊ शकतील का? हा सध्या चिंतेचा विषय आहे. समरसतेच्या दृष्टीने समाजात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक हिंदूचा सेवाभाव समाजात वाढवण्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सेवा प्रकल्पांची महत्त्वाची भूमिका आहे. जे सेवित होते, ते आता सेवा करणारे बनत आहेत. 2008 नंतर बजरंग दलाने सुरू केलेल्या ‘बुढा अमरनाथ यात्रा’ किंवा बाबा अमरनाथसारख्या यात्रा हाती घेतल्यामुळे आस्थाबिंदूंच्या रक्षणात विशेष योगदान दिले गेले. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, याकरिता देशभरातील हजारो शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांना रामायण, महाभारत, महापुरुषांची चरित्रे शिकवण्यास सुरुवात केली आहे.

सध्या समाजात विशेषत्वाने महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढलेले दिसते. अशा कृत्यांवर आळा घालण्यासाठी जनजागृतीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात संस्कारवर्गांची गरज आहे, असे वाटते का?
आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मुलांकरिता तीन प्रकल्प राबविले जातात. बाल संस्कार केंद्रांच्या माध्यमातून भारतातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये आपण स्वतंत्र पाठ्यक्रम सुरू केला आहे. त्यात गीत, खेळ, कथा असे विषय घेऊन बालसंस्कार केंद्र आपण साप्ताहिक स्तरावर चालवतो. संस्कार शाळांमध्ये संस्कारांसोबत शिकवणीसुद्धा घेतली जाते. हा दैनंदिन प्रकल्प आहे. पाचवी ते नववी या वर्गांकरिता आपण रामायण शिकवण्याचा प्रयत्न करतोय. लाखो विद्यार्थ्यांना रामचरित्र सांगणे आणि त्या कथेपासून माणुसकीच्या गोष्टी, चांगले नागरिक असण्याच्या गोष्टी, पारिवारिक नात्यांचा विषय, देशभक्ती, धर्मभक्ती, शौर्य, पराक्रम, चारित्र्य अशा गोष्टींचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण करतो. त्यासोबतच देशातील आपले महापुरुष त्यांचे चरित्र, महाभारत असे विषय घेऊन लहान मुलांना घडवण्याचे काम विश्व हिंदू परिषद सध्या करत आहे.

बांगलादेशातील सत्तानाट्यानंतर तेथील हिंदूंचे जीवन धोक्यात आले आहे. तेव्हा, सद्यस्थिती लक्षात घेता, तेथील हिंदूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने विश्व हिंदू परिषदेने काय पाऊले उचलली आहेत?
बांगलादेशात विश्व हिंदू परिषदेची रचना फारशी लागलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत दुसर्‍या देशात कोणतेही मदतकार्य करायचे झाल्यास काही मर्यादा निश्चितच येतात. परंतु, जे बांगलादेशी हिंदू भारतात आले आहेत, त्यांची सेवा, त्यांचे रक्षण संघटनेच्या माध्यमातून होतच आहे. मधल्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अशा अनेकांची भेट घेतली. तेव्हा भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणावा, हा प्रयत्न आपण केला. त्याप्रकारे सरकारनेसुद्धा योग्य पाऊले उचलत दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. जे करोडो बांगलादेशी हिंदू भारतात शरण येण्याकरिता यापूर्वीसुद्धा आले आहेत, त्यांच्याकरिताही विश्व हिंदू परिषद संपूर्ण देशभरात ’सीएए’चा उपयोग करून त्यांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाकिस्तान व बांगलादेशातील हजारो अल्पसंख्याकांना आतापर्यंत आपण नागरिकत्व मिळवून दिले आहे, जेणेकरून त्यांचे जीवन सुरक्षित झाले आहे.

भारताच्या बांगलादेशशी लागून असलेल्या सीमावर्ती भागात तेथील पीडित, भयग्रस्त हिंदू बांधव सध्या मोठ्या संख्येने जमा होऊ लागले आहेत. अशातच बांगलादेशी-रोहिंग्यांची घुसखोरी हा देखील एक गंभीर मुद्दा आहे. आपण याकडे कसं पाहता?
केंद्र सरकारने बांगलादेशच्या सीमावर्ती भागांत जमलेल्या हिंदूंना जर कायदेशीर मार्गाने भारतात स्थान दिले, तर विश्व हिंदू परिषद निश्चितच त्यांचे स्वागत करेल. परंतु, हिंदू समाजाने असासुद्धा विचार केला पाहिजे की, प्रत्यक्षात बांगलादेशात जे सत्ताविरोधी तथाकथित आंदोलन झाले आणि 5 ऑगस्टला सत्तांतरण झाले, तेव्हा आंदोलनाची सगळी शक्ती अचानक हिंदूंच्या विरोधात कशी वळली? हिंदू प्रतिष्ठानांवर, परिवारांवर, पोलीस अधिकार्‍यांवर, महिला-मुलांवर हल्ले झाले. हे चित्र अत्यंत भयानक आहे. गेल्या आठवडाभरापासून बांगलादेशातील सरकारी शाळा आणि नोकर्‍यांमधील अनेक हिंदूंवरही त्यांच्या नोकर्‍या सोडून जाण्याचा दबाव आणला जात आहे. आज दुःखाची आणि चिंतेची गोष्ट हीच की, भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने भारतातील अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मुसलमानांच्या एका वर्गाने आणि काही कम्युनिस्ट हिंदूंनी बांगलादेशतील हिंसाचाराला चांगले घडल्याचे म्हटले असून अशा घटनेचे स्वागत केले आहे. अशा घटना भारतात केव्हा घडतील, याती ते वाट पाहत आहेत. म्हणून अशी हिंसा करण्याकरिता जर कोणी उतारू झाले, अशी हिंसा भारतात भडकवण्याचा प्रयत्न झाला, तर सरकार त्यांचे काम करेलच. परंतु, हिंदू समाजानेसुद्धा याबाबतीत फार सतर्क राहिले पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास किमान आपण आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो का, याचा विचार केला पाहिजे.


देशाच्या मंदिरांवरील सरकारी नियंत्रण हा विहिंपने उचलून धरलेला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा. त्याबद्दल काय सांगाल?
याकरिता विश्व हिंदू परिषदेने एक चिंतन गट निर्माण केला आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिथयश वकील, उच्च न्यायालयांचे निवृत्त न्यायाधीश, साधू, संत, धर्माचार्य आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अशा पद्धतीने त्याचे एक मॉडेल तयार केले आहे. मधल्या काळात कर्नाटक सरकारने सर्व मंदिरे हिंदूंच्या ताब्यात देण्याबाबत घोषणा केली होती. तेव्हा वाटलं होते की, या प्रोजेक्टचा श्रीगणेशा कर्नाटकातून होईल. परंतु, दुर्भाग्याने तेथील निवडणुकीच्या निकालानंतर हा प्रयोग होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, या मॉडेलमध्ये ट्रस्टींची नियुक्ती कोण करेल? ट्रस्टी बनण्याकरिता मंदिरांच्या संचालनात, प्रॉपर्टीच्या कार्यात संपूर्ण समाजाच्या सर्व जातीवर्गाचा सहभाग असला पाहिजे, अशा प्रकारची रचना आपण बनवतोय. मंदिराची संपत्ती हिंदूंची आहे आणि ती हिंदूंकरिताच उपयोगात आली पाहिजे. त्यामुळे धर्माच्या प्रचाराकरिता आणि समाजसेवेकरिता ती उपयोगात यावी. रामरायाच्या कृपेने एकदा हा प्रोजेक्ट सार्वजनिक स्तरावर आला की मग समाजाच्या सूचना येतील. त्यानंतर, अधिक चांगल्या प्रकारे हे मॉडेल आपण राबवू शकू.


‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘व्होट जिहाद’ अशा जिहादी वृत्तीच्या पॅटर्नकडे आणि वक्फ बोर्ड सुधारणांसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांकडे तुम्ही कसे पाहता?
धर्मांतरण हे थांबलेच पाहिजे. मुसलमान समाजाच्या एका वर्गाचा ‘लव्ह जिहाद’ करण्याचा प्रयत्न हा मतांतरणाकरिताच असतो. हिंदू स्त्री जर मुसलमान बनली, तर अनेक पिढ्यांचे ती नुकसान करेल. याने हिंदू समाजाचेही नुकसान होईल. म्हणून, हा खूप मोठा धोक्याचा विषय आहे. आज विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दल अशा मुलींना परत आणणारे सर्वात मोठे संघटन आहे. दरवर्षी अशा हजारो मुलींना हिंदू धर्मात परत आणून, त्यांना सन्मानाचे जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ही समस्या खूप मोठी आहे. ‘लव्ह जिहाद’प्रमाणेच ‘लॅण्ड जिहाद’, ‘व्होट जिहाद’ याबाबत हिंदू समाजाने सतर्क असले पाहिजे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा मुसलमान समुदायाने एकगठ्ठा मतदान करून एकप्रकारे हिंदू विचारांच्या उमेदवाराला पराभूत करण्याकरिता मतदान केले आहे. हिंदूंचे मतदान हे म्हणूनच विभाजित होते आहे. मुसलमान समाजाचे मतदान विभाजित होत नाही. त्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनसुद्धा हिंदूंचे निवडणुकीत नुकसान होताना दिसते. त्यामुळे हिंदू समाजाने अत्यंत विचारपूर्वक हिंदू हिताकरिताच मतदान केले पाहिजे. हिंदू समाजाचे मतदान 40-50 टक्के होताना दिसते. मुसलमान समुदायाचे मतदान 80 टक्क्यांपर्यंत होत आहे. त्यामुळे कमी नंबर असूनसुद्धा आज असंघटित असल्यामुळे निवडणुकीत हिंदू विचारांचा उमेदवार पडतोय. हे थांबवायचे असेल, तर ‘शतप्रतिशत हिंदूहिताकरिता मतदान’ यादृष्टीने विश्व हिंदू परिषद प्रयत्न करत आहे आणि समाजानेही याचा विचार करून मतदान केले पाहिजे. वक्फ बोर्डाबाबत सरकारने घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. 40 पेक्षा जास्त सुधारणा त्यात सुचवल्या आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव निश्चितच पारित व्हावा. जे असीमित अधिकार वक्फ बोर्डाला दिले होते, ते रद्द केलेच पाहिजेत. खरं म्हणजे वक्फ बोर्डच रद्द केले पाहिजे.


भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये हिंदूंची संख्या आठ टक्क्यांनी कमी झाल्याचे नुकतेच एका अहवालात अधोरेखित करण्यात आले होते. हा हिंदूंकरिता भविष्यातील धोका म्हणावा का?
गेल्या दोन हजार वर्षांत पहिल्यांदा हिंदू लोकसंख्या 80 टक्क्यांच्या खाली गेली आहे. याची चार प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे मतांतरण. हजारो ख्रिश्चन मिशनरी संघटना हिंदूंना ‘मतांतरित’ करण्यामध्ये लागल्या आहेत. त्यासाठी विदेशांतून त्यांना निधी प्राप्त होतो. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून मुसलमान समाजाचा एक वर्गही सक्रिय आहे. सीमाभागातून होणारी मुस्लीम घुसखोरी हे सुद्धा हिंदू लोकसंख्या कमी होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. यात सर्वांत महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा म्हणजे, हिंदूंचा घटता जन्मदर. आज एक हिंदू महिला आपल्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते, याला जन्मदर मानला जातो. जगभरातल्या कुठल्याही देशात कुठल्याही समुदायाकरिता ‘रिप्लेसमेंट रेट’चा आकडा बहुतांशी सारखा आहे. 2.1 इतका आकडा असला तर समुदाय टिकून राहतो. म्हणजेच जर आई-वडील वारले, तर दोनने लोकसंख्या कमी झाली आणि दोन मुले घरी असतील, तर लोकसंख्या दोनने पुन्हा वाढली. म्हणून त्याला ‘रिप्लेसमेंट रेट’ म्हणतात. ज्या समुदायाचा जन्मदर 2.1 टक्क्यांपेक्षा खाली जातो, त्याची ‘रिप्लेसमेंट’ होऊ शकत नाही. असे बराच काळ चालू राहून जास्त प्रमाणात हा जन्मदर खाली आला, तर त्यास सुधारवायला अनेक पिढ्या लागतील किंवा ते शक्यसुद्धा होणार नाही आणि परिणामी त्या समुदायाचा नाश होईल. 2021 मधील संपूर्ण भारताचा जन्मदर 1.92 टक्के होता. 2019 मध्ये मुसलमान समुदायाचा जन्मदर 2.3 टक्के होता. हिंदू समाजाच्या दृष्टीने ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने याबाबत विचार केलाच पाहिजे की, आपल्या घरात किमान दोन मुले असली पाहिजेत. आज ‘स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग’च्या नावावर, शिक्षणाच्या नावावर ‘एकापेक्षा जास्त मुलं नको,’ अशी मानसिकता निर्माण झाली आहे. करिअरच्या नावाखालीही ‘मुलं नकोत’ असाही काहीजण विचार करतात. ही कारणे हिंदूंकरिता सर्वार्थाने धोक्याची आहेत. हा केवळ आपला स्वतःचा प्रश्न नसून, संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचाही विषय आहे, हे हिंदूंनी समजून घेतले पाहिजे.


वरील सर्व बाबी लक्षात घेता, हिंदूंसमोरील सध्याची प्रमुख आव्हाने कोणती आणि त्या आव्हानांवर मात करण्यासाठी हिंदूंनी कोणती पाऊले उचलली पाहिजे?
सध्या विवाह विच्छेदाचे बरेच विषय येत आहेत. म्हणून कुटुंबाला सर्वप्रथम सावरले पाहिजे. सर्वांनी एकत्र बसून सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांचा विचार केला पाहिजे. धर्माचे अधिष्ठान पक्कं केलं पाहिजे, तरच कुटुंबाचे रक्षण होईल. ‘संपूर्ण हिंदू हा माझा आहे,’ या समरसतेच्या भावनेने जातीभेदाच्या आचरणापासून दूर गेले पाहिजे. सामाजिक समरसतेला आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे. देशाला ‘विश्वगुरू’ म्हणून पाहायचे असेल, तर ’स्व’ची भावना प्रत्येकात जागृत करणे गरजेचे आहे. यासोबतच एक चांगले नागरिक आपण कसे बनू शकतो, याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. नागरी कर्तव्य बजावले पाहिजे. यासाठी राष्ट्रीय चारित्र्य अंगीकारले पाहिजे. एकवेळ स्वतःचे अहित झाले तरी चालेल, पण देश, धर्म, समाजाचे अहित आपल्याकडून होऊ नये, हे सांभाळले पाहिजे. यासाठी विश्व हिंदू परिषदही निश्चितच प्रयत्न करेल.


केलेला संकल्प पूर्ण होणारच!
श्रीराम मंदिरानंतर आता काशी, मथुरेकरिता हिंदू समाजानेच खरंतर विचार केला आहे. रामजन्मभूमीकरिता हिंदू समाज 500 वर्षे लढत होता. ते समाजाचंच आंदोलन होतं. संतांच्या मार्गदर्शनामध्ये ते यशस्वी झालं. तेव्हा हिंदूंनी अयोध्येप्रमाणे काशी आणि मथुरेबाबतही संकल्प केला होता. हिंदू समाज केलेला संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.

गोरक्षेचा केंद्रीय कायदा यायलाच हवा
गोरक्षणाचे कार्य अत्यंत कठीण कार्य आहे. त्यासाठी मनगटात बळ आणि काळीज पक्कं पाहिजे. कसायांच्या हातून गोवंश सोडवण्याचे काम याकरिता वेगळं काळीज लागतं. एकीकडे आपण हजारो टन दुग्धजन्य पदार्थ विदेशातून आयात करतोय, तर दुसरीकडे हजारो गोवंश प्रतिदिन कायदा तोडून मारला जातोय. यावर कोणी बोलायला तयार नाही. विश्व हिंदू परिषद कसायांच्या हातून दरवर्षी साधारण दोन लाखांपेक्षा जास्त गोवंशाची सुटका करते. देशात गोरक्षेचा केंद्रीय कायदा यायलाच हवा.


हिंदहिताकरिता मतदान झाले पाहिजे
हिंदूबहुल भागात विश्व हिंदू परिषदेचा संपर्क व्यापक प्रमाणात सुरू आहे. ‘हिंदूहित हेच देशहित’ ही विश्व हिंदू परिषदेची निष्ठा आहे. हिंदूहितामध्ये समाजाचे हित आहे. म्हणून, प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. शतप्रतिशत मतदान झाले पाहिजे. विशेषतः हिंदू हिताकरिता मतदान झाले पाहिजे. आपण कुठल्याही पक्षाचं नाव घेऊन काम करत नाही. असे जागरणाचे विषय घेऊन आपण लोकसभेच्या वेळीसुद्धा समाजजागरण केले आणि त्याचप्रमाणे विधानसभेच्या वेळीसुद्धा हेच बिंदू घेऊन विहिंप जागरण करेल.


ईशान्य भारतात विहिंपचे योगदान
जवळजवळ 50 वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने ईशान्य भारतात आपल्या कार्याचा प्रारंभ केला. तेथील जनजातींकरिता निरनिराळ्या जिल्ह्यांत मोठे सेवाकार्य उभे केले आहे. जो भाग उग्रवादी चळवळींमुळे, उग्रवादी संघटनांच्या हिंसेमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होता, आज त्या भागांत विहिंप सेवेच्या माध्यमातून, साधुसंतांच्या माध्यमातून पोहोचत आहे. तेथील मतांतरणाचे प्रमाण कमी करण्यात विहिंपला यश आले आहे. सेवा प्रकल्पातून मोठी झालेली मुले आणि संपर्कात आलेला समाजवर्ग हळूहळू भारतीय विशेषतः हिंदू म्हणून कार्य करतो आहे, ही फलश्रुती आज दिसते.


विश्व हिंदू परिषद आणि युवावर्ग...
विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी अशा दोन युवा संघटना आहेत. त्यापैकी बजरंग दलाशी 34 लाख युवक आणि दुर्गा वाहिनीत 16 लाखांपेक्षा जास्त महिला विहिंपसोबत जोडलेल्या आहेत. सोशल मीडियावरसुद्धा विहिंप निरनिराळ्या प्लॅटफॉर्म्सवर आहे. परंतु, त्या कामाकडे आपण जास्त लक्ष दिलं नव्हतं. व्यक्ती-व्यक्तींचा संपर्क याकडे विशेष लक्ष दिलं. सध्या हळूहळू सोशल मीडियाच्या संपर्काकडेसुद्धा आपण लक्ष देतो आहोत.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक