लव्ह यू जिंदगी...

    28-Aug-2024   
Total Views |
commit suicide cases raised
 
 
काल-परवाच आपल्या महाराष्ट्रातल्या आळंदी येथे 20 वर्षीय अनुष्का केदारे या पोलीस युवतीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. पण, जीव खरंच इतका स्वस्त आहे का? किडामुंगीही जीव वाचवण्याचा मरेपर्यंत प्रयत्न करतात. कारण, जीवन अमूल्य आहे. त्यामुळे आत्महत्या करू इच्छिणार्‍यांनी कृपया लक्षात घ्या, धीरापोटी फळे रसाळ गोमटी. परिवर्तन संसाराचा नियम आहे. आज वाईट क्षण आहेत, तर त्यांचेही परिवर्तन होऊन चांगले दिवस येतीलच! काही महिन्यांपूर्वीच बारामतीच्या प्रतीक्षा भोसले या पोलीस युवतीने विश्वासघात झाला म्हणून आत्महत्या केली, तर छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. प्रीतम गवारे यांनीही पतीकडून अपेक्षित प्रेम मिळत नाही, घरगुती हिंसेमुळे त्रस्त होऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना खूप ताणतणावाला सामोरे जावे लागले, म्हणून अकोल्याच्या अंजली गोपनारायण हिनेही आत्महत्या केली. पालघरच्या लक्ष्मी भामर हिने आधी स्वतःच्या लहान बालिकेचा खून केला आणि नंतर आत्महत्या केली. का? तर पतीसोबत भांडण झाले होते म्हणून. मागे मुंबईच्या मालाडमध्ये एका 14 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. कारण काय, तर तिला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती आणि ते सगळे असह्य वाटले. या सगळ्याजणींवर प्रेम करणारे, माया करणारे कोणीतरी होतेच होते. पण, सगळे चांगले, सकारात्मक घटना, परिस्थिती बाजूला टाकून जे नकारात्मक आहे, त्याचाच विचार करून या महिलांनी आत्महत्या केली. या मुली-महिलांना वेळीच समुपदेशन आणि साथ मिळाली असती, तर त्या वाचल्या असत्या. आत्महत्येचा आणि नैराश्याचा संबंध आहे. कधी शरीरात काही व्हिटॅमिनची कमी असल्यानेही नैराश्य येते. निराश एकाकी वाटू लागले, तर शरीरात कोणते व्हिटॅमिन कमी आहे, याचा शोध घेऊन त्यावर उपयायोजना करायला हवी. 90 टक्के परिस्थितींमध्ये नैराश्यासाठी समस्या आणि काही लोकही कारणीभूत असतात. मात्र, तरीही सर्व प्रकारच्या नैराश्याच्या गर्तेत रूतून गेलेल्या मनाला त्यातून बाहेर काढता येते. उगीच नाही म्हटलेले, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.’ मनाला प्रत्येक वेळी समजावू या! परिस्थिती भयंकर असू दे, ती बदलेल. आशावादी होऊ या. ‘लव्ह यू जिंदगी’ म्हणूया.
 
आमच्यानंतरही आमचेच!
 
‘बहुजन समाजवादी पार्टी’ या पक्षाच्या नावात ‘बहुजन’ शब्द आहे. मात्र, पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व करण्याची संधी बहुजनांना मिळेल का, असे वाटू लागले आहे. कारण, नुकतेच या पक्षाची अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा मायावती यांच्या गळ्यात पडली आहे किंवा पाडून घेतली आहे, असे म्हणू. गेली तब्बल 21 वर्षे त्या बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष. पण, मग आता पुन्हा मायावतीच अध्यक्ष का? कर्तृत्व किंवा करिष्मा म्हणावा, तर सध्या बसपाचे दिवस चांगले नाहीत. पक्षाचा जनाधार कमी झाला आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला दहा जागा मिळाल्या होत्या. पण, 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. 2019 मधील 19.2 टक्क्यांच्या तुलनेत त्यांच्या मतांची टक्केवारी आता 9.3 टक्क्यांपर्यंत घसरली. 2022 सालच्या विधानसभा निवडणुकीत बसपाच्या मतांची टक्केवारी सर्वात कमी राहिली होती. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत केवळ 12.8 टक्के मते बसपाला मिळाली होती. ‘सध्या टिलक, तराजू और तलवार इनको मारो जुते चार’ असे कधीकाळी भयंकर वादग्रस्त विधान करणार्‍या बसपा पक्षाला जनतेने घरी बसवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मायावती यांचा उत्तराधिकारी कोण, हेसुद्धा ठरले. तर उत्तराधिकारी आहे, आकाश आनंद. त्यांना पक्षाचे ‘राष्ट्रीय समन्वयक’ म्हणून जाहीर करण्यात आले. आकाश आनंद यांचे कर्तृत्व काय, तर ते मायावती यांचे भाचे आहेत, हेच कर्तृत्व! उत्तर प्रदेशमध्ये चार वेळा सत्ताधारी राहिलेल्या बसपामध्ये पक्षाची धुरा सांभाळणारा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नसावा? अर्थात, त्यात काय आश्चर्य म्हणा, काँग्रेसमध्ये तर वर्षानुवर्षे नेहरू आणि वंशजांशिवाय पर्याय नव्हता. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार आणि आता सुप्रिया सुळे यांची नावे आहेतच. शिवसेनेचे दोन गट पडले. त्यालाही हे असेच कारण होते. ‘वडिलानंतर मीच पक्षप्रमुख, मीच सर्वेसर्वा राहणार’ असा अट्टहास उद्धव यांनी केला. त्यातूनच तर पुढे सगळे घडले. राजकीय पक्ष हे राजकीय कार्यासाठी असतात, हे विसरून बहुसंख्य पक्ष आता लिमिटेड कंपनीसारखे वागू लागले आहेत. जोपर्यंत जीवंत आहोत, तोपर्यंत आम्ही, आमच्यानंतर आमचे घरचे असे ठरलेले.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.