माणसं जोडणारा ग्रंथपाल

    26-Aug-2024   
Total Views |
dilip navele


समाजाचा सर्वांगीण विकास करण्याची इच्छा असणारे दिलीप नवेले. पुस्तकांसोबतच माणसांचा विपुल संग्रह असणार्‍या ग्रंथपाल दिलीप नवेलेंच्या आयुष्याचा घेतलेला मागोवा.

1992च्या दंगलीमध्ये महाराष्ट्र होरपळला होता. त्यावेळी ‘सिव्हील डिफेन्स’तर्फे मुंबई उपनगरांतल्या जोगेश्वरी येथे ‘सिव्हील डिफेन्स’ प्रशिक्षित नागरिकांना सुरक्षिततेसाठी सहभागी करण्यात आले होते. त्यावेळी उपनगरांतील संवेदनशील भागांत गस्त घालणे, वायरलेस संदेश जबाबदारी घेऊन काम करणे, अशी महत्त्वाची कामे दिलीप शिवराम नवेले यांनी केली. ‘सिव्हील डिफेन्स’च्या माध्यमातून त्यांनी लातूर येथे झालेल्या भूकंपात स्वयंसेवक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. त्यांचे म्हणणे, ‘देश समाजापासून बनतो. जर, समाजच मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीत होरपळत असेल, तर हातावर हात ठेवून कसे बसायचे? आपल्याला शक्य असेल त्या मार्गाने आपण देश,समाजासाठी काम केले पाहिजे. आपल्या दुःखी बांधवांचे अश्रू पुसले पाहिजे.’

तर, असे हे समाजशील दिलीप नवेले. ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’च्या अत्यंत समृद्ध अशा ग्रंथालयाचे ग्रंथपाल आहेत. त्याचबरोबर कर्ली गावच्या ग्रामदेवतेचे विठ्ठलादेवी मंदिराचे पुजारी आहेत. कर्ली गावचा सर्वात्मक विकास व्हावा, यासाठी विचारकार्य करणार्‍या कर्ली विद्यावर्धक व ग्रामविकास मंडळामध्ये असून ‘संस्कार भारती’च्या सांस्कृतिक मंडळ वसई-विरार विभागासाठीही कार्यरत आहेत. कोरोनाकाळात मातापिता गमावलेल्या चार मुलांच्या शिक्षणाचा खर्च दिलीप यांनी उचलला आहे. तरुणाईमध्ये समाजाशी निगडित विषयांवर उत्सुकता निर्माण व्हावी, जागृती व्हावी, असे अनेक उपक्रम दिलीप राबवत असतात. ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा उपयोग ते नियमांच्या चौकटीत राहून समाजासाठी करत असतात. ग्रंथालय क्षेत्रात ग्रंथालयीन संस्था व पदाधिकारी व कर्मचार्‍यांसाठी कार्यशाळा तसेच राज्यातील मंदिर व्यवस्थापनातील विश्वस्त पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी व्यवस्थापन व आपत्ती-व्यवस्थापन या विषयावर त्यांनी कार्यशाळा आयोजित केली होती. दिलीप यांना ग्रंथालयासंदर्भात अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त आहेत. दिलीप या सर्वाचे श्रेय ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे रवींद्र साठे आणि विनय सहस्रबुद्धे यांना देतात.

विरार येथे राहणार्‍या दिलीप नवेले यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ. नवेले कुटुंब मूळचे धुळे जिल्ह्यातले. मात्र, तीन पिढ्यांपूर्वी दिलीप यांचे पणजोबा कामानिमित्त रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कर्ली गावी आले. आले ते कायमचे गावकरी झाले. नवेले कुटुंब हे तिल्लोरी कुणबी समाजाचे. त्यामुळे नवेले कुटुंब कर्ली गावच्या विठ्ठलादेवीचे पुजारीही होते. दिलीप यांचे बाबा म्हणजे शिवराम हे ग्रामदेवतेचे पुजारी म्हणून काम करत, तसेच पोटापुरतेही उत्पन्न देणार्‍या जमिनीवर शेती करत, शेतमजूर म्हणून कामही करत. तर, दिलीप यांची आई भागिरथी यासुद्धा शेजमजुरी करत. देवळाची पूजाअर्चा-राखण आणि शेतीची मोलमजुरी करणे, यातच शिवराम आणि भागिरथीबाईंचा दिवस खर्ची जाई. त्यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक दिलीप. नवेले दाम्पत्य मुलांना सांगत कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टातूनच समाधान मिळते. दिलीप इयत्ता चौथीपासून मोठ्या भावासोबत सकाळी सात ते नऊ गायी राखायला जाऊ लागले. तब्बल 12 गायी, चार बैलं आणि 19 वासरं असा गोतावळा. या सगळ्यात विरंगुळा असे तो बाबा दरआठवडी बाजारात फिरायला घेऊन जात असतो.

रानात गुरे राखताना किंवा बाजारात शाळेत जाताना चप्पल घालणे परवडणारे नव्हते. दिलीप पायाला वडाची पानं बांधत. आम्ही किती गरीब चप्पलपण घेऊ शकत नाही, असे रडगाणे गात बसले नाहीत. ते शाळेत हुशार होते. चौथीला असताना त्यांना स्कॉलरशिप परीक्षेत दहा रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. नवेले कुटुंबाला कोण आनंद झाला. सातवीनंतर गावात माध्यमिक शाळा नसल्याने पुढील शिक्षणासाठी दिलीप देवरूखला शाळेत जाऊ लागले. आठवीला बसचा पास काढण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा शिवराम हे चार दिवस गावातल्या सधन व्यक्तीच्या घरी राबराब राबले. तेव्हा कुठे 11 रुपये मिळाले. आईवडिलांचे कष्ट पाहून दिलीप यांनीं ठरवले ही परिस्थिती पालटली पहिजे. त्यासाठी दहावीनंतर ते मुंबईला शिकण्यासाठी नातेवाईकाकडे आले. दिवसा नोकरी, रात्री महाविद्यालयात जाऊ लागले. याच काळात त्यांनी ग्रंथपालाचे प्रशिक्षणही घेतले. पुढे ‘लोकमान्य सेवा संघा’त ग्रंथपाल म्हणून नोकरी सुरू केली. अर्थार्जन वाढवावे, यासाठी महिलांसाठीच्या पर्स बनवायला शिकले आणि फावल्या वेळेत पर्स बनवू लागले. सामाजिक भान म्हणून ‘सिव्हील डिफेन्स’चे प्रशिक्षण घेतले.

पुढे ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे’चे रवींद्र साठे यांच्या माध्यमातून ते ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे ग्रंथपाल म्हणून रुजू झाले. इथून पुढे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मात्र, कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यावरही दिलीप गावी जात असतात. पुजारी म्हणून आपले कर्तव्य पार पाडतात. ते म्हणतात, ”कुणबी समाजामध्ये उच्च शिक्षणाबाबत जागृती व्हावी, सर्वच पातळीवरच्या विकासासाठी संधी मिळावी, यासाठी काम करायचे आहे. जातीपातीपेक्षा हिंदू म्हणून समाजाचा विकास करायचा, हे ध्येय तरुणांमध्ये रुजवायचे आहे. त्यासाठी मी काम करणार आहे.” तर, पुस्तकांसोबतच माणसंं जोडणार्‍या या दिलीप नवेलेंचे विचारकार्य दिशादर्शक आहे. ग्रंथालयातील विपुल पुस्तक संग्रहाइतकाच त्यांचा लोकसंग्रह विपुल आहे. पुस्तकांच्या माध्यमातून माणूस जोडणारा आणि समाज घडवू पाहणारा ग्रंथपाल असेच दिलीप नवेले यांच्याबाबत म्हणता येईल.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.