छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    26-Aug-2024
Total Views |
 
Shinde

 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. नौदल दिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवार, दि. २६ ऑगस्ट रोजी घडली. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
 
हे वाचलंत का? -  यापुढे गडचिरोली राज्यातील ‘पहिला’ जिल्हा! स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून शुभेच्छा
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं. हा पुतळा नौदलाने उभारला असून त्याचं डिझाईन त्यांनीच केलं होतं. ४५ किलोमीटर प्रति तास वेगाचा वारा असल्याने हा पुतळ्याचं नुकसान झाल्याची माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतू, उद्याच तिथे नौदलाचे अधिकारी येणार असून तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा करण्याचं काम आम्ही करू,” असे ते म्हणाले.