मुंबई उपनगरात महिलांसाठी रक्षा पॅटर्न; पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विशेष निर्देश

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

    21-Aug-2024
Total Views |
mumbai suburban collector minister lodha letter


मुंबई :         महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालयात महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश एका पत्राद्वारे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री लोढा यांनी उपनगरातील प्रत्येक महाविद्यालयात १ सप्टेंबरपासून युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती यावेळी दिली.

आपल्या पत्रात मंत्री लोढा म्हणाले, "महिला आणि बालकांविरुद्ध वाढणारे अत्याचार ही सरकारसाठी, प्रशासनासाठी आणि आपल्या समाजासाठी चिंतेची बाब आहे. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचे पडसाद म्हणून, नागरिकांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत केलेल्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडताना दिसत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई उपनगरातील सर्व शैक्षणिक संस्थांना सक्त निर्देश द्यावेत. तसेच, खात्रीपूर्वक तपासणी करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, असेही मंत्री लोढा यांनी पत्रात म्हटले आहे.


पत्रात मंत्री लोढा यांनी खालीलप्रमाणे सूचना केल्या आहेत 

शाळा परिसरात स्वच्छतागृह वगळता संपूर्ण परिसर CCTV च्या कक्षेत आणावे. त्यासाठी कॅमेरे बसवावे व ते कायम सुरक्षित, सुस्थितीत आहेत याची पडताळणी बिट मार्शल / फिरते पोलीस पथक यांनी वेळोवेळी करावी.

मुलींच्या स्वच्छतागृहांबाहेर एका महिला कर्मचाऱ्यास कायम देखरेखीसाठी नियुक्त करण्यात यावे.

अल्पवयीन मुलींसाठी व दहावीत शिकणाऱ्या मुलींसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छता कर्मचारी महिला असतील याची सक्तीने अंमलबजावणी करावी.

विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी कार्यरत असणाऱ्या बसेस, टॅक्सी, व्हॅन यामध्ये एक महिला कर्मचारी असणे सक्तीचे करावे.

शाळेत कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे.

मुलींना स्व-संरक्षणाचे धडे द्यावेत, यासाठी शाळा प्रशासनाने स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

शाळेत उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत बालकांनी / मुलांनी त्या शाळेची तक्रार १०९८ या हेल्पलाईन नंबरवर नोंदवावी. या बाबतीत शाळेत भित्तीपत्रके लावण्यात यावीत.

शाळेत महिला पालकांची एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी. या बैठकीची दर महिन्याला बैठक घेऊन मुलींच्या समस्यांविषयी चर्चा व्हावी.

महिला आणि मुलींना आपत्कालीन परिस्थितीत १८१ या हेल्पलाईनचा वापर करण्याबाबत सर्व शाळा महाविद्यालयांना प्रत्येक वर्गात, परिसरात भित्तीपत्रके लावण्याच्या सूचना देण्यात याव्या.