स्थलांतरामागचा धर्मार्थ...

    21-Aug-2024   
Total Views |
migration global report


2020 पर्यंतच्या स्थलांतरितांची जागतिक आकडेवारी सादर करणारा एक अहवाल नुकताच अमेरिकी ‘थिंक टँक’ समजल्या जाणार्‍या ‘प्यू रिसर्च सेंटर’कडून जाहीर करण्यात आला. पण, या अहवालात आणि त्यासंबंधीच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून मुद्दाम भारताला लक्ष्य करण्याचा करंटेपणाच दिसून येतो. त्यानिमित्ताने...

‘प्यू रिसर्च सेंटर’ ही एक अमेरिकन ‘थिंक टँक’ आणि जगप्रसिद्ध संशोधन-सर्वेक्षण संस्था. जगभरातील विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही या संस्थेकडून वेळोवेळी अहवाल प्रसिद्ध केले जातात. यंदाही The Religious Composition of the World’s Migrants' या शीर्षकाचा जागतिक स्थलांतराचे चित्र मांडणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. पण, या अहवालातील आकडेवारी आणि निरीक्षणे यांचा वापर काही संकेतस्थळे आणि माध्यम संस्थांकडून मोदी सरकारची अल्पसंख्याकविरोधी प्रतिमा रंगवण्यासाठीच केल्याचे मुख्यत्वे दिसून आले. म्हणूनच, या अहवालातील काही ठळक तरतुदी आणि त्यातील भारतविरोधी मानसिकतेचा समाचार घेणे क्रमप्राप्त ठरावे.

‘प्यू रिसर्च सेंटर’चा हा अहवाल 1990 ते 2020 पर्यंतच्या जागतिक स्थलांतराच्या आकडेवारीवर भाष्य करतो. या अहवालासाठीची आकडेवारी ही संयुक्त राष्ट्रांचा ‘इंटरनॅशनल मायग्रंट स्टॉक 2020’ अहवाल, तसेच अन्य 270 जनगणना आणि सर्वेक्षणांवर आधारित आहे. या अहवालाच्या प्रारंभीच ‘स्थलांतरित’ म्हणजे ज्यांना आपली जन्मभूमी सोडून परदेशात वास्तव्य करावे लागले, असे नागरिक अशी व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. यामध्ये प्रौढ तसेच मुलांची संख्याही ग्राह्य धरण्यात आली असली, तरी ही आकडेवारी वर्षागणिक मांडलेली नाही. हा अहवाल स्थलांतराचे बदलते प्रवाह (फ्लो) यापेक्षा स्थलांतरित झालेल्यांची संख्या (स्टॉक) याकडे अधिक लक्ष केंद्रित करतो. कारण, ‘प्यू रिसर्च सेंटर’नुसार युद्ध, आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक संकटे यामुळे स्थलांतराचे प्रमाण हे वर्षागणिक बदलत असते. त्यामुळे स्थलांतराचे प्रवाह हे अधिक गतिमान असले, तरी स्थलांतरितांची एकूण संख्या (स्टॉक) हे तुलनेने स्थायी असल्याचे सेंटरचे म्हणणे. 2020 पर्यंत स्थलांतरितांची संख्या ही 280 दशलक्षपेक्षा अधिक असून, 1990च्या तुलनेत स्थलांतरितांच्या संख्येत 83 टक्के इतकी भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 1990 ते 2020 दरम्यान जागतिक लोकसंख्या वाढीचा दर हा सरासरी 47 टक्के होता, त्याहीपेक्षा जास्त स्थलांतरितांचे प्रमाण वाढल्याचे हा अहवाल अधोरेखित करतो.

‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालानुसार, जगभरात सर्वाधिक स्थलांतरित होणारे नागरिक हे मुस्लीम धर्मीय नसून ते ख्रिश्चन धर्मीय आहेत. ख्रिश्चन धर्मीयांचे एकूण स्थलांतरामधील प्रमाण हे 47 टक्के असून, त्यांची जागतिक लोकसंख्या ही 30 टक्क्यांच्या घरात आहे. त्याखालोखाल 29 टक्क्यांसह स्थलांतरितांमध्ये मुस्लीम धर्मीयांचा समावेश होतो. हे प्रमाणही मुसलमानांच्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या टक्केवारीपेक्षा (25 टक्के) चार टक्क्यांनी अधिक आहे. हिंदू धर्मीयांबद्दल सांगायचे झाल्यास, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 15 टक्के असलेल्या हिंदूंमध्ये स्थलांतरितांचे प्रमाण हे केवळ पाच टक्के आहे. तसेच ज्यू, बौद्ध आणि कोणताही धर्म न मानणार्‍या स्थलांतरितांचीही आकडेवारी हा अहवाल सादर करतो. यापैकी ख्रिश्चन स्थलांतरितांच्या संख्येचा विचार करता, मेक्सिको, रशिया, फिलीपाईन्स या देशांमधून ख्रिश्चन लोकसंख्येने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्याचे आढळते. ख्रिश्चन स्थलांतरितांनी 11 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येने स्थायिक होण्यासाठी पहिली पसंती अमेरिकेला दिल्याचे दिसते. याचे प्रमुख कारण म्हणजे, अधिक उत्पन्न आणि चांगल्या जीवनशैलीच्या शोधात विकसनशील देशांमधून अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये स्थलांतरितांचा वाढता ओढा.

दुसर्‍या स्थानावर जगातील सर्वाधिक स्थलांतरितांमध्ये क्रमांक लागतो तो मुस्लीम समुदायाचा. यामध्ये सर्वाधिक मुस्लीम हे युद्धग्रस्त सीरियामधून स्थलांतरित झाले असून, त्याखालोखाल भारत आणि अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो. भारतीय मुसलमानांची स्थलांतरितांमध्ये संख्या मोठी असण्याचे कारण म्हणजे, आखाती देशांमधील खुणावणार्‍या रोजगाराच्या विपुल संधी. म्हणूनच भारतातील 1.8 दशलक्ष मुसलमान संयुक्त अरब अमिराती (युएई), 1.3 दशलक्ष सौदी अरेबिया, 7 लाख 20 हजार ओमानमध्ये स्थायिक झाल्याचे हा अहवाल अधोरेखित करतो. त्याचबरोबर भारतापेक्षा अधिक मोठ्या संख्येने मुसलमान हे पाकिस्तान सोडून आखाती देशांमध्ये स्थलांतरित झाल्याचेही हा अहवाल सांगतो. तसेच जगभरातील मुस्लीम स्थलांतरितांचा ओढा सौदी अरेबिया, तुर्की आणि युएईकडे विशेषत्वाने असल्याचेही स्पष्ट होते.

म्हणूनच, ‘गल्फ को-ऑपरेशन काऊंसिल’ (जीसीसी) देशांच्या एकूण लोकसंख्येपैकी 53 टक्के लोकसंख्या ही केवळ स्थलांतरितांचीच आहे. त्यामुळे स्थलांतर करताना मुस्लीम लोकसंख्येचा कल हा प्रामुख्याने मुस्लीमबहुल देश किंवा श्रीमंत देश किंवा यापैकी दोन्ही निकष पूर्ण करणार्‍या देशांकडे अधिक झुकलेला दिसून येतो. म्हणूनच, सीरियामधून तुर्कीमध्ये, अफगाणिस्तानातून इराणमध्ये आणि पॅलेस्टाईनमधून जॉर्डनमध्ये बहुतांश मुस्लीम स्थलांतरित झालेले दिसतात. युरोपमधील मुस्लीम स्थलांतरितांच्या प्रश्नानेदेखील सध्या गंभीर रुप धारण केले असून, तेथील वाढत्या स्थलांतरितांच्या संख्येने कट्टरतावादाला खतपाणीच घातले आहे. युरोपचा विचार करता, जर्मनीमध्ये 3.7 दशलक्ष, फ्रान्समध्ये 2.6 दशलक्ष इतकी मुस्लीम स्थलांतरितांची संख्या असल्याचे समजते. अमेरिकेत हेच प्रमाण 3.6 दशलक्ष इतके आहे. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या 1990 ते 2020 दरम्यानच्या आकडेवारीनुसार, युरोपमध्ये वास्तव्य करणार्‍या मुस्लीम स्थलांतरितांची संख्या ही 20 टक्के असून, आशिया-प्रशांत क्षेत्रात हेच प्रमाण 24 टक्के इतके आहे.

असे असले तरी भारतातून स्थलांतर करणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याचे हेतुपुरस्सर एकाच आकडेवारीवर भर देऊन, दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही संकेतस्थळांनी केलेला दिसतो. या अहवालानुसार, भारतातून ‘जीसीसी’ अर्थात आखाती देशांमध्ये स्थलांतर करणार्‍यांची संख्या ही 9.9 दशलक्ष इतकी सर्वाधिक आहे. हे मान्य केले तरी यामागची कारणे ही आर्थिक आणि रोजगाराच्या संधींशी अधिक निगडित आहेत. परंतु, भारतामधील वाढत्या हिंदू राष्ट्रवादाच्या राजकीय प्रभावामुळे मुसलमान आणि ख्रिश्चन हे अल्पसंख्याक पलायन करीत असल्याचा या अहवालात तथ्यहीन दावा करणे, हे अतिशयोक्तीचेच ठरावे. कारण, केवळ मुस्लीम अथवा ख्रिश्चनच नाही, तर भारतातील हिंदूंनीही अर्थार्जनाच्या संधी लक्षात घेता, पाश्चिमात्त्य देशांमध्ये स्थायिक होणे पसंत केलेले दिसते. दुसरीकडे जगातील सर्वाधिक ख्रिश्चन स्थलांतरितांविषयी आणि दुसर्‍या क्रमांकावरील मुस्लीम स्थलांतराविषयी हा अहवाल सोयीस्करपणे आर्थिक पार्श्वभूमी, युद्धजन्यस्थिती अशी कारणे मांडताना दिसतो. तिथे कुठेही खालावलेल्या ख्रिश्चनांच्या आर्थिक स्थितीचा अथवा इस्लामिक दहशतवादाचा उल्लेखही नाही. मग नेमके या अहवालात केवळ भारताच्या स्थलांतराबाबतीत भाष्य करताना, अशाप्रकारे पूर्वग्रहदूषित आणि असत्य प्रमेयांच्या तर्कावर ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्याचे उद्योग नेमके कशासाठी?



विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची