कुशल वनाधिकारी

    21-Aug-2024   
Total Views |
forrest officer amit bhosale


वनसेवेतील कामामुळे आपल्या कार्यक्षेत्रात दरारा निर्माण करून, वनसंवर्धनाचे व्रत अंगीकारलेले साहाय्यक वनसंरक्षक अमित अशोक भोसले यांच्याविषयी...
 
काही वनाधिकारी वनसेवेतील आपल्या धडाकेबाज आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे आपापल्या कार्यक्षेत्रात वेगळी छाप पाडतात. याच अधिकार्‍यांच्या पंक्तीमधील हा एक वनाधिकारी. वन आणि वन्यजीव संवर्धन हेच ध्येय उराशी बाळगून त्या मार्गावर मार्गक्रमण करणारा. अतिक्रमण निर्मूलन, वन्यजीव पुनर्वसन, वनगुन्हे अशा वनविभागातील सर्व परिघांंमध्ये कामाचा अनुभव गाठीशी बांधून समोर आलेल्या प्रकरणांना धडाडीने सामोरा जाणारा हा अधिकारी म्हणजे अमित अशोक भोसले.

भोसले यांचा जन्म दि. 3 फेब्रुवारी, 1991 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बाशीर्र् तालुक्यामधील राळेरास या छोट्याशा खेडेगावात झाला. भोसले कुटुंब हे तसे मध्यमवर्गीय. वडील अशोक भोसले हे सरकारी साखर कारखान्यात नोकरी करायचे. त्यामुळे मुलाने कष्ट करून सरकारी नोकरीत जावे, ही त्यांची इच्छा. त्यांच्या या इच्छेवर मार्गक्रमण करत स्पर्धा परीक्षा देण्याकडे अमित यांचा कल निर्माण झाला. त्यांचे शालेय शिक्षण हे राळेरास या गावात पार पडले. पुढे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे शेळगाव आणि पदवीचे शिक्षण पुणे कृषी महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पूर्ण झाले. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून ‘जेनेटिक्स अ‍ॅण्ड प्लांट ब्रीडिंग’ या विषयातून पूर्ण केले. यासाठी त्यांना सुवर्णपदक मिळाले.

स्पर्धा परीक्षा देण्याकडेच कल असल्यामुळे पुण्यात असतानाच त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली होती. मात्र, वनसेवेमध्येच काम करण्याची चौकट त्यांनी या अभ्यासाला घातली नव्हती. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी नेटाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. 2013च्या सुमारास महाराष्ट्र प्रशासकीय सेवेची (एमपीएससी) परीक्षा दिली. मात्र, प्राथमिक फेरीत हाती अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता भोसले यांनी प्रयत्न सुरू ठेवले. 2014 साली त्यांनी पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली, मात्र यावेळी ती वनसेवेसाठी होती. ही परीक्षा त्यांच्या आयुष्याला आणि कुटुंबीयांच्या स्वप्नांना कलाटणी देणारी ठरली. कारण, या परीक्षेत उत्तीर्ण होत त्यांनी वनविभागात प्रवेश मिळवला आणि वनांसोबत त्यांची कायमची नाळ जोडली गेली.

2016 ते 2018 या दोन वर्षांत भोसले यांचे सांगलीतील कुंडलवन प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण पार पडले. 2018 साली ते वनविभागात रुजू झाले. त्यांनी ‘वनपरिक्षेत्र अधिकारी’ म्हणून चांदोली राष्ट्रीय उद्यानात काम करण्यास सुरुवात केली. वनविभागाच्या वन्यजीव विभागात आणि त्यातही संरक्षित वनक्षेत्रांमध्ये काम करणे म्हणजे तारेवरची कसरत. कारण, वन आणि वन्यजीव संवर्धनाबरोबरच अधिवासाचे पुनरुज्जीवन, पर्यटन, पुनर्वसन या सगळ्या घटकांवरच याठिकाणी काम करावे लागते. चांदोली भागात काम करू लागल्यावर भोसले यांनी प्रामुख्याने गावांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला वेग दिला.

राष्ट्रीय उद्यानातील गावांचे मूल्यांकन केले, पुनर्वसनासाठी आवश्यक असणार्‍या जमिनींची पाहणी केली, त्यासंबंधी प्रस्ताव तयार करून तो शासनासमोर सादर केला. याशिवाय, गवताळ कुरण विकास कार्यक्रम, वनकर्मचार्‍यांसाठी संरक्षण कुटींची निर्मिती, गस्त घालण्यासाठी रस्त्यांच्या निर्मितीसारखी कामे त्यांनी सक्रियपणे केली. त्यांच्याच कार्यकाळात 2018 मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघाचा वावर निदर्शनास आला. त्यावेळी या वाघाच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी भोसले यांनी आपल्या कर्मचार्‍यांसमवेत पार पाडली. 2021 साली त्यांची बदली मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून झाली. याठिकाणी रुजू झाल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला.

मलकापूर वनपरिक्षेत्रामध्ये शिकार्‍यांचा सुळसुळाट होता. त्यामुळे याठिकाणी रुजू झाल्यानंतर भोसले यांनी शिकारी मंडळींची धरपकड सुरू केली. वन आणि वन्यजीवांसंबंधी जवळपास 30 गुन्हे त्यांनी दाखल केले आणि त्यांनी त्यातून जवळपास 27 आरोपींना पकडले. त्यांच्याकडून सात बंदुका, 30 काडतुसे आणि पाच वाहने जप्त केली. वनक्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावून आणि नियमित रात्रगस्त घालून शिकारीवर आळा घातला. 13 हेक्टर वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण काढून ती जमीन अतिक्रमणमुक्त केली. विशालगड आणि आंबा या भागांतील अनियंत्रित पर्यटनाला नियंत्रणात आणण्याचे काम केले. आंबा-विशालगड रस्त्यावर वनव्यवस्थापन समितीच्या मदतीने चेक पोस्ट बसवून त्याठिकाणी तिकीट लावले. ज्यामुळे मानोली वनव्यवस्थापन समितीला महसूल मिळाला. वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या रस्त्यावर रात्रीची वाहतूक बंद केली.

भोसले यांनी मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनाही संवेदनशीलपणे हाताळल्या. वनपरिक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायती आणि इतर सरकारी विभागांशी समन्वय साधून त्यांनी या घटनांचे निवारण केले. वन्यजीवांकडून झालेल्या शेतपिकांचे नुकसान असो वा मानवी जीवितहानी त्यासंबंधीच्या कागदपत्रांची प्रक्रिया त्यांनी जलद केली. या माध्यमातून त्यांनी गेल्या वर्षभरात नुकसान झालेल्या लोकांना 58 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. वनपरिक्षेत्रामध्ये देशी झाडांचे वृक्षारोपण करण्याकडे त्यांचा कल राहिला आहे. कामाच्या या धडाक्यामुळे गेल्या आठवड्यात भोसले यांना साहाय्यक वनसंरक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. ठाणे वनविभागात ‘साहाय्यक वनसंरक्षक (सांख्यिकी)’ या पदावर ते रुजू झाले आहेत. कामाप्रति निष्ठा आणि धडाडीपणासाठी ओळखल्या जाणार्‍या या वनाधिकार्‍याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.