संसर्गाची महामारी, जगावर भारी

    20-Aug-2024   
Total Views |
world virus Infectious disease


‘कोरोना’, ‘झिका’, ‘इबोला’ आणि आता ‘एम-पॉक्स’ यांसारखे संसर्गजन्य आजार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ‘एम-पॉक्स’ला गेल्या दोन वर्षांत दुसर्‍यांदा ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे. यासारखे आजार अनेकदा आफ्रिकन किंवा आशियाई देशांतून येत असल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वृत्तानुसार, जागतिक स्तरावर भीती असलेले बहुतेक रोग आफ्रिकन किंवा आशियाई भागांत आढळून येतात. वास्तविक पाहता, आफ्रिकेत प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारे रोग अधिक दिसतात. गेल्या दहा वर्षांत त्यात 63 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

सध्या चर्चेत असलेल्या ‘एम-पॉक्स’बद्दल जाणून घ्यायचे झाल्यास हा एक विषाणूजन्य आजार आहे. ‘एम-पॉक्स’ला पूर्वी ‘मंकीपॉक्स’ म्हणून ओळखले जायचे. या विषाणूबाबत पहिल्यांदा माहिती मिळाली ती 1958 मध्ये. सध्या जगातील अनेक देशांमध्ये या विषाणूचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यास जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले असून याचे वर्गीकरण ’ग्रेड 3 आणीबाणी’ म्हणून करण्यात आले आहे. ‘ग्रेड 3’ म्हणजे याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. आत्तापर्यंत ‘एम-पॉक्स’ विषाणूची प्रकरणे फक्त आफ्रिकेत आढळत होती, परंतु आता आफ्रिकेबाहेरही त्याचे रुग्ण आढळू लागले आहेत.

‘एम-पॉक्स’ हा संक्रमित त्वचेच्या थेट संपर्काद्वारे एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील बहुतेक प्रकरणे संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांमध्ये दिसून आली आहेत. तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या सामान्य वस्तूंच्या वापरामुळेही हा संसर्ग पसरू शकतो. विषाणूशी लढण्याचा प्रयत्न करताना ‘लिम्फ नोड्स‘देखील फुगतात आणि क्वचित प्रसंगी हा विषाणू प्राणघातक ठरू शकतो. याची लागण झालेली व्यक्ती सुरुवातीच्या लक्षणांपासून पुरळ उठेपर्यंत आणि नंतर बरी होईपर्यंत अनेकांना संक्रमित करू शकते. ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’नुसार, व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 21 दिवसांच्या आत ‘एम-पॉक्स’ची लक्षणे दिसू लागतात.

आफ्रिकन किंवा आशियाई देशांत विशेषतः चीनमधून असे व्हायरस यापूर्वी आल्याचे आपण पाहिले आहे. त्यापैकी आफ्रिकन देशांमधून आलेल्यांमध्ये ‘अंथ्रेक्स’, ‘एविएन इन्फ्लुएंजा’, ‘कॉलरा’, ‘क्रीमियन कांगो हेमोरेजिक फीव्हर’, ‘डेंग्यू’, ‘हेपेटाइटिस बी’, ‘सी आणि ई’, ‘मंकीपॉक्स’, ‘प्लेग’, ‘रिफ्ट वैली फीव्हर’, ‘यलो फीव्हर’ आणि ‘झिका’ व्हायरस यांचा समावेश आहे. चीनच्या बाबतीत सांगायचे तर कोरोनाचा झालेला उद्रेक हे त्यापैकी ज्वलंत उदाहरण. कोरोनाची सुरुवात झाली ती वुहानमधून. ‘सिविअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ ज्याचा मृत्युदर जास्त होता, तो देखील दक्षिण चीनमध्ये प्रथमच दिसून आला होता.

आफ्रिकन देश आणि चीनसारख्या राष्ट्रांपासून असे आजार का पसरत असतील? असा विचार केल्यास याची अनेक कारणे असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे, इथली लोकसंख्या. त्यातच आता याठिकाणी स्थलांतराचेही प्रमाण वाढले आहे. नवीन येणार्‍यांना सामावून घेण्यासाठी जंगले तोडली जात आहेत. या प्रक्रियेत लोक थेट वन्य प्राण्यांच्या संपर्कात येतात. आफ्रिकन देश आणि चीनसारख्या देशांमध्ये प्राण्यांचे थेट बाजार उभारले जातात. चीनच्या वुहान येथील बाजारपेठेची बर्‍याचदा चर्चा होते. इथे विदेशी खाद्यपदार्थांच्या नावाखाली वटवाघूळ, साप असे जंगली प्राणी खाण्यासाठी ठेवलेले असतात. जागेच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या प्रजाती एकमेकांच्या जवळ ठेवल्या असल्याने किलर विषाणू एकातून दुसर्‍यामध्ये पसरतात.

त्याचबरोबर आफ्रिकेत असे अनेक भाग आहेत, जिथे लोक जंगलात जातात आणि शिकार केल्यानंतर,त्यांना शिजवण्याच्या प्रक्रियेत प्राण्यांच्या थेट संपर्कात येतात. हे ‘झुनोटिक’ रोगांचे प्रमुख कारण मानले जात असे. ‘एम-पॉक्स’साठी अद्याप कोणतेही विशिष्ट उपचार नाही. तथापि, जागतिक आरोग्य संघटना वेदना आणि ताप यांसारख्या लक्षणांवर औषध देण्याची शिफारस करते. जर एखाद्या रुग्णाची प्रतिकारशक्ती चांगली असेल आणि त्याला त्वचारोग नसेल, तर तो कोणत्याही उपचाराशिवाय बरा होऊ शकतो. त्यामुळे यावर विचार करून आफ्रिकन आणि चीनसारख्या राष्ट्रांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक