दाऊद शेखला अटक! पुढे काय?

    02-Aug-2024   
Total Views |
 
Dawood Sheikh
 
उरणमध्ये एका निष्पाप तरुणीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. आज सकाळीच पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक केलीये. दाऊदने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीये. मात्र, दाऊदला अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील अनेक बाबी उघड केल्या आहेत. हे प्रकरण लव्ह जिहादचं आहे की, आणखी काही यावरही पोलिसांनी भाष्य केलंय. दरम्यान, उरण हत्या प्रकरणातील आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत ते जाणून घेऊया.
 
उरणमध्ये राहणारी यशश्री शिंदे ही २२ वर्षीय तरुणी २५ जुलैला कामावर गेली आणि घरी परतलीच नाही. तिचा फोन बंद येत असल्याने तिच्या पालकांनी उरण पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानतंर २७ जुलै रोजी रेल्वे स्थानकाजवळीत एका झाडीत तिचा मृतदेह आढळला. या मृतदेहावर अनेक जखमा आणि चाकुचे वार होते. तिच्या छातीवर आणि गुप्तांगावर जखमा होत्या आणि तिचा चेहरा पुर्णपणे खराब झाला असून तिची ओळख पटणंही कठीण झालं होतं. मात्र, यशश्रीच्या पालकांना तिच्या कपड्यांवरून या मृतदेहाची ओळख पटली.
 
यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेखनेच आपल्या मुलीची हत्या केली असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. तेव्हापासूनच पोलिस त्याच्या शोधात होती. परंतू, या संपूर्ण घटनेनंतर आरोपी दाऊद शेख फरार झाला होता. मात्र, अखेर मंगळवारी सकाळी पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमधून अटक केलीये. दाऊदने अटकेनंतर आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली. त्यानंतर पोलिसांनी या हत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. यातली पहिली गोष्ट म्हणजे यशश्री शिंदे आणि दाऊद शेखमध्ये मैत्री असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. याच मैत्रीतून त्यांनी एकदा भेटण्याचं ठरवलं होतं. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये बोलणं झालं आणि ही घटना घडली, असं पोलिसांनी सांगितलंय.
 
दुसरी गोष्ट म्हणजे, मृत्यूनंतर यशश्रीच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा या चाकूच्या नसून प्राण्यांनी तिचा चेहरा खराब केल्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तवण्यात आलीये. अतिरिक्त पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद शेख कर्नाटकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बँगलोरमध्ये दोन आणि शाहापूर मध्ये दोन पोलिसांच्या टीम नेमल्या होत्या. याशिवाय त्यांना या प्रकरणात दोन ते तीन संशयित व्यक्ती आढळले होते. त्यांचीही चौकशी करण्यात आलीये. तसेच स्थानिकांच्या माध्यमातून पोलिसांनी सापळा रचून दाऊदला अटक केलीये. याशिवाय यशश्रीच्या शरीरावरील जखमा पाहता तिच्यावर बलात्कार झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये यशश्रीवर बलात्कार झाला नसल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीये. या संपूर्ण घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी यशश्रीच्या कुटुंबियांची भेट घेतली असून आरोपी दाऊद शेखवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केलीये.
 
२०१९ मध्ये यशश्री १५ वर्षांची असताना यशश्रीच्या वडिलांनी दाऊदच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी दाऊदवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटकही करण्यात आली होती. तिथून सुटका झाल्यावर तो कर्नाटकमध्ये गेला होता. त्यानंतर आता परत आल्यावर त्याने यशश्रीशी पुन्हा संपर्क केला. पोलिसांनी यशश्रीची कॉल हिस्र्ट्री चेक केल्यावर ती सतत एका नंबरवर बोलत असल्याचं त्यांना आढळलं. हा नंबर दुसऱ्या कुणाचा नाही तर दाऊदचाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या नंबरवरून अनेकदा यशश्री आणि दाऊदचं बोलणं झालं होतं. शिवाय मृत्यूच्या दिवशीचे यशश्री आणि दाऊदचे सीसीटीव्ही फुटेजही पुढे आलेत. यामध्ये यशश्री आणि दाऊद दोघंही एकाच रस्त्यावरून जात असल्याचं दिसतंय. परंतू, दाऊद शेखने इतक्या निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यामागे नेमकं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर तपासानंतरच पुढे येईल.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....