आजच नाही, तर अगदी प्रारंभीपासून अपप्रचाराविरुद्धची लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अगदी नेटाने लढली. गांधीहत्येच्या बेछूट आरोपांपासून ते संघबंदीच्या संकटातूनही संघ अगदी तावूनसुलाखून निघाला. वर्तमानातही संघावर असेच अपप्रचाराचे काळे ढग अधूनमधून घोंगावत असतात. अशाच काही संघाविषयीच्या ‘फेक नॅरेटिव्ह’चा पर्दाफाश करणारा हा लेख...
फ्रान्स आणि इंग्लंडचे निवडणूक निकाल एकप्रकारे ‘फेक नॅरेटिव्ह’ची शक्ती आणि डाव्या-इस्लामी इकोसिस्टीमचे आर्थिक वर्चस्वही दर्शवतात. ही व्यवस्था स्वार्थी आणि अनैतिक हेतूने जगावर राज्य करू पाहते. पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी त्यांनी भारतीय निवडणुकांमध्ये हेच डावपेच वापरले. ज्यांना दणदणीत विजयाची अपेक्षा होती, त्यांच्यासाठी ही मोठी निराशा असली, तरी अखेर सरकार स्थापन झाले. आज जेव्हा आपण जागतिक परिस्थिती पाहतो, तेव्हा मोदींनी तिसर्यांदा पंतप्रधान होणे, हा डाव्या-इस्लामी व्यवस्थेला मोठा धक्का आहे. पंतप्रधान मोदींचा २४० जागांवर विजय हिंदू समर्थक आणि विरोधी पक्ष पराभव म्हणून पाहत आहेत. त्यामुळे भाजपचा आकडा का घसरला, याचे विश्लेषण अजूनही सुरू आहे.
विरोधी पक्षांनी मते मिळवण्यासाठी जातीच्या आधारावर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा घाणेरडा खेळ यशस्वीपणे खेळला आणि आता निवडणुकीनंतर त्यांनी वेगवेगळ्या हिंदूंच्या विचारप्रक्रियेचे विश्लेषण करून हिंदू एकात्मता आणखीनच कमकुवत करणारी आणखी काही खोटी विधाने, विमर्श मांडले आहेत. कोणत्याही तथ्याधारित तपासाशिवाय तथाकथित हिंदू राष्ट्रवादी काही प्रसारमाध्यमांनी आणि विरोधी गटांनी मांडलेल्या खोट्या कथनांवर विश्वासही ठेवू लागले.सर्वात खेदजनक बाब म्हणजे, ते भाजपच्या खराब कामगिरीसाठी १९२५ सालापासून ‘राष्ट्र प्रथम’ या दृष्टिकोनातून हिंदू एकात्मतेसाठी काम करणार्या संघटनेवर टीका करत आहेत आणि दोष देत आहेत. खाली दिलेले काही खोटे विमर्श समाजात मुद्दाम पेरले जात आहेत. त्याचा समाचार घेणे म्हणूनच गरजेचे.
फेक नॅरेटिव्ह क्र. १. रा. स्व. संघाचे दोन प्रकार आहेत - भागवत संघ आणि मोदी संघ.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक विचारधारा आहे आणि सर्व स्वयंसेवकांना इथे एक व्यक्ती मानले जाते. लाखोस्वयंसेवक मूलतः वेगवेगळ्या शरीरात, पण एकच मन म्हणून समाजात कार्यरत असतात. मला खात्री आहे की, कोणत्याही संघटनेची एकसंध विचारधारानाही, जी व्यक्तिपरत्वे बदलत नाही. परंतु, संघात संघसंस्थापकापासून ते प्रत्येक स्वयंसेवकापर्यंत सर्वांची विचारसरणी सारखीच आहे. संघ देशासाठी जगतो आणि मरतो. संघामध्ये कोणत्याही व्यक्तीची पूजा केली जात नाही. ही मातृभूमी भारतमाता आहे, ज्याची स्वयंसेवक पूजा करतात. गुरुतत्व हा भगवा ध्वज आहे, जो या देशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि म्हणून तो गुरुसारखाच प्रेरणादायी आहे.
स्वार्थी, लोभी आणि हिंदुत्वद्वेष्ट्यांमध्ये एक गोष्ट सामाईक आहे - ते सरसंघचालकजींचे शब्द बदलून त्यांना एखाद्या विशिष्ट समुदायाविरुद्ध, धर्माविरुद्ध किंवा अलीकडे पंतप्रधान मोदींच्या विरोधात दर्शविण्याचे नाहक उद्योग करतात. निवडणूक निकालानंतर हिंदुत्ववादी शक्तींना एकाकी पाडणे, हा द्वेष करणार्यांचा मुख्य उद्देश आहे. तथापि, समस्या अशी आहे की, अनेक हिंदू राष्ट्रवादी जे पंतप्रधान मोदींचे समर्थक आहेत, ते अचूक माहिती मिळविण्याचा प्रयत्न न करता, सरसंघचालक आणि संघाला लक्ष्य करत आहेत. असेच एक उदाहरण डॉ. मोहनजी भागवत यांनी ग्रामीण विकास कार्यक्रमात मानवाच्या आध्यात्मिक प्रगती किंवा विकासाविषयी सांगितले. या भाषणाचा पंतप्रधान मोदींशी काहीही संबंध नव्हता. परंतु, माध्यमांनी या वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यासाठी मोहनजींच्या भाषणातील दोन-तीन ओळी घेतल्या, ज्यामुळे पंतप्रधान मोदींच्या समर्थकांमध्ये संतापाची भावना निर्माण होईल आणि तसेच घडले.
वस्तुस्थिती जाणून न घेता, अनेक हिंदू राष्ट्रवाद्यांनी विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरसंघचालकांचा अपमान करण्यास सुरुवात केली. हिंदुत्व किंवा पंतप्रधान मोदींवरील प्रेम हे वाखाणण्याजोगे आहे, पण काही माध्यमांच्या आणि विरोधकांच्या सापळ्यात अडकून आणि हिंदू शक्तींमध्ये फूट पाडण्यासाठी तयार केलेल्या अशा खोट्या विमर्शांवर घाईघाईने प्रतिक्रिया देण्याऐवजी, आपण जर खरे हिंदू राष्ट्रवादी असू, तर अगोदर सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे आणि मग त्यानुसार प्रतिक्रिया द्या. लक्षात ठेवा, द्वेष करणार्यांकडे गमावण्यासारखे काही नाही, पण हिंदू हजार वर्षांहून अधिक काळ गमावतच आला आहे. जयप्रकाश नारायण संघाबद्दल म्हणाले होते की, “संघ ही क्रांतिकारी संघटना आहे. देशातील इतर कोणतीही संस्था, संघटना याच्या जवळपासही फिरकू शकत नाही. संघातच समाजपरिवर्तनाची, जातीवाददूर करण्याची आणि गरिबांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची क्षमता आहे.”
फेक नॅरेटिव्ह क्र. २. टीम मोदीच्या खराब कामगिरीला संघ जबाबदार
लोकसभा निवडणुकीत ग्रामीण आणि गरीब मतदारांना फसवण्यासाठी विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात बनावट आणि खोट्या लघु चित्रपटांचा वापर केला. संविधान आणि आरक्षणाबाबत असाच एक खोटा व्हिडिओ सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आला. हा व्हिडिओ त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी याला आव्हान दिले आणि दावा केला की, तो खोटा आहे आणि आपण कधीही संविधान किंवा आरक्षणाविरोधात असं काहीही बोललो नाही. संघाचे स्वयंसेवक सातत्याने संविधानावर विश्वास ठेवतात आणि त्याचे पालनही करतात. रा. स्व. संघ ही संघटना ‘मूक पालक’ म्हणून नित्य कार्य करत आहे, जी समाजात वावरून समाजासाठी शांतपणे काम करण्यावर विश्वास ठेवते. त्यामुळे मूक व्यक्ती किंवा संघटनेवर चिखलफेक करणे तुलनेने सोपे आहे. परिणामी, काही स्वयंभू हिंदू राष्ट्रवादी आणि प्रसारमाध्यमांनी संघाला दोष देण्यास सुरुवात केली.
कारण काँग्रेस, डावे आणि इतर विरोधी पक्ष हे वास्तव स्वीकारण्यास असमर्थ आहेत की देशात अशी संघटना आहे, जी केवळ राष्ट्राचा सकारात्मक विचार करते आणि आपल्या नागरिकांच्या वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याचा विकास करण्यास तसेच राष्ट्रीय एकात्मतेसाठी मदत करते. देशाला जेव्हा गरज असते किंवा नैसर्गिक आपत्तींच्या काळात स्वयंसेवक धावून जातात. संघाचे एकच काम आहे, राष्ट्राच्या हितासाठी विचार करणे आणि कृती करणे. हजारो लोक प्रचारक म्हणून आजही कार्यरत आहेत, जे त्यागाचे जीवन जगतात आणि त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय राष्ट्रसेवा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नैसर्गिक आपत्तींवेळी किंवा राष्ट्राला आवश्यक असताना जात, धर्म, रंग किंवा पंथ यांचा कदापि विचार न करता, लोकांना मदत आणि समर्थन करण्यासाठी उपलब्ध असतो. चीन आणि पाकिस्तानविरुद्धची युद्धे, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या असंविधानिक आणीबाणीविरुद्धचा लढा, पंजाबमधील अशांततेच्या काळात शांतता प्रक्रिया आणि सामाजिक एकात्मता पुनर्संचयित करण्यासाठी केलेले प्रचंड काम... ही काही उदाहरणे आहेत.
फेक नॅरेटिव्ह क्र. ३. संघ विरोधी नेत्यांना पडद्याआडून मदत करतो
एखाद्या समीक्षकाच्या अज्ञानामुळे किंवा काही बालिश संज्ञानात्मक प्रक्रियेमुळे काही मंडळी असा विचित्र विचार करायलाही प्रवृत्त झाल्याची शक्यता जास्त असते. संघाने राष्ट्रीय अस्मिता, हिंदू प्रबोधन आणि एकात्मतेचा विचार कधीही सोडला नाही. हे संघाच्या गेल्या ९९ वर्षांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की, लाखो स्वयंसेवकांनी राष्ट्रासाठी आपल्या वैयक्तिक जीवनाचे बलिदान दिले. भारताची संस्कृती, कला आणि वारसा नष्ट करू पाहणार्यांना संघ नेहमीच विरोध करेल. भारताचे प्रतिनिधित्व बहुसंख्य हिंदू करतात. जर कोणी हिंदू किंवा भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा किंवा विघटन करण्याचा प्रयत्न केला, तर विरोधक कितीही शक्तिशाली असला, तरीही संघ विरोधात उभा राहील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नकारात्मक चित्रण करून सर्व भारतीयांच्या मनात भीती निर्माण करण्याचा त्यांचा जुना दृष्टिकोन कायम ठेवून द्वेष करणारे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या बहुतांश नेत्यांची पार्श्वभूमी रा. स्व. संघाची असल्याने हा दृष्टिकोन अप्रत्यक्षपणे भाजपच्या मतदारांच्या मनात भीती निर्माण करेल आणि अल्पसंख्याक भाजपविरोधात एकजुटीने राहतील याचीही खात्री होते.
फेक नॅरेटिव्ह क्र. ४. संघ सत्तेसाठी भुकेला असून सरकारला वेठीस धरायचे आहे
जर संघ सत्तेसाठी भुकेला असता, तर संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. श्री गोळवलकर गुरुजी यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची संघाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची विनंती आनंदाने मान्य केली असती. जर संघ राजकीय सत्तेसाठी हपापलेला असता, तर संघाला, त्याच्या संलग्न संस्था, संघटना आणि मजबूत सामाजिक बांधिलकीचा उपयोग करून सत्ता मिळविण्यासाठी राजकीय अजेंड्यावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते. परंतु, संघाची प्रारंभीपासूनच हिंदूंना एकत्र करून केवळ वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विकासाची दृष्टी आहे. भाजप किंवा जनसंघापूर्वी रा. स्व. संघ अस्तित्वात होता. खरे तर रा. स्व. संघ ही विविध क्षेत्रांत कार्यरत अनेक संघटनांची पालकसंस्था आहे, ज्याला ‘संघ परिवार’ म्हणून ओळखले जाते. संघ या संघटनांसाठी संरक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि संघाच्या सर्वोच्च कार्यकारिणीसोबत नियमितपणे त्यांच्या कार्याबद्दलच्या अद्यतनांवर चर्चा करण्यासाठी किंवा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन घेण्यासाठी बैठका घेतात.
संघ १९२५ सालापासून देशाची सेवा करत आहे. त्याबदल्यात कशाचीही अपेक्षा नाही. लोक स्वयंसेवक बनून संघ परिवाराचा हिस्सा बनतात. प्रचारक त्यांचे घर आणि कुटुंब सोडतात आणि नोकरीच्या आकांक्षा आणि वैवाहिक जीवनाचा त्याग करतात. संघ हा काळोख्या रात्रीचा चमकणारा तारा आहे. म्हणूनच प्रश्न असा आहे की, १९२५ सालापासून निःस्वार्थपणे देशसेवा करणार्या संघटनेवर विश्वास ठेवायचा की, दहशतवादी, नक्षलवादी, हिंदुत्वविरोधी गटांना समर्थन देणार्या आणि सामान्यतः मानवतेच्या विरोधात काम करणार्या पक्षांवर किंवा व्यक्तींवर विश्वास ठेवायचा? संघाचा द्वेष करणार्यांना मी एवढेच सांगेन की, तुम्ही संघात सामील व्हा आणि स्वतः अनुभव घ्या. अर्धसत्य आणि रचलेल्या खोट्या कथा समाज आणि राष्ट्रासाठी नेहमीच हानीकारक असतात. चला अनुभव घेऊया आणि मग ‘राष्ट्र प्रथम, बाकी सर्व दुय्यम’ या ब्रीदवाक्याखाली स्वतःला योग्यरित्या व्यक्त करूया.