अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यात काय घडलं?

    02-Aug-2024   
Total Views |

Amol Mitkari
 
 
विधानसभा निवडणूकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. साहाजिकच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी कंबर कसलीये. मात्र, राज्यातील वातावरण सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलंय. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेला हल्ला आणि या हल्लानंतर दोन्ही पक्षांमध्ये पेटलेलं राजकारण. होय.. मनसे पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरीच्या गाडीवर हल्ला केला. एवढंच नाही तर या राड्यात एका मनसैनिकाचा जीवही गेला. पण हा हल्ला करण्यामागे नेमकं कारण काय? अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये काय घडलं? आणि या राड्यानंतर राजकारण कसं रंगलंय ते जाणून घेऊया.
 
मंगळवार, दि. ३० जुलै रोजी अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर अचानक काही अज्ञात व्यक्तींनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून टाकल्या. त्यानंतर काही वेळात कळलं की, हा हल्ला करणारी माणसं मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. आता त्यांनी हा हल्ला का केला असावा? त्याचं झालं असं की, पुण्यातील पूर परिस्थितीवरून राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. "पुण्यात धरणाचं एवढं पाणी सोडणार याची लोकांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरलंय. आपापसातले हेवेदावे सोडून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसल्यास या शहराचा प्रश्न सुटेल. आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. यातले एक तर पुण्याचेच आहेत. म्हणजे ते नसतानाही धरण वाहिलंय. एवढं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का?," असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली होती. शिवाय त्याआधी मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यातही राज ठाकरेंनी लाडकी बहिण योजनेवरून अजित पवारांवर निशाणा साधला होता. "लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते," अशी टीका त्यांनी केली होती.
 
या सगळ्या घटनेनंतर अमोल मिटकरींनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. "दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारीबहाद्दर टोलनाका, भोंगा असं कुठलंच आंदोलन जीवनात यशस्वी करु शकले नाहीत. त्यामुळे या व्यक्तीची विश्वासार्हता संपलेली आहे," अशी टीका मिटकरींनी राज ठाकरेंवर केली होती. याचाच राग डोक्यात ठेवून मंगळवारी अकोल्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. या राड्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तोडफोड राड्यानंतर मनसे पदाधिकारी जय मालोकर यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतू, तेवढ्यात त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला झाला. या राड्यानंतर १३ मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत तर २ जणांना अटकही करण्यात आलीये.
 
त्यानंतर आता या हल्ल्याचे मास्टरमाईंड राज ठाकरेच असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय. त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केलीये. दुसरीकडे, मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येतीये. एवढंच नाही तर मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी पुढच्या आठ दिवसांत अमोल मिटकरी जिथे भेटतील तिथे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुडवणार असं म्हणत थेट धमकीच दिलीये. शिवाय त्यांनी जर तुडवलं नाही तर त्यांना पदमुक्त करण्याची जबाबदारी माझी आहे, असंही त्यांनी म्हटलंय. साहेबांना जो कुणी आडवा येईल त्याला सोडणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिलीये. या प्रकारानंतर अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये चांगलंच बिनसल्याचं दिसतंय. आपल्यावर चाकू आणि अॅसिड हल्ल्याचा डाव असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय.
 
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी "ध्येय स्पष्ट असताना कधी दोन पावलं पुढे तर कधी दोन पावलं मागे टाकावी लागतात. त्यामुळे एकजूटीने लढा," असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र, त्यानंतर आता मनसे आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमधील या राड्याने सध्या वातावरण चांगलंच तापलंय. यावर अजित पवार आणि राज ठाकरेंनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणावर ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....