रक्षाबंधन हा भाऊबहिणीच्या नात्याचा एक पवित्र सण. खरे तर भावंडे ही एकमेकांच्या सोबतच मोठी होत असतात. भांडतात, रडतात आणि प्रेमाने नांदतात, एकमेकांचा आधार होतात. खेळातही अशा अनेक भावंडांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. ते एकमेकांबरोबर खेळतात आणि एकत्र पाहिलेली स्वप्ने साकार करतात. अशा भावंडांच्या जोडीचा घेतलेला आढावा...
सर्वप्रथम रक्षाबंधन सणाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा ! जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात सुरू झालेल्या ऑलिम्पिक सणाचा सोहळा, ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात संपन्न झाला. तो क्रीडा सोहळा संपत आहे, तोच स्वातंत्र्यदिन साजरा होताना दिल्लीतील मुख्य कार्यक्रमात पॅरिस ऑलिम्पिकपटूंचा चमू आपण बघितला. पाठोपाठ, आता तिथीनुसार श्रावण पौर्णिमेला येणारा नारळी पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. आबालवृद्ध या दोनही महिन्यांतील सणसमारंभात समरस होऊन गेलेले आपण बघत असतो. श्रावणात येणार्या नागपंचमीला तसेच, मंगळागौर अशा सणसमारंभात मुख्यत्वे महिलांना आपलं घरगुती क्रीडानैपुण्य प्रदर्शित करण्याची नामी संधी मिळत असते. त्यात प्रत्यक्ष सहभाग न घेता, घरातली पुरुष मंडळी त्या महिलांच्या सादरीकरणाला बाहेरूनच पाठिंबा देत असतात. त्या कौटुंबिक सोहळ्यातील खेळांचा आनंद घेणारी घरोघरची भाऊराय मंडळी आपल्या बहिणाबाईंना समाधानी ठेवण्याची संधी साधत असतात.
खडकीवगळता पुण्यातील एकमेव असलेल्या स.प. महाविद्यालयाच्या मैदानावरील आमच्या हॉकी क्लबकडून तसेच राष्ट्रीय स्पर्धांमधून खेळणार्या उल्का आणि उषा बर्वे भगिनी ही बहिणींची जोडी, आणि आधीच्या जनसंघाच्या रामभाऊ म्हाळगी यांच्या नारायणपेठेतील वाड्यातील अवि आणि रवि गाडगीळ बंधू, शुक्रवारातील राजू आणि प्रवीण जोशी बंधू,अशी भावाभावांची जोडगोळी मला अजून आठवते. मैदानावरील खेळाडूंचे ते एक मोठे कुटुंबच असे की, ज्यात मुलं-मुली एकत्र हॉकी खेळायचे. पुण्यातील जवळपास सर्वच पेठांमधून त्या काळीदेखील भावंडे मोकळ्या मैदानांवर खेळायला येत असत, आणि पालकदेखील त्यांना आवर्जून पाठवत असत. आज चित्र बदललेले दिसते. असो! तर, मुद्दा असा आहे की, आज समाज बदलत चालला आहे.
एका चौकोनी कुटुंबात आज जास्तीतजास्त दोन अपत्ये आढळतात. त्या दोन भावंडांमध्ये जर एक बहीण आणि एक भाऊ असेल, तर उत्तमच. ही भावंडे मग सख्खी असोत अथवा चुलत, मामे, अगदी मानलेलीही असोत, त्या भावंडांना खेळण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. त्या भावंडांच्या जोडगोळीत भाऊ-बहीण हे संमिश्रण आढळलं तर ते उत्तमच मानलं जातं. राखी पौर्णिमेचा सण आपल्या संस्कृतीत साजरा होतोच होतो. पण, त्या भावंडांत फक्त भाऊ-भाऊ किंवा फक्त बहिणी-बहिणी असतील, तरी काही फरक पडत नसतो. भावाबहिणींच्या नात्यासारखेच संस्कारक्षम सण त्यांच्यातही साजरे होत असतात. आज एक बहीण आपल्या दुसर्या बहिणीला तसेच, एक भाऊ आपल्या दुसर्या भावाला रक्षाबंधन करताना आपल्याला दिसतात. भावंडांमधील नातं शब्दांत सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या भावासोबत दिवसभर भांडू शकता, पण जेव्हा तुम्ही काही गडबड करता गोंधळ घालता, तेव्हा तुमच्या पाठीशी ते नक्कीच पहिले असतील. हेच विचार कुटुंबातून विश्वबंधुत्वात रुजत असतात आणि, हेच बंधुत्व आपल्याला खेळ शिकवतात. असे कौटुंबिक सहजीवन आपल्याला देशविदेशातील क्रीडा क्षेत्रात मात्र नक्की आढळतं.
अशा क्रीडा क्षेत्रातील भावंडांच्या सहजीवनातील, काही मोजक्या भावंडांच्या जोड्यांच्या आठवणी आज आपण, या राखीपौर्णिमेच्या अनुषंगाने काढत आहोत. प्रारंभी, भारतीय क्रीडा क्षेत्रातील अष्टभावंडांची आठवण काढू.
1) असुंता लाक्रा ही झारखंडच्या ओराव जमातीच्या जनजाती क्षेत्रातून आलेली हॉकीपटू. दोन आंतरराष्ट्रीय हॉकीपटू असलेले, बिमल लाक्रा आणि थोरला बीरेंद्र लाक्रा यांची ही बहीण त्यांना रक्षाबंधनाला राखी बांधत आली आहे. या भावांनी आपल्यासमवेत आपल्या लाडक्या बहिणीलाही हॉकीत आपल्यासारखेच घडवलं. त्यांच्या गावात क्वचितच काही सुविधा होत्या. ती भावंडे झाडाच्या फांद्यांमधून हॉकी स्टिक्स बनवायचे, आणि वाळलेल्या किंवा पिकलेल्या शरीफापासून (कस्टर्ड सफरचंद) चेंडू बनवायचे. त्या भावांनी आपल्या बहिणीला नेहमी तिच्या गुणांची कदर करत, तिला प्रोत्साहित करत, एक अद्वितीय खेळाडू बनवले.
आज ही भावंडे देशाचे नाव उज्ज्वल करत ऑलिम्पिकपटू म्हणून जगद्विख्यात झाली आहेत. भारताच्या आदिवासी तरुणांसाठी प्रेरणास्थान होण्याच्या अतिरिक्त जबाबदारीची जाणीव असलेली ही ऑलिम्पिकपटू भावंडे, आपली ओवाळणी भारतमातेलाही नक्कीच अर्पण करत असतील. 2) तसेच वैशाली आणि प्रज्ञानंद बुद्धिबळाच्या खेळातली भाऊ-बहिणीची पहिली 3) ग्रॅण्डमास्टर जोडी.ध्यानचंद आणि रूपसिंग बंधू हे भारतीय हॉकीतील बंधू. 4) बडोद्याचे क्रिकेटपटू असणार्या हार्दिक आणि कृणाल पांड्या बंधूंचे नाव माहीत नसलेला क्रीडाप्रेमी विरळाच असेल. 5)बडोद्याचे इरफान आणि युसूफ पठाण बंधू सर्वांनाच माहित आहेत. 6)दिव्या, प्रशांती, आकांक्षा, प्रतिमा आणि प्रियंका या बास्केटबॉल कोर्ट गाजवणार्या उत्तर प्रदेशच्या सिंग भगिनी. 7)आजकाल महिला कुस्तीत सुप्रसिद्ध आहेत, त्या गीता, बबीता, रितू आणि संगीता अशा हरियाणाच्या चार फोगाट भगिनी.
8)कोलकाताचे डोला आणि राहुल बॅनर्जी हे बहीण-भाऊ धनुर्विद्येत जगप्रसिद्ध आहेत.या काही आठ जोडगोळ्यांसारखी अजूनही कितीतरी भावंडांची यादी करता येईल.
आपल्या जीवनात मित्र असणे आपण जितकं भाग्याचे समजतो, तितकेच भाऊ-बहीण असणंही भाग्याचे मानले जाते. राखीपौर्णिमेचा दिवस, अशाच लोकांना समर्पित असतो. ’एक भाऊ एक हजार मित्रांपेक्षा चांगला असतो’, अशी एक म्हण आहे. कुटुंबात एक तेजस्वी तारा असतो, जो त्या कुटुंबाला अभिमानास्पद बनवतो. पण जर त्याची संख्या दुप्पट करता आली तर, कुटुंबातील सदस्यांचा आनंद आपोआप दुप्पट होणार नाही का? ज्या भावंडांत शत्रुता असते ती दुर्दैवी कुटुंब वगळता, सुखेनैव जगणार्या भावंडांची टोळी एकत्र काम करते तेव्हा त्यांची शक्ती वाढत असते. जानेवारी 2023 ला ओडिशात झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धा मला आठवतात, कारण त्यात काही विदेशी भावंडे त्या स्पर्धेत होती. अनेक संघांमध्ये दोन सख्खे भाऊही होते. अशी भावंडं जेव्हा एकत्र खेळत असतात, तेव्हा त्यांना वाईट काळात एकमेकांचा भावनिक आधार मिळत असतो. ओडिशाातील त्या विश्वचषक स्पर्धेत अनेक भावांच्या जोड्या खेळल्या होत्या. त्या ओडिशा विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात स्पेनचा 2-0 असा पराभव केला होता, तेव्हा त्या संघात पाऊ कुनिल आणि पेपे कुनिल हे भाऊ एकत्र खेळत होते. जेरेथ फर्लाँग आणि रोडरी फर्लाँग हे देखील, वेल्स संघात एकत्र खेळले होते. हा संघ सुरुवातीलाच स्पर्धेबाहेर पडला मात्र, या भावांनी एकमेकांना सावरले होते. भुवनेश्वरमधील जर्मन संघात मॅट्स आणि टॉम ग्रॅम्बुश या भावांचाही समावेश होता, ज्यांच्या संघाने पहिल्या सामन्यात जपानचा 3-0 असा पराभव केला होता. विजयाचा आनंद स्वतःच्या भावाबरोबर साजरा करण्याचा आनंदही काही औरच असतो. एवढ्या मोठ्या स्पर्धेत कुटुंबातील कोणीतरी एकत्र खेळणे, भावनिकदृष्ट्या खूप मदत करते. वाईट काळात तुम्हाला साथ देण्यासोबतच, तो तुमचा आत्मविश्वास वाढवतो. पॉ आणि पेपे हे दोघेही स्पेनमधील एकाच क्लब थलेटिक टेरासा संघाकडून खेळतात. त्यांचा एक चुलत भाऊ गेरार्ड क्लेप्स हा देखील स्पॅनिश संघात आहे. त्यांचे आजोबा, वडील आणि आई हॉकी खेळायचे,
जणू ते एक हॉकी कुटुंबच आहे. एकाच कुटुंबातील जेरेमी हेवर्ड आणि लिओन हेवर्ड या सख्ख्या भावांना, वेगवेगळ्या देशांसाठी विश्वचषक जिंकायचा होता. त्यापैकी जेरेमी ऑस्ट्रेलियाकडून खेळत होता, तर लिओन न्यूझीलंडसाठी भाग घेत होता. लिओन आणि जेरेमी या दोघांचा जन्म ऑस्ट्रेलियाचाच. हे दोन्ही भाऊ सुरुवातीला ते ऑस्ट्रेलियासाठी खेळत होते. लिओन हा जेरेमीचा मोठा भाऊ असून, तो गोलरक्षक आहे. तर, जेरेमी त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे, आणि तो बचावफळीत खेळतो. त्याचे वडील ब्रॅड हेवर्ड ऑस्ट्रेलियाचे रहिवासी आहेत, तर आई एली हेवर्ड मूळची न्यूझीलंडची रहिवासी आहे. त्यामुळे लिओन दोन्ही देशांकडून खेळण्यास पात्र आहे. अशा भावंडांच्या जोड्यांची खासियत म्हणजे, ते आयुष्यभर एकत्र काम करत असतात आणि ही भावंडं एकमेकांना अंतर्बाह्य जाणून असतात.
नुकत्याच झालेल्या 2024 टोकियो ऑलिम्पिकमध्ये, 24 उत्साही भावंडे अशी आढळली आहेत की, ज्यांनी जगभरातील विविध खेळांमध्ये सहभाग घेतला आहे. सर्वात जास्त भावंडे ही, ग्रेट ब्रिटन संघात होता. त्यात 3 जुळ्या जोड्यांसह 9 जोड्या सहभागी झाल्या होत्या. 2024 टोकियो ऑलिम्पिकमधली भावंडं कोणती होती, ते थोडक्यात बघू. :
1) नेदरलँड्सच्या सॅने आणि लीके या वेव्हर्स भगिनी. यांचा टोकियोनंतर पॅरिसमधील जिम्नॅस्टिक्समधला दुसरा सहभाग होता.
2) वॉटरपोलोत सहभाग घेतलेल्या मेकेन्झी आणि आरिया फिशर या अमेरिकन भगिनी.
3) सॉकरच्या खेळात क्रिस्टी आणि सॅम या मेविस भगिनींनी अमेरिकेकडून सहभाग घेतला होता.
4) नेली आणि जेसिका या अमेरिकन भगिनींनी गोल्फमध्ये सहभाग घेतला होता.
6) एरिक शोजी आणि काविका शोजी हे अमेरिकन बंधू इनडोअर व्हॉलीबॉलमध्ये खेळून गेले.
6) अमेरिकेकडून पॅरिस ऑलिम्पिकच्या तलवारबाजी क्रीडाप्रकारात उतरलेल्या केली आणि कोर्टनी या हर्ले बहिणी.
7) आयन्सले आणि ट्रेंट थॉर्प हे ट्रायथलॉनमधले न्यूझीलंडचे बहीण-भाऊ
8) ब्रोंटे आणि केट कॅम्पबेल बहिणीबहिणी, खेळ : जलतरण देश : न्यूझीलंड.
9) सिमे आणि मिहोविल फॅन्टेला बंधू खेळ : नौकानयन देश : क्रोएशिया.
10) लॉरा आणि शार्लोट ट्रेम्बल जुळ्या भगिनी स्पोर्ट : सिंक्रोनाइझ स्विमिंग, देश : फ्रान्स.
11) ना-मारिया आणि इरिनी अलेक्झांड्री स्पोर्ट : ड्युएट सिंक्रोनाइझ स्विमिंग देश : ऑस्ट्रियाच्या भगिनी.
12) पॉ आणि मार्क गॅसोल बंधू खेळ बास्केटबॉल देश: स्पेन
13) जॉयला आणि ट्रॉय पिना हे बहीण-भाऊ खेळ: जलतरण देश: केप वर्दे
14) हेन्री आणि जॅक्सन लेव्हरेट बंधू खेळ नेमबाजी देश: अमेरिका
15) ट्विन्स जुळे भाऊ पॅट आणि ल्यूक मॅककॉमक खेर्ळ: बॉक्सिंग देश: ग्रेट ब्रिटन
16) मॅक्स आणि जो लिचफिल्ड बंधू खेळ: जलतरण, देश: ग्रेट ब्रिटन
17) एमिली आणि टॉम फोर्ड खेळ: रोइंग देश: ग्रेट ब्रिटन.
18) मॅथिल्डा आणि शार्लोट हॉजकिन्स-बायर्न भगिनी खेळ: रोइंग देश: ग्रेट ब्रिटन
19) हॅरी आणि हॅना मार्टिन खेळ: हॉकी देश: ग्रेट ब्रिटन भाऊ बहीण
20) डम आणि सायमन येट्स (जुळे) खेळ: सायकलिंग देश: ग्रेट ब्रिटन. या दोघांना ओळखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांचे दात तपासणे.
21) जोडी आणि हॅना विल्यम्स खेळ : ट्रॅक आणि फील्ड देश: ग्रेट ब्रिटन 4÷400 मीटर रिले
22) एकमेकींच्या प्रतिस्पर्धी बहिणी टिफनी पोर्टर आणि सिंडी सेम्बर. दोघींपैकी कोणी चौथे तर कोणी सातवे स्थान पटकावते.
अडथळ्यांच्या शर्यतीत ग्रेट ब्रिटनकडून खेळणार्या भगिनी.
23)जेनिफर आणि जेसिका गादिरोवा खेळ: जिम्नॅस्टिक्स देश: ग्रेट ब्रिटनच्या जुळ्या भगिनी.
24) एट्स आणि डेनिझ सिनार बंधू सेलिंग देश: तुर्की.
तर, अशी ही विदेशी भावंडं एकत्र खेळत आपले सारे कुटुंबच आनंदी ठेवत आहेत.
या लेखात वर आपण भारतातील आणि विदेशातील बहीण-भावांची नाती पाहिली. या वसुधैवकुटुंबकम संकल्पनेतील भावंडं म्हणजे आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे आहोत, म्हणून आपण परस्परांचे बंधू आहोत, असे तत्त्वज्ञान आपल्या संत-महंतांनी सांगितले आहे. या तत्त्वाच्या आधाराने आचरण करणारे समाजबांधवही आपल्या क्रीडाक्षेत्रात आपण पाहत असतो. ऑलिम्पिक सोहळ्यात आपण याच बंधुतेचा अनुभव घेत असतो. तेव्हा समस्त क्रीडाविश्वातील भावंडे देश-विदेशातील भावंडांना या रक्षाबंधनाच्या सणाला शुभेच्छा देऊ.
इति!
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704