'आपली शक्ती एकात्मतेत असून एकतेच्या बळावर......'; पंतप्रधान मोदींचे ग्लोबल साऊथ परिषदेत आवाहन
17-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : 'व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ' कॉन्फरन्स हे एक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ बनले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल साऊथ कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या व्यासपीठावरून लोकांच्या गरजा आणि आकांक्षांना आवाज देण्यात येतो जो आजपर्यंत ऐकला गेला नाही आहे. आपली शक्ती एकात्मतेत असून एकतेच्या बळावर नवीन दिशेने वाटचाल करू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
दरम्यान, 'ग्लोबल साउथ' हा शब्द सामान्यतः आर्थिकदृष्ट्या कमी विकसित देशांसाठी वापरला जातो. तसेच, 'ग्लोबल साऊथ' परिषद विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चेचे व्यासपीठ बनले आहे. भारताने विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून जी २० परिषद पुढे नेली आणि याच नेतृत्वाखाली 'ग्लोबल साऊथ'च्या अपेक्षा, आकांक्षा आणि प्राधान्यांवर आधारित अजेंडा तयार केला आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, सध्या अनिश्चिततेचे वातावरण असून आपण अन्न, आरोग्य, ऊर्जा सुरक्षा या समस्यांना तोंड देत आहोत. असे सांगत 'ग्लोबल साऊथ'समोरील आव्हानांवर त्यांनी भाष्य केले आहे. त्याचबरोबर, दहशतवाद, अतिरेकी आणि फुटीरतावाद हे आपल्या समाजासाठी गंभीर धोका असल्याचे नमूद करताना गेल्या शतकात जागतिक स्तरावर प्रशासनाचे प्रश्न हाताळण्यासाठी स्थापन झालेल्या संस्था सध्याच्या शतकातील आव्हाने पेलण्यास असमर्थ आहेत, असेही त्यांनी सांगितले.