मुख्यमंत्री पदावरून मविआत घमासान!

    17-Aug-2024   
Total Views |
 
MVA
 
सध्या राज्यभरात चर्चा आहे ती उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीची. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या (मविआ) हालचाली सुरु झाल्यात. त्यासाठी दौरे, बैठका आणि सभाही घेतल्या जाताहेत. अशातच उद्धव ठाकरेंनी केलेला तीन दिवसीय दिल्ली दौरा आणि या दौऱ्यात घेतलेली काँग्रेस श्रेष्ठींची भेट चांगलीच गाजतीये. या भेटीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी गळ घातल्याची चर्चा सुरुये. शिवाय संजय राऊतांकडून होत असलेली महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणीही सर्वपरिचित आहेच. मात्र, काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे संजय राऊतांचा डाव चांगलाच ओळखून असल्यानं त्यांनी यावर सडेतोड उत्तर दिलंय. तर मुख्यमंत्रीपदावरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये पेटलेला वाद आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत नसलेली एकवाक्यता या सगळ्याचा मविआवर काय परिणाम होणार? याबद्दल जाणून घेऊया.
 
उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे नुकताच तीन दिवसीय दिल्ली दौरा करून परतलेत. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार, दिग्विजय सिंह, मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी यांच्यासह इंडी आघाडीच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दिल्लीदौरा होता. विधानसभेचं जागावाटप आणि विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट होती, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. परंतू, महाविकास आघाडीत उबाठा गटाला मोठा भाऊ म्हणून स्थान मिळावं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करावं यासाठीच हा दौरा असल्याच्या चर्चा आहे.
 
याबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं असता ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पण महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून निवडणूकीला सामोरं जात असताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे ठेवत नाही, अशी परंपरा आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी मान्यता मिळेल असं मला वाटत नाही. निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळतं, अशी परंपरा आहे. कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचं हे त्या पक्षातील नेते ठरवतात. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही," असं ते म्हणाले.
 
यावर संजय राऊतांनी मात्र परस्परविरोधी मत दिलं. "आम्ही दिल्लीत चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काही वेगळ्या गोष्टी ठरल्यात. पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणूकीत राहूल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहरा झाले असते तर नक्कीच अनेक जागांवर भाजपचा पराभव करु शकलो असतो, असं आम्ही वारंवार सांगितलं. निवडणूकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांकडे चेहरा असावा लागतो," असं राऊत म्हणाले. त्यामुळे मविआच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट होतंय.
 
शिवाय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरविण्यासाठी आग्रह का करत आहेत? असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर याचं कारण म्हणजे काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे हायकमांडच्या निर्णयावर चालतो. काँग्रेसने आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला तर त्यांना तो त्यांच्या पक्षातीलच द्यावा लागेल. तसं केलं तर त्यांना स्वपक्षीयांसह ठाकरे-पवारांचीही नाराजी सहन करावी लागेल. ज्यावेळी उद्धव ठाकरेंना ही पोकळी निर्माण होताना दिसली त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याची सूप्त महत्त्वाकांशी ईच्छा बोलून दाखवली. शिवाय शरद पवार काही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवतील, अशी गोष्ट नाही. त्यामुळे ठाकरेंच्या या निर्णयात स्वतः शरद पवारांची साथ त्यांना नाहीच. पवार हे निवडणूक निकालानंतर जो कल दिसेल त्यावर निर्णय घेणारे नेते आहेत.
 
पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्थिती यापेक्षा उलट आहे. ठाकरेंच्या पक्षाला निवडणूकीसाठी चेहरा लागतो. मात्र, त्यांच्याकडे सध्या मुख्यमंत्रीपदासाठी दोनच चेहरे आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे आदित्य ठाकरे. उबाठा गटाचा केडर किंवा कुठलाही मोठा नेता असेल तर त्याला या दोन चेहऱ्यांना मानावंच लागतं. त्यांच्या पुढे जाऊन पक्षात निर्णय घेता येत नाहीत.
दुसरीकडे, एकनाथ शिंदेंनी दिलेल्या धक्क्यातून सावरायचं असेल तर मुख्यमंत्रीपद किती महत्त्वाचं आहे, हे उद्धव ठाकरेंनाही एव्हाना कळून चुकलंय. शिवाय सहानुभूतीच्या लाटेचं भांडवल करायला उद्धव ठाकरे विसरणार नाहीत. त्यांना काहीही करुन महाराष्ट्रात ही विधानसभा करो या मरोच्या लढाईने लढवायचीये. एवढंच नाही तर, महाविकास आघाडीला कधी नव्हे तो या लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा फायदा झाला हेही ठाकरे ओळखून आहेत. त्यामुळेच इतका आक्रळस्तेपणा दाखवून ते देवेंद्र फडणवीसांविरोधात वक्तव्ये करत आहेत.
 
काँग्रेसचं बघायचं झाल्यास, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सध्या नेतृत्त्व नाहीये. जे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना नाना पटोलेंचे नेतृत्व मान्य आहेच, असं नाही. शिवाय प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसमध्ये उडालेले अंतर्गत खटके यापूर्वीही आपण पाहिले आहेतच. त्यामुळे आता हा प्रश्न पडतोय की, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा हा अट्टाहास कोणी पूर्ण करणार की, ठाकरे महाविकास आघाडीतून स्वतंत्र चूल मांडणार?
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....