महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही हे वक्तव्य आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं. आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज ठाकरेंनी चांगलीच कंबर कसलीये. यानिमित्ताने राज्यभरात त्यांनी दौरेही सुरु केलेत. अशातच त्यांनी आरक्षणाबाबत हे वक्तव्य केल्यानं ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या या विधानावर अनेकांकडून टीकाही करण्यात येतीये. तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? त्यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात खरंच आरक्षणाची गरज नाहीये का? आणि त्यांनी कोणत्या आधारे हे वक्तव्य केलंय? याबद्दल जाणून घेऊया.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच सोमवार, ५ ऑगस्ट रोजी त्यांनी सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या मणिपूर मुद्यावरही भाष्य केलं. शरद पवारांनी याला हातभार लावू नये. महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यायला हवी," असे ते म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी राज ठाकरेंना मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, "मला जातीतलं काहीच कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही. पण महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, इथे आरक्षणाची गरजच नाही," असं म्हणत त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील विकासकामांचा दाखला दिला.
राज ठाकरे म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या सगळ्या भागात फ्लायओव्हर्स किंवा इतर गोष्टी या मुळच्या लोकसंख्येसाठी होत नाहीत तर बाहेरून आलेल्या लोकांसाठी होतात. ठाणे जिल्हा हा देशातील एकमेव जिल्हा आहे ज्यात ७ ते ८ महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली नाही तर बाहेरुन येणाऱ्या लोकांचा लोंढा खूप मोठा आहे. त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा खर्च होतो," असं ते म्हणाले. राज ठाकरेंच्या या विधानाचा राज्यभरात अनेकांकडून विरोध करण्यात आलाय.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सध्या आरक्षण बचाओ या मोहिमेकरिता राज्यभर दौरे करताहेत. दरम्यान, त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय. ते म्हणाले की, राज ठाकरेंवर टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशा लोकांना सरळ आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. महाराष्ट्रातला माणूससुद्धा युपी, ओडीसा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आहे. त्यांचं काय करायचं? राज ठाकरेंचं वक्तव्य हे समाज दुभंगणारं आहे. समाज दुभंगला की, देश दुभंगतो. त्यामुळे त्यांच्यावर युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट लावण्याची मागणी त्यांनी केलीये. तर दुसरीकडे, ज्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, त्यांच्यावर आम्ही काही बोलत नाही. ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्याकडे जायचं नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीये.
याचदिवशी राज ठाकरे धाराशिवमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात काही कार्यकत्यांनी या हॉटेलला घेराव घातला. त्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजीही केली. परिणामी राज ठाकरे खाली उतरले. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर राज ठाकरेंनी या आंदोलकांना चर्चा करण्यासाठी बोलवलं. "हे लोकं तुमची मागणी पुर्ण करणार नाहीत. त्यांच्या मनात केवळ तुमची माथी भडकवणं आणि मतं मिळवणं एवढंच आहे. उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं तर महाराष्ट्रात कुणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही. आपली मराठी मुलं आणि शेतकऱ्यांवर जो पैसा खर्च व्हायला हवा तो नको त्या लोकांवर खर्च होतोय, असं म्हणत राज ठाकरेंनी मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचं या आंदोलकांना सांगितलं. तसंच मनोज जरांगेंशी बोलल्यानंतर आपली भूमिका जाहीर करण्याचं आश्वासनही दिलं.
महाराष्ट्रात अजूनही बहुसंख्य कुटंब दारिद्र्यरेषेखाली आहे. अशात जर महाराष्ट्रात आरक्षण नसेल तर ग्रामीण भागातील गोरगरीबांना शिक्षणाच्या संधी, नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होईल? हादेखील प्रश्न आहेच. लोकसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या शिवाजी पार्कच्या सभेत राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला कुणीही धक्का लावू शकणार नाही, हे ठणकावून जनतेला सांगा असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता आरक्षणाबाबत केलेलं राज ठाकरेंचं हे वक्तव्य परस्परविरोधी होत नाहीये का?
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....