लाडकी बहिण अर्ज! मंजूर की, रद्द? असा चेक करा

    17-Aug-2024   
Total Views |
 
Ladki Bahin
 
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला' राज्यात भरघोस प्रतिसाद मिळतोय. हा वाढता प्रतिसाद आणि अर्ज भरण्यासाठी झालेली महिलांची गर्दी पाहता राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवलीये. यानुसार आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दहमहा १५०० रूपये मिळणार आहेत. यासाठी राज्यभरातून लाखों महिलांनी अर्ज केलेत. मात्र, या योजनेबाबत असंख्य अफवा आणि फसवणूकीचे प्रकारही समोर येताहेत. तर लाडकी बहिण योजनेबाबतच्या अफवा, फसवणूक आणि या योजनेबद्दलचे आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत? ते जाणून घेऊया.
 
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत' महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रूपये मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या योजनेसाठी १ कोटी ४० लाख अर्ज दाखल करण्यात आलेत. यापैकी १ कोटी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झालीये. यातील जवळपास ८३ टक्के अर्ज वैध ठरवण्यात आलेत. येत्या १७ ऑगस्ट रोजी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये जमा केले जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
 
मध्यंतरी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याचं अॅप आणि पोर्टल बंद झाल्याची माहिती आली होती. शिवाय नारीशक्ती दूत अॅपवर अर्ज भरताना महिलांना अनेक तांत्रिक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे राज्य सरकारने यासाठी एक नवीन वेबसाईट सुरु केलीये. लाडकी बहिण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट सुरू करण्यात आलीये. त्यामुळे आता महिला या वेबसाईवर जाऊनही अर्ज करू शकतात.
 
परंतू, अर्ज केल्यानंतरचा सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे या योजनेसाठी आपण पात्र आहोत की, नाही हे आपल्याला कसं कळणार? तर आता सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याच्या किंवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवर पात्र महिलांच्या याद्या अपलोड करण्यात येताहेत. लाडकी बहिण योजनेच्या पात्रता यादीमध्ये आपलं नाव आलंय का, हे पाहण्यासाठी गुगलवर आपल्या जिल्ह्याचं किंवा महानगरपालिकेचं नाव टाकायचं. त्यानंतर आपल्या महापालिकेची वेबसाईट ओपन करायची. याठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण लाभार्थी यादी अशी एक लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यावर वेगवेगळ्या वार्डनुसार पीडीएफ फाईल्स येतील. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करून आपलं नाव लाभार्थी यादीत आहे की, नाही ते बघता येईल. याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा नारी शक्ती दूत अॅपवरही ही लाभार्थी यादी बघता येऊ शकते.
 
लाडकी बहिण योजनेसाठी मराठीमध्ये केलेला अर्ज स्विकारला जाणार नाही, अशी एक अफवा आली होती. परंतू, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता महिलांना मराठीमध्येही अर्ज करता येऊ शकतात.
 
लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरताना अनेकांची फसवणूक झाल्याचीही माहिती पुढे आलीये. लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून देतो, असं म्हणत अनेक महिलांकडून पैसे उकळण्यात येताहेत. एवढंच नाही तर या योजनेचे अर्ज भरताना अर्जदार महिलेचं बँक अकाऊंट रिकामं करण्यात येत असल्याचंही सांगण्यात येतंय. हा अर्ज भरतेवेळी एका unkown नंबरवरून कॉल येतो आणि डॉक्युमेंट व्हेरिफेकशन करतो, असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं. त्यानंतर समोरची व्यक्ती एक लिंक आणि क्युआर कोड पाठवतो. तुम्ही जर या लिंकवर क्लिक केलं किंवा क्युआरकोड स्कॅन केला तर तुमचं बँक अकाऊंट हॅक होऊ शकतं. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांना किंवा फसवणुकीला बळी न पडता जास्तीत जास्त महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....