डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार स्थापन करणार समिती
केंद्र सरकारचे आश्वासन
17-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी देण्यात आले आहे.
आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील निवासी डॉक्टरांविरुद्ध झालेल्या अत्याचाराच्या घटनांनतर फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (फोर्डा), इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि दिल्लीतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या निवासी डॉक्टर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यादरम्यान संघटनांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेऊन मंत्रालयाने डॉक्टरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी संभाव्य उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. या कालावधीत, सर्व भागधारकांच्या प्रतिनिधींना त्यांच्या सूचना समितीसोबत शेअर करण्यासाठी आमंत्रित केले जाईल, असे सांगितले आहे. त्यातप्रमाणे या बैठकीनंतर सरकारला परिस्थितीची जाणीव असून त्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील असल्याचे सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले. देशातील २६ राज्यांनी आधीच त्यांच्या राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदे केले आहेत, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.