म्हणे हिंदू समाजावर ‘सूडहल्ले’; ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने तोडले तारे!

    12-Aug-2024   
Total Views |
newyork times hindus attacks


‘न्यूयॉर्क टाईम्स’ने आपल्या 7 ऑगस्टच्या अंकामध्ये बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर जे हल्ले होत आहेत, ते हल्ले म्हणजे ‘सूडहल्ले’ आहेत, अशा आशयाचा मथळा देऊन त्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. पण, ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने जो मथळा दिला होता, त्याची तीव्र प्रतिक्रिया ‘नेटिझन्स’मध्ये उमटली. अनेक राष्ट्रीय विचारांच्या समाजमाध्यमांतून ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या मथळ्यावर टीका करण्यात आली.

‘न्यूयॉर्क टाईम्स’ हे दैनिक नेहमीच हिंदूंविरोधी भूमिका घेताना दिसते. भारतातील घडामोडींविषयी बातम्या देताना या दैनिकाने हिंदू समाजास प्रतिकूल ठरेल, अशी भूमिका नेहमीच घेतली आहे. हिंदू समाजाच्या विरुद्ध जे राजकीय पक्ष, संघटना आणि नेते आहेत, त्यांची तळी उचलून धरायची, अशी या वृत्तपत्राची भूमिका. आता बांगलादेशमध्ये जी अराजकाची परिस्थिती निर्माण झाली, त्यामध्ये त्या देशात अल्पसंख्य असलेल्या हिंदू समाजास प्रामुख्याने तेथील धर्मांध आंदोलकांनी लक्ष्य केले. बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांना भारतात पलायन करावे लागले. ज्या शेख मुजिबूर रेहमान यांच्यामुळे बांगलादेश निर्माण झाला, त्या शेख मुजिबूर रेहमान यांचा पुतळा आंदोलकांनी पाडून टाकला.

तसेच 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या लष्कराने शरणागती पत्करलेल्या प्रसंगाचा जो पुतळा उभारण्यात आला होता, तोही आंदोलकांनी उद्ध्वस्त केला. आता त्या देशात नोबेल पुरस्कारविजेते मोेहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार सत्तेवर आले आहे. आता त्या देशातील परिस्थिती निवळेल, अशी अपेक्षा आहे. पण, शेख हसीना यांच्याविरुद्ध जे आंदोलन करण्यात आले, त्यात सहभागी असलेल्या आंदोलकांचा त्या देशातील अल्पसंख्य हिंदू समाजावर राग असल्याचे दिसून आले. हिंदू समाजावर हल्ले करण्याच्या, त्यांच्या हत्या करण्याच्या घटना त्या देशात घडल्या. तेथील हिंदू समाजावर जे अत्याचार होत आहेत, त्याबद्दल भारतातील हिंदू समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मात्र, त्या देशातील हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने वेगळाच सूर लावला आहे.

‘न्यूयॉर्क टाईम्स’ने आपल्या 7 ऑगस्टच्या अंकामध्ये बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर जे हल्ले होत आहेत, ते हल्ले म्हणजे ‘सूडहल्ले’ आहेत, अशा आशयाचा मथळा देऊन त्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. पण, ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने जो मथळा दिला होता, त्याची तीव्र प्रतिक्रिया ‘नेटिझन्स’मध्ये उमटली. अनेक राष्ट्रीय विचारांच्या समाजमाध्यमांतून ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या मथळ्यावर टीका करण्यात आली. त्यास आक्षेप घेण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरुद्ध जो हिंसाचार उसळला, त्याचे एकप्रकारे ‘सूडहल्ले’ म्हणून समर्थन करण्याचा प्रयत्न त्या दैनिकाने केला होता. त्या मथळ्यावरून झालेला गदारोळ लक्षात घेऊन त्या दैनिकाने आपल्या बातमीचे शीर्षक बदलले, पण तेथील हिंदू समाजाने शेख हसीना यांना जो पाठिंबा दिला, त्यामुळे हिंदू समाजावर असे हल्ले होत आहेत, हे आपले कथन मात्र कायम ठेवले! शेख हसीना यांना पाठिंबा देण्याची किंमत तेथील हिंदू समाजास मोजावी लागत असल्याचे त्या दैनिकाने म्हटले होते.

हिंदू समाजावर होणारे हल्ले सुडाच्या भावनेने होत असल्याचा जो सूर ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने लावला होता, तो ‘नाझी’पातळीची आठवण करून देणारा असल्याची टीका करण्यात आली, तर एकाने बांगलादेशमधील हिंदूंवर ‘सूडहल्ले’ होत असल्याचे सांगून ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने त्या हल्ल्यांचे समर्थनच केल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंचा जो संहार झाला, त्याचा ‘सूडहल्ले’ असा उल्लेख केल्याबद्दल अन्य एकाने समाजमाध्यमांवर त्या दैनिकावर सडकून टीका केली आहे. बांगलादेशमधील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल आणि तेथील हिंदू समाजाचे संरक्षण केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याशी बोलताना म्हटले असले, तरी ज्या प्रकारे हिंदू समाजावर हल्ले करण्यात आले, ते पाहता त्या देशात धर्मांधांचा प्रभाव वाढत असल्याचेच दिसून येत आहे. भारतासह जगातील सर्व हिंदू समाजाने बांगलादेशी हिंदूंच्या मागे उभे राहायला हवे! ‘न्यूयॉर्क टाईम्स’सारख्या दैनिकाकडून केल्या जाणार्‍या अपप्रचारासही सडेतोड उत्तर दिले पाहिजे.
 
कोलकाता बलात्कार प्रकरण : सीबीआय चौकशी हवी!

कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्याची जी अमानुष घटना घडली, त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल न घेता, हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगून त्या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा हा दृष्टिकोन लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी या सर्व घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सदर इस्पितळातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरबाबत जो प्रकार घडला, त्याची देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या हत्येसंदर्भात पोलिसांनी जी उलटसुलट वक्तव्ये केली, त्याबद्दलही संताप व्यक्त केला जात आहे. योग्य प्रकारे तपास न करता, सदर प्रकार आत्महत्येचा असल्याचा जो निष्कर्ष पोलिसांनी काढला, त्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मध्य प्रदेश, भोपाळमधील ‘एम्स’मधील डॉक्टरांनी मोर्चा काढला होता, तर दिल्लीमधील राम मनोहर लोहिया इस्पितळातील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध करून या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कोलकाता शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या घटनेची सीबीआय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी प. बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि अन्य भाजप नेत्यांनी केली आहे. एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या होते, ही अमानुष घटना पाहता त्या राज्यातील कायदा-व्यवस्था किती घसरली आहे, याची कल्पना येते. ज्यांनी न्याय देण्यासाठी साहाय्य करायचे, अशी पोलीस यंत्रणाही या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. ज्या राज्याची एक महिला मुख्यमंत्री आहे, त्या राज्यात अशा घटनांकडे दुर्लक्ष कसे काय केले जाऊ शकते?



माओवाद्यांचा प्रभाव ओसरू लागला!
 
गेल्या दहा वर्षांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव ओसरत चालला असल्याचे संसदेत जी माहिती सरकारकडून सादर करण्यात आली त्यावरून दिसून येत आहे. माओवाद्यांच्या हिंसाचारात सुरक्षा दलाचे जवान आणि सर्वसामान्य नागरिक बळी पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. 2010 मध्ये माओवाद्यांच्या हिंसाचारात 1,005 व्यक्ती मरण पावल्या होत्या किंवा त्यांच्याशी लढताना त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. पण, 2023 मध्ये या आकडेवारीत कमालीची घट झाल्याचे दिसून आले. 2023 मध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 138 व्यक्ती मरण पावल्या. माओवाद्यांचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने विविध राज्यांमध्ये जी ठोस आणि कठोर पावले उचलली, त्यामुळे माओवाद्यांचा प्रभाव ओसरल्याचे दिसून येत आहे. सरकारने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबरोबरच संबंधित प्रदेशात विविध विकास कार्यक्रम राबविले, स्थानिक जनतेचे हक्क अबाधित राहतील, या दृष्टीने उपाययोजना केल्या. यामुळे माओवाद्यांचा प्रभाव ओसरण्यास मदत झाली. माओवाद्यांच्या प्रभावामध्ये 73 टक्के घट झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. 2013 मध्ये माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या दहा राज्यांमध्ये मिळून 126 इतकी होती. पण, 2024 मध्ये देशातील अवघ्या 38 जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव असल्याचे दिसून येत असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. माओवाद्यांचा प्रभाव सर्वात जास्त छत्तीसगढ राज्यात असल्याचे आणि त्या राज्यातील 15 जिल्हे माओवाद्यांनी प्रभावित आहेत. ओडिशा राज्यातील सात जिल्हे माओवाद्यांमुळे प्रभावित आहेत, तर झारखंड राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव अजून असल्याचे दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील तीन आणि महाराष्ट्रातील दोन जिल्हे माओवाद्यांच्या दहशतवादाने प्रभावित असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. ही सर्व माहिती पाहता माओवाद्यांचा प्रभाव ओसरू लागल्याचेच द्योतक आहे.

9869020732

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.