चीनमध्ये मृतदेहांचा बाजार

    11-Aug-2024   
Total Views |
 crematoriums-medical-labs-chinese-crime-ring-bone-


चीन विस्तारवादी देश आहे, यात काही शंका नाही. चीन दुसर्‍या देशांचे भूभाग हडपण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातो. चीन जमिनी चोरतो, हे सबंध जगाला माहीत होतेच, मात्र आता याच चीनमध्ये चक्क मृतदेह चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अगदी स्मशानभूमी ते वैद्यकीय प्रयोगशाळेपर्यंत या टोळीने आपली पाळेमुळे घट्ट रोवली होती. या टोळीने तब्बल ४ हजारांहून अधिक मृतदेहांची तस्करी केली आहे. ही टोळी स्मशानभूमीतून मृतदेह चोरून, त्यांची विक्री करायची. अवयवांसाठी या मृतदेहांची तस्करी केली जात होती. या प्रकरणी चिनी एजन्सींनी आतापर्यंत ७५ जणांना आरोपी बनवले आहे.

चीनच्या शांक्सी प्रांताच्या पोलिसांना स्मशानभूमी आणि वैद्यकीय प्रयोगशाळेतून मृतदेह चोरून त्यांची विक्री करणार्‍या टोळीची माहिती मिळाली असून, त्यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे. हे मृतदेह शांक्सी ऑस्टेरॉइड बायोमेडिकल आणि हेंगपू टेक्नॉलॉजी नावाच्या कंपन्यांना विकले गेले. या टोळीचे हे काळे कारनामे २०१५ पासून सुरू होते. यातून या टोळीने किमान ७५ कोटी रुपये कमावले. चीनच्या सात राज्यांमध्ये हा व्यवसाय सुरू होता ,आणि येथून मृतदेहांची तस्करी केली जात होती. तस्करी केलेल्या मृतदेहांची हाडे बाहेर काढून, त्यांची विटंबना करण्यात आली, तर अनेक मृतदेह जतन करण्यात आले होते.

आरोपींमध्ये स्मशान व्यवस्थापन अधिकारी, डॉक्टर आणि कंपनीचे अधिकारी यांचा समावेश आहे. या घटनेनंतर चीनमधील लोकांमध्ये प्रचंड संताप असून,काही काळ ही बातमी टीव्हीवर दाखविल्यानंतर ती नंतर काढून टाकण्यात आली. या मृतदेहांच्या हाडांचा उपयोग ज्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि ज्यांच्या हाडांमध्ये खोल जखमा होत्या, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केला जात होता. यासाठी दुसर्‍या व्यक्तीच्या हाडातून टिश्यू घेऊन त्यावर उपचार केले जातात. साधारणपणे अवयवदात्याची परवानगी घेतली जाते. मात्र, या प्रकरणात मृतदेहांच्या हाडांशी छेडछाड करण्यात आली.

या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीने शुल्क आकारले होते, मात्र त्यानंतरही हा गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. ज्या मृतदेहांची राख कुटुंबीयांना सोबत घ्यायची नव्हती, अशा मृतदेहांसोबत असे घडले. हक्क नसलेले मृतदेहही विकण्यात आले. चीनमधील एका वैद्यकीय विद्यापीठाच्या कर्मचार्‍यानेही तीन स्मशानभूमींतून ४०० हून अधिक मृतदेह खरेदी केले. त्याने हे मृतदेह सुमारे ११ हजारांना विकत घेतले, आणि दहापट किमतीत हॉस्पिटलमध्ये विकले. एका मृतदेहासाठी एका डॉक्टरने अडीच लाख रुपये आकारले.
 
वरवर साधे, सरळ वाटणारे हे प्रकरण वाटके तितके सोपे नाही. स्वतःला प्रगत म्हणवल्या जाणार्‍या चीनमध्ये अशा पद्धतीने मृतदेहांचा बाजार मांडला जात असेल, तर चीनमधील अंतर्गत भयाण परिस्थितीचा अंदाज येतो. चीनमधील एकाधिकारशाहीमुळे चिनी नागरिक नावापुरत्या आणि जगाला दाखविण्यापुरत्या लोकशाहीमध्ये जगत आहे. ही लोकशाही खरंतर अत्यंत फसवी आहे. माध्यमांना तर चीनमध्ये बंदीच आहे. फक्त सरकारी माध्यमांना प्रसारणास परवानगी असून, तिथेही सरकारविरोधात काही बोलता येत नाही, दाखविताही येत नाही. चीनमध्ये असे अनेक अनैसर्गिक काळे धंदे सुरू असतात. कोरोना ही जगाला पोखरणारी महाभयंकर महामारी चीनचेच देणं. पुढील कोणत्याही परिणामांची चिंता न करता, चीनमध्ये राजरोसपणे अशा गोष्टी सुरू असतात, ज्याला कुठेतरी चीनमधील अंतर्गत प्रशासनाचीही मूकसंमती असते.

चीनमुळे कोरोनाचा प्रसार वाढला आणि त्यामुळे गरीबच काय पण अमेरिकेसारख्या महासत्तेलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भारताने या काळात आपल्या देशातील परिस्थितीशी दोन हात करत, जगालाही लसीच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. तसे पाहिल्यास चीनने मदतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक होते. कारण, हे पाप त्यांचेच होते, मात्र तसे झाले नाही. आताही मृतदेहांचा बाजार मांडल्यामुळे चीन जागतिक स्तरावर कितीही फुशारक्या मारत असला, तरीही तो अद्यापही मानवताहीन आहे आणि राहील. चीनच्या साहित्याचा अन्य देशात भले चायना बाजार भरत असेल, मात्र चीनमधील हा मृतदेहांचा बाजार माणुसकीला काळीमा फासणारा असाच आहे. विस्तारवादी ड्रॅगनकडून आपण दुसरी अपेक्षाही करणे व्यर्थच म्हणा...


७०५८५८९७६७

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.