अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो असं म्हणतात. आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीत हा ‘अनुभव’ ज्याचा त्याने मिळवायचा असतो. एकूण शिक्षणाच्या बजेटमध्ये अनुभवाचा खर्च समाविष्ट नसतो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थी पुस्तकी अभ्यासात अव्वल येतात, पण जेव्हा निष्ठूर जगाशी त्यांचा मुकाबला होतो, तेव्हा हाच अनुभव एक तर त्यांच्यासाठी ‘सुपर हिरो’ ठरतो किंवा ‘सुपर व्हिलन...’पारंपरिक शिक्षण पद्धतीतील याच त्रुटींवर संशोधन करून महाराष्ट्राच्या युवकाने फ्रान्समध्ये अनुभवाधिष्ठित शिक्षणप्रणाली सुरु केली आणि जगभरातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. युरोपियन युनियनच्या उद्योग विभागाने त्याला संलग्नता दिली. या नव्या शिक्षण प्रणालीचे जगभरातील औद्योगिक फोरमवर कौतुक होत आहे आणि मराठीचा हा झेंडा फ्रान्समध्ये फडकवणार्या मराठमोळ्या शिक्षकाचे नाव आहे प्रसाद देशपांडे...
प्रसाद तसे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे. वडील राष्ट्रीय हॉकीपटू. साहजिकच प्रसादनेही हॉकी खेळावे असा आग्रह. पण, प्रसादची ओढ क्रिकेटकडे. शेवटी क्रिकेटसाठी घरातून पुणे गाठले. अगदी ‘रणजी लेव्हल’ गाठण्यापर्यंतच्या दर्जाचे क्रिकेट खेळले. पुढे पुणे विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवीही घेतली आणि वयाच्या २१व्या वर्षी त्यांना शिक्षणासाठी फ्रान्सची संधी मिळाली. तिथे फ्रेंच भाषेच्या अत्यंत अवघड अशा परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवल्यानंतर त्यांना एका फ्रेंच कंपनीकडून भागीदारीची ऑफर मिळाली. भारत आणि फ्रेंचमधील उद्योगांसाठी विविध संधी शोधणे, समस्यांवर मार्ग काढणे आणि उपलब्ध संसाधने त्यांना माफक दरात उपलब्ध करून देणे, असे त्यांचे कामाचे स्वरुप. या कंपनीचे काम करीत असताना त्यांच्या लक्षात आले की, आपल्या शिक्षणपद्धतीत पुस्तकी शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला या कठोर जगात आपले नशीब आजमावण्यासाठी ढकलले जाते. गाठीशी अनुभव नसल्यामुळे अनेक कळ्या उमलण्याआधीच कोमेजून जातात. गुणवत्तेचा हा र्हास थांबविण्यासाठी या विद्यार्थ्यांना जर शिक्षण घेता घेताच आवश्यक तो अनुभव देण्याची व्यवस्था केली, तर असा विचार त्यांनी केला आणि त्यातूनच जन्म झाला ‘ईटीईसी’ या इन्स्टिट्यूटचा.
अनुभवाला केंद्रस्थानी मानून उद्योगजगतासाठी येथे विद्यार्थी घडविले जातात. गेली २३ वर्षे प्रसाद देशपांडे फ्रान्समध्ये आहेत. आता शिक्षणाचा नवा मंत्र तेथे यशस्वीपणे राबवत आहेत. याशिवाय भारतातील विविध उद्योग संस्थांना फ्रान्समध्ये आणि फ्रान्समधील विविध संस्थांना भारतात समन्वय साधून देण्याचे कामही त्यांची कंपनी करते. पॅरिसमध्ये ‘ला देफाँस’ नावाचे उच्चभ्रू उद्योग क्षेत्र आहे. तेथे ‘ग्रांदे आर्च’ नावाची भव्य वास्तू आहे. पॅरिस राज्यक्रांतीच्या २०० वर्षांच्या निमित्ताने ही वास्तू देशाला अर्पण करण्यात आली होती. या वास्तूतील अतिभव्य दालनात प्रसाद यांनी ‘इंडो-फ्रान्स वाईन फेस्टिव्ह’ यशस्वी करून दाखविला होती. महाराष्ट्रातील वाईनला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यात या ‘वाईन फेस्टिव्ह’चाच मोठा वाटा होता, असे प्रसादजी म्हणतात. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. जगाला क्वालिटी काम आणि क्वालिटी वेळेत करून हवेय. वेळ आणि गुणवत्तेची सांगड घालतानाच नफ्याची बाजू कशी वरचढ राहील, याचा मूलमंत्र या ‘ईटीईसी’मध्ये दिला जातो.
तेव्हा आपणास विदेशात शिकायला जायचे असेल तर एकदा या मराठमोळ्या धाडसी शिक्षणदूताशी तुम्हाला बोललेच पाहिजे.फ्रान्समध्ये स्थिरस्थावर होऊन येथे शिक्षणसंस्था चालवणे तितकेसे सोपे नाही. पण, सोपे काम कुणीही करू शकतो, अवघड काम आधी केले पाहिजे, हा प्रसाद यांचा दृष्टिकोन आणि म्हणूनच ते येथे यशस्वी होऊ शकले. ‘युरोपियन इंटरनॅशनल सेंटर फॉर इकोनॉमिक अॅण्ड बिझनेस डेव्हलपमेंट’चे ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. मराठी मुलांमध्ये जिद्द जन्मत:च असते, गरज आहे ती त्यांच्यातील गुणवत्तेला योग्य दिशा देण्याची. असं म्हणतात, प्रवास कितीही मैलाचा असला तरी त्या दिशेने पडलेले पहिले पाऊल महत्त्वाचे असते. या पहिल्या पावलालाच दिशा देण्याचे काम प्रसाद आणि त्यांची टीम फ्रान्समध्ये करतेय....
(प्रसाद देशपांडे यांच्याशी संपर्काचा ईमेल : enquiriesetec-edu.com)