मुंबई : हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
कलाकार म्हणून स्वत:मधील गुणदोष स्वीकारण फार महत्वाचं असतं. त्याबद्दल बोलताना सोमण म्हणतात, “खरं सांगायचं तर मी अभिनय फार उत्तम करतो असं मला वाटत नाही. माझं असं मत आहे की अभिनय ही क्रिएटीव्हिची नसून ते एक क्राफ्टवर्क आहे. अभिनयात नवं काहीच घडत नाही. अभिनयात नवं काहीतरी घडलं आहे याचा अर्विभाव आणता. त्यामुळे अभिनेता किंवा अभिनेत्री हे दिग्दर्शक, लेखक यांच्या हातातील पपेट आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आजपर्यंत मी नाटकाचं लिखाण आणि दिग्दर्शनात फार रमलो तितका मी अभिनयात कधीच फारसा गुंतलो नाही. आजवर केवळ अभिनयाच्या जोरावर मला भूमिका मिळाल्या पण उरी: द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट मला माझ्या दिसण्यावरुन मिळाला हे नक्की सांगेन. त्या चित्रपटात मनोहर पर्रीकर यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती हवी होती आणि सुदैवाने माझ्यात ते साधर्म्य कास्टिंग दिग्दर्शक चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांना दिसलं आणि त्या महत्वाच्या चित्रपटाचा मी भाग झालो याचा आनंद आहे”.
रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.