नवी दिल्ली : देशभरात डिजिटल पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन देण्यात येत असून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस(युपीआय) माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण जुलैमध्ये ४५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील प्रमुख पेमेंट प्रणाली असलेल्या युपीआय आधारित व्यवहारांत लक्षणीय वाढ झाली असून १४.१४ अब्जांवर पोहोचला आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार युपीआय व्यवहारांचे मूल्यदेखील ३५ टक्क्यांनी वाढले असून २०.६४ ट्रिलियन इतका झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात व्यवहारांचे मूल्य २० ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त राहिले आहे. याआधी, यूपीआय व्यवहाराचे मूल्य जूनमध्ये २०.०७ ट्रिलियन रुपये तर मेमध्ये २०.४४ ट्रिलियन रुपये इतके राहिले होते.
एनपीसीआयकडून जारी करण्यात आलेला डेटा दर्शवितो की, जुलैमध्ये युपीआय वर सरासरी दैनंदिन व्यवहारांची संख्या ४६६ दशलक्ष होती, जी ६६,५९० कोटी रुपये होती. अनुक्रमे, जुलैमध्ये युपीआय व्यवहारांचे प्रमाण ३.९५ टक्क्यांनी वाढले असून याच कालावधीत व्यवहारांचे मूल्य २.८४ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.