साहित्यिक मुख्याध्यापिका

    09-Jul-2024   
Total Views |
Sangeeta palakhe


परिस्थितीला शरण न जाता, परिस्थितीवर मात करत स्वतःसोबत समाजाचाही उत्कर्ष साधणार्‍या डोंबिवलीच्या संगीता पाखले. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

समाजभान असलेली साहित्यिक मुख्याध्यापिका’ असा संगीता पाखले यांचा लौकिक. त्या ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकारी असून, ‘ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी’च्या संचालिका आहेत. ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्व’च्याही त्या सदस्य आहेत. डोंबिवलीच्या ज्ञानमंदिर विद्यासंकुल येथे मुख्याध्यापिका म्हणून काम करताना हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले.

एकदा त्यांच्या शाळेने विद्यार्थ्यांना एक उपक्रम दिला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये रोपं लावली होती. छोटी छोटी रोपं नाजूकपणे त्यांचा आब सांभाळत वाढत होती. मात्र, काही मुलांनी ती रोपं उपटून टाकली. काही रोपट्यांना तुडवून त्यांचा चेंदामेदा केला. त्यांनी त्या रोपांचा विध्वंस तर केला होताच, त्याशिवाय ती रोपं लावणार्‍या विद्यार्थ्यांच्या आनंदाचाही विध्वंस केला होता. असा क्रूर विध्वंस करणार्‍या मुलांना दुसर्‍यांच्या आनंदाचा, कष्टाचा चुराडा करून आनंद कसा काय मिळाला? ही वृत्ती किशोरवयात आहे, तर मग पुढे ते काय करतील? शाळेबाहेरच्या जगात ते काय करत असतील? या सगळ्या प्रश्नांनी संगीता पाखले अस्वस्थ झाल्या.

त्या मुलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांना कळले की, किशोरवयातील या मुलांच्या अंतर्मनातला कोलाहल समजून घेऊन त्यांना योग्य समुपदेशन मिळाले, तर त्यांचे पुढील भवितव्य चांगले होईल. केवळ याचसाठी त्यांनी शालेय समुपदेशक पदविका शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करता यावे, यासाठी आवश्यक असलेले इतर अनेक छोटेमोठे अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले. तसेच कोरोनाच्या महामारीमध्ये संगीता यांनी विद्यार्थी, पालक आणि संपर्कातील प्रत्येकाचे मनोधैर्य अबाधित राहावे, यासाठी काम केले. गरजूंना सर्वतोपरी मदत केली.

बीएससी संख्याशास्त्र, बीएड, एमए अर्थशास्त्र, एमए शिक्षणशास्त्र, एमए मराठी आणि संगीतामध्येही तीन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संगीता पाखले. हाडाच्या शिक्षिका. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरूच असतात. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडू नये, यासाठी त्यांना आर्थिक आणि सर्वच स्तरांची मदत त्या करतात. गरीब एकल पालकांच्या पाल्यांचे तसेच अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी संगीता झटत असतात.

मुख्याध्यापिका, एक ध्येयवादी समुपदेशकासोबतच त्या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. बालनाट्य आणि विज्ञानावर आधारित एकांकिका लेखनात त्यांचा हातखंडा. त्यांचे ‘बीज अंकुरे अंकुरे’ व ‘इतर बालनाटिका’ हे पुस्तक महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने प्रसिद्ध केले आहे. 75 दिवस - 75 कविता, 30 दिवस 30 चारोळी असे अभिनव उपक्रम त्यांनी राबविले. अनेक वर्तमानपत्रांमधून, दिवाळी अंकांमधून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.

धुळ्याच्या नारायण आणि सावित्री चिंचोरे यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक संगीता. नारायण हे पोस्टात कामाला होते, तर सावित्री या गृहिणी. चिंचोरे कुटुंब अत्यंत संस्कारशील. घरी माणसांचा कायम राबता. आजारी नातेवाईक, गरजू नातेवाईक चिंचोरेंच्या घरी येई. मग त्याची पूर्ण शुश्रूषा चिंचोरे दाम्पत्य करी. घरी आलेला कुणीही विन्मुख जाऊ नये, हे संस्कार. संगीता याच संस्कारात वाढल्या. आयुष्य अतिशय सरळच होते. नव्वदच्या दशकात संगीता बीएस्सीच्या दुसर्‍या वर्षाला असताना दशकात त्यांना प्रकाश पाखले यांचे स्थळ आले. मुलगा चांगला, घराणे चांगले असे पाहून शिकत असतानाच संगीता यांचा विवाह झाला. मात्र, संगीता यांना शिक्षण पूर्ण करायचे होते. लग्न करून त्या सासरी आल्या. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी परीक्षा होती. सासरची परवानगी घेऊन त्यांनी परीक्षा दिली. संगीता यांचे पती प्रकाश नोकरीनिमित्त डोंबिवलीला राहत. त्यामुळे संगीता या डोंबिवलीला आल्या. नंतर त्यांना एक अपत्य झाले.

पुढे सासरचे कुटुंब सगळे सांभाळत त्यांनी विज्ञान शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बीएडपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. याच काळात त्या ‘विज्ञान’ विषयाची शिक्षिका म्हणून ज्ञानमंदिर विद्यासंकुल शाळेत रूजू झाल्या. काही वर्षांनी त्यांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे निभावली. त्या पुढे मुख्याध्यापिक झाल्या.

नव्वदच्या दशकात 19व्या वर्षी विवाह होऊन सासरी आल्यावर काही वर्षांतच उच्चशिक्षण घेणार्‍या संगीता पाखले. ‘कोविड’ महामारीत त्यांना कोरोना झाला. जगण्या-मरण्याचा प्रश्न. मात्र, एमए मराठीची ऑनलाईन परीक्षा त्यांनी कोरोनाचा उपचार घेत इस्पितळात दिली. त्याआधी त्यांनी दोन विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. सर्वच दृष्टीने स्थैर्य आल्यावरही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही की, समाजभान सोडले नाही, तर अशा संगीता पाखले म्हणतात, ”भगवद्गीतेतील प्रत्येक विचार माझ्या आयुष्याची प्रेरणा आहे. कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जीव ओतून करा, हा स्वामी विवेकानंदांचा विचार माझ्या आयुष्याचे सूत्र आहे. यापुढेही शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यातून तरूणाईमध्ये संस्कारशील समाजभान निर्माण व्हावे, यासाठी मी कार्य करणार आहे.” संगीता पाखले यांच्या ध्येयकार्याची पूर्ती नक्कीच होईल. कारण, मंगल सकारात्मक कार्याचा सारथी प्रत्यक्ष ईश्वरच असतो.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.