अधिवेशनालाही अतिवृष्टीचा फटका! दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

    08-Jul-2024
Total Views |
 
Session

 
मुंबई : रविवारी रात्रीपासून मुंबईसह महानगर प्रदेशात सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
 
अतिवृष्टीसंदर्भात विधानसभेत माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रात्रीपासून राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २१६ मिमी पाऊस झाला. ३७४ जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. रायगडमध्ये ९५.६ मिमी पाऊस पडला. मुंबईत कुलाबा वेधशाळेत ८३.८ मिमी, तर सांताक्रुझमध्ये २६७.९ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरातील सखल भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. सायन ते कुर्ला दरम्यान रेल्वे रुळ काही काळ पाण्याखाली होते. चुनाभट्टीमध्ये पाणी साचल्यामुळे हार्बर लाईन बंद ठेवावी लागली. मुलुंड ते नाहूर दरम्यान पाणी साचल्यामुळे जलद गाड्यांवर परिणाम झाला."
 
हे वाचलंत का? -  राज्यातील ‘हिट अँड रन' प्रकरणांवर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय!
 
"त्याचवेळी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुपारी १ वाजून २७ मिनिटांनी हायटाईड सुरू होत आहे आणि ऑरेंज अलर्ट दिल्याप्रमाणे पाऊस पडला, तर अडचणीची स्थिती निर्माण होऊ शकते. मुंबईत अतिवृष्टी आणि हायटाईड एकत्रित येतात, तेव्हा पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे एकंदरीत स्थिती पाहता विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य आहे," असेही फडणवीस यांनी सांगितले.
 
अधिवेशन कालावधी वाढवा!
 
सोमवार, दि. ८ जुलै रोजी विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यामुळे कामकाजाचा एक दिवस वाया गेला. दि. १२ जुलै रोजी विधानपरिषदेची निवडणूक असल्यामुळे कामकाज पूर्ण क्षमतेने होऊ शकणार नाही. अशावेळी अद्याप बरेच कामकाज प्रलंबित असल्यामुळे अधिवेशन कालावधी एका दिवसाने वाढवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर, ही मागणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून सकारात्मक निर्णय घेऊ, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.