देशाच्या कानाकोपर्यांतून दाखल होणार्या प्रत्येकाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी कायम धावणारी मायानगरी म्हणजे मुंबई. पण, ही मुंबईनगरी परवा काही क्षण अक्षरश: थांबली, ती तिच्या क्रिकेटवरील प्रेमापोटी... मुंबई आणि क्रिकेट हे जुने नाते आणि जर भीमपराक्रम करून या भारतमातेची, मुंबईतल्या मातीत वाढलेली तिची लेकरे विश्वविजेती होऊन परतणार असतील, तर मग या मुंबईची स्वागताची तर्हाच निराळी! मुंबईकरांच्या क्रिकेटप्रेमाचा याचि देही, याचि डोळा घेतलेल्या आनंदानुभवाचे हे शब्दचित्रण...
“मुंबई शहर कधीच थांबत नाही, असं मी ऐकलंय. पण, आज माझ्या संघाने मुंबई शहराला थांबवून दाखवलंच,” हे उद्गार होते, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे. २००७ साली धोनीच्या नेतृत्वात युवा भारतीय संघाने, पहिला ‘टी-२०’ विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईमध्ये विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी २० वर्षांचा तरूण रोहित शर्मासुद्धा या विजेत्या संघाचा सदस्य होता. ‘ओपन बस’मधील विश्वविजेत्या भारतीय संघाची तेव्हाची मिरवणूक, आजही किक्रेट रसिकांच्या तितक्याच स्मरणात आहे. ज्यांनी हा जल्लोष आणि विश्वविजेता होण्याची भावना काय असते, हे अनुभवलं नव्हतं, त्या क्रिकेट रसिकांना ती संधी पुन्हा एकदा आता भारतीय संघाने दिली. दि. २९ जून रोजी झालेल्या ‘टी-२०’ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघ पुन्हा एकदा जगज्जेता झाला. विश्वविजेत्या आपल्या लाडक्या खेळाडूंची भारतात सारेच आतुरतेने वाट पाहत असताना, बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळाने त्यांना तिथेच थांबवून घेतले. जणू काही बार्बाडोसलाही या नम्र विश्वविजेत्यांचा सहवास आवडला असावा. पण, अखेरीस दि. ४ जुलैला भारतीय संघ मायदेशी परतला.
दिल्लीत पंतप्रधानांच्या घरी पाहुणचार झाल्यानंतर, भारतीय संघ विजयी मिरवणुकीसाठी क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच, मुंबईत दाखल आला. विश्वचषक जिंकून आठवडा उलटला असतानाही, मुंबईकरांनी विजयवीरांच्या स्वागतासाठी नरिमन पाईंट ते वानखेडे मैदानापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली होती. विश्वविजेत्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते दुपारी ३ वाजल्यापासून रस्त्यावर ठाण मांडून बसले होते, तर ज्यांना वानखेडे मैदानावर जाण्याचं भाग्य मिळालं, त्यांनीही दुपारपासूनच मैदानावर गर्दी केली होती.
सायंकाळी ५ वाजता असलेला कार्यक्रम सुरु होण्यासाठी ८ वाजले. एरवी मिनिटा-मिनिटांचा हिशेब करणार्या मुंबईकरांना मात्र या तीन तास विलंबाचं फार काहीच वाटलं नाही बरं का... कारण, कुणाचंच लक्ष घड्याळाच्या वेगाने फिरणार्या काट्यांकडे नव्हतं. मनात आणि डोळ्यात फक्त एकच आतुरता होती, ती म्हणजे आपल्या नायकांची एक झलक पाहणे. जिथे आपल्या आवडत्या खेळाडूंचे टीशर्ट, उत्साहवर्धक घोषणा, आपल्या नायकांच्या नावाच्या जयजयकार, ढोलताशांच्या गजरात थिरकत असलेले चाहते, यातच क्रिकेटची पंढरी क्रिकेटमय झाली होती, तिथे वेळेचे भान कोणाला? विश्वविजेत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चाहत्यांनी, स्वत: बनवलेले पोस्टर्स, ‘टी-२०’ विश्वचषकाच्या प्रतिकृती तर आणल्याच होत्या, पण त्यासोबतचं काही चाहत्यांनी आपल्या गाड्यांची रंगरंगोटीसुद्धा केली होती. क्रिकेटच्या सामन्यात पाऊस पडला, तर सामना थांबतो आणि चाहत्यांचा हिरमोड होतो. पण, जल्लोषावेळी जितका जास्त पाऊस तितका जास्त जल्लोष, असं काहीसं समीकरण नरिमन पॉईंटला जुळलं होतं. चाहत्यांच्या प्रेमाच्या अभिषेकात आकंठ डुंबणार्या विश्वविजेत्यांवर जलाभिषेकासाठी वरुणराजानेसुद्धा कसलीही कसर ठेवली नाही. तोही मनसोक्त बरसला, अगदी मुंबईकरांच्या प्रेमासारखाच!
कमी जागेत स्वत:ला सामावून घेण्याचे एक वेगळेच कसब मुंबईकरांना अवगत आहे. काल त्याचीच पुन्हा प्रचीती आली. भारतात क्रिकेटला धर्म म्हटलं जातं आणि या धर्माचा देव म्हणजे खेळाडू आणि चाहते म्हणजे भक्त. प्रत्येक क्रिकेट रसिकाला कधी ना कधीतरी क्रिकेट बघून किंवा खेळून काय मिळतं? हे वाक्य ऐकावंच लागतचं. त्याचं उत्तर मुंबईतल्या मिरवणुकीतील जल्लोष याचि देही, याचि डोळा पाहिल्यावरच मिळालं. या लाखोंच्या संख्येत आलेल्या मुंबईकरांना काही काम नव्हतं असं नाही, तर कुणी दिवसाची अर्धी सुट्टी टाकून, अथवा कुणी ५ वाजता आपलं काम आटोपून, मुंबईच्या लोकलमधून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून आले होते. कुणासोबत पाळण्यात खेळणारं बाळ होतं, तर कुणी आपल्या वयोवृद्ध आजी-आजोबांना घेऊन आले होते. कशासाठी? तर भारतीयत्वाच्या भावनेसाठी. जर कुणाला या भारतीय नागरिकांच्या देशाभिमानावर शंका असेल, तर त्याने भारतीय संघाचे झालेले स्वागत नक्की पाहावे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील एक ओळ आहे,
‘भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष हैं।’ भाषा, संस्कृती, सण, उत्सव, धर्म, पंथ अशा विविधेत नटलेल्या भारताला एकत्रित आणणार्या असंख्य गोष्टींपैकी एक म्हणजे क्रिकेट. या क्षणी सगळं विसरून लोक एकत्र येतात. भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे जीव की प्राण. २०११ पासून प्रतीक्षा असलेला हा क्षण यंदा अनुभवायला मिळाला. मग निश्चितच जेवढी प्रतीक्षा मोठी, तेवढीच सुखाची अनुभूतीदेखील अधिकाधिक वाढत जाते. १४० कोटी भारतीयांना हा आनंद देणारे खरे मानकरी हे भारतीय संघाचे शिलेदार आहेत. त्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच संपूर्ण भारतीयांच्यावतीने, त्यांच्या प्रेमाचे गोड ओझे खांद्यावर घेत सर्व मुंबईकर एकत्र आले होते. शेवटी काय? तर कधीच न थांबणार्या मुंबईला २००७ मध्ये धोनीच्या संघाने असेच थांबवलं होतं आणि अविरत आणि अहोरात्र धावणार्या मुंबईकरांना आज पुन्हा काही क्षण थांबायची संधी पुन्हा एकदा भारतीय संघाने विश्वविजय साकार करून दिली अन् मुंबई पुन्हा थांबलीदेखील...