चंद्रपूरचा रानवाटाड्या

    31-Jul-2024   
Total Views |
dinesh deorao khate


चंद्रपूर-गडचिरोलीमधील विस्तीर्ण पसरलेल्या जंगलांमध्ये वन्यजीव आणि अधिवास संवर्धनासाठी झटणार्‍या दिनेश देवराव खाटे यांच्याविषयी...

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण या व्यक्तीला काही लागू होत नाही. कारण वयाच्या एका टप्प्यावर यांची पाऊले रानवाटांकडे वळली. तीदेखील विदर्भासारख्या राकट आणि निर्भीड जंगलातल्या रानवाटांवर. चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या जंगलांचे देणे लाभलेल्या जिल्ह्यात, ही व्यक्ती वन्यजीवांचे भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वाघांच्या नियोजनासाठी वन विभागाला साथ देत आहे. रस्ते आणि रेल्वे अपघातात जीव जाणार्‍या वन्यजीवांच्या नोंदी ठेवत आहे, आणि महत्त्वाचे म्हणजे वन्यजीव क्षेत्रातून जाणार्‍या रस्तेप्रकल्पांमध्ये वन्यजीवांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहे. चंद्रपूरच्या जंगलांच्या सुरक्षेसाठी झटणारा हा माणूस म्हणजे दिनेश खाटे.

दिनेश यांचा जन्म दि. 5 जानेवारी 1987 रोजी चंद्रपूरमध्ये झाला. त्यांचे शिक्षणही याच शहरात झाले. निसर्गाशी दिनेश यांचे सूर जुळले, ते त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान. वन्यजीव संशोधक अंकुर काळी यांनी चंद्रपूरच्या एस. पी. महाविद्यालयात लावेलल्या वन्यजीव चित्रप्रदर्शनाला, दिनेश यांनी भेट दिली. ही चित्रे इतकी भारावून टाकणारी ठरली, की दिनेश यांच्या मनाला जंगलाची ओढ लागली. त्यांनी लागलीच अंकुर यांना संपर्क साधून, आपली निसर्गासाठी काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. अंकुर यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या गटात सामील होण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले.

आता दिनेश यांचा प्रवास सुरू झाला तो जंगलाची बाराखडी गिरवण्यापासून. या बाराखडीमधील मुळाक्षरे ठरली साप, बेडूक, पाली आणि सरडे. उभयचर आणि सरीसृपांची माहिती घेत दिनेश यांनी निसर्गज्ञान घेण्यास सुरुवात केली. चंद्रपुरात शहरी भागात वस्तीत शिरणारे साप पकडून याची सुरुवात झाली. मात्र, अंकुर यांनी या बचावकार्यांना अभ्यासाची चौकट घालून दिली होती. ‘साप पकडून सर्पमित्र नाही, तर सर्पनिरीक्षक व्हा!’ असा सल्ला अंकुर यांनी दिनेश यांना दिला होता. त्यामुळे साप पकडल्यानंतर त्याच्या वर्तनासंबंधी पुस्तकातून माहिती मिळवणे, सापांची ओळख पटवणे, अशा गोष्टींची जोड सर्पबचाव कार्याला मिळाली. यावेळी चंद्रपुरपर्यंत मर्यादित न राहता, विदर्भातील मेळघाटसारख्या जंगलांमध्ये त्यांची सरीसृपांसाठी भ्रमंती झाली.

या भ्रमंतीमधून दिनेश यांच्या लक्षात आले की, चंद्रपूरातील सरीसृप आणि उभयचरांविषयी एकही शोधनिबंध उपलब्ध नाही. मग त्यांनी दृढ निश्चयाने पाच ते सहा वर्षे सखोल अभ्यास करून, चंद्रपुरातील सरीसृप आणि उभयचरासंबंधीचा शोधनिबंध लिहिला. 2020 साली ‘इंटरनॅशनल रेपटाईल कन्झर्वेशन फाऊंडेशन’च्या नियतकालिकामध्ये, चंद्रपुरातील सरीसृप आणि उभयचरांसंबंधीची माहिती देणारा त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला. यामध्ये दिनेश यांनी 71 प्रजातींची नोंद केली. नंतर ‘एरो हेडेड ट्रिंकेट’ या सापाची शरीरे वाकण्यासंबंधीच्या वर्तनाची पहिली नोंद आणि त्यावरील आधारित शोधनिबंध, हरणटोळ या सापाने ‘युरोपेल्टिस मॅक्रोलेफिस’ या सापाच्या केलेल्या शिकारीसंबंधीचा शोधनिबंध, आणि ‘रेड नॅरो माऊथ बेडकांचे मृत्यूमुखी पडण्याच्या वर्तनासंबंधीचा शोधनिबंध, हे शोधनिबंध दिनेश यांनी लिहिले. यासाठी त्यांना राहुल देशमुख आणि किरण बावस्कर,शीतल कोल्हे यांची मोलाची मदत मिळाली.

‘निसर्गाचे काम म्हणजे भिकेचे डोहाळे’ अशाच धारणेत असलेल्या समजाला दिनेश यांचे पालकदेखील मुकले नाही. ‘दिनेश यांच्या निसर्गाच्या या छंदाला व्यवहाराची जोड असावी,’ अशी त्यांची इच्छा होती. अशावेळी अंकुर आणि वन्यजीव संशोधक मिलिंद परिवक्कम यांनी दिनेश यांना ‘वाईल्डलाईफ कन्झर्वेशनट्रस्ट’मध्ये नोकरीची संधी दिली. नोकरीतून पैसे मिळत असल्याचे पाहून, घरच्यांनीदेखील दिनेशना हे काम करण्यासाठी होकार दिला. आता परिवक्कम यांच्या टीममध्ये दिनेश यांनी काम करण्यास सुरुवात केली. जंगलात जाऊन कॅमेरा ट्रपिंग करणे, वन्यजीवांच्या नोंदी करणे, ही कामे होतीच.

2016 ते 2022 या ‘डब्लूसीटी’मधील कार्यकाळात दिनेश यांनी पेंच, कान्हळगाव, ब्रम्हपुरी, जुनोना, बावनथडी, मेळघाट येथील जंगलात व्याघ्र गणनेसाठी ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ केले. महत्त्वाचे म्हणजे कावल,कान्हळगाव,ताडोबा,उमरेड कर्‍हाडला आणि सातपुडा,मेळघाट येथील वन्यजीव भ्रमणमार्गाचा सखोल अभ्यास दिनेश यांनी केला. शिवाय कोठारी,अस्कापूर रस्ता, चंद्रपूर,मूल रस्ता, गोसेखुर्द कालवा प्रकल्प, बालाघाट,नैनपूर रेल्वे प्रकल्प अशा वनक्षेत्रामधून जाणार्‍या प्रकल्पांमधील वन्यजीवांचे भ्रमणमार्ग हुडकून त्याचे सविस्तर विश्लेषण केले. या संपूर्ण अभ्यासादरम्यान त्यांना वाघ आणि इतर वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या अनेक घटनांना सामोरे जावे लागले.

2022 सालापासून दिनेश हे स्वतः स्थापन केलेल्या ‘हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी’ या संस्थेमध्ये काम करत आहेत. राजुरा,बल्लारशाह,लक्कडकोट आणि कोरपान ते राजुरा या रस्त्यावर, वन्यजीवांसाठी उपशमन योजना अमलात आणण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थेकडून सरकारसोबत समन्वय साधला आहे. याशिवाय, ज्याठिकाणी वन्यजीवांसाठी उपशमन योजना अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत, त्याठिकाणी त्याची अंमलबजावणीसाठी ते प्रयत्नशील आहेत. रस्ते आणि रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडणार्‍या वन्यजीवांच्या शास्त्रीय नोंदी ठेवण्यासाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे. विदर्भासारख्या अनवट भागात वन्यजीवांसाठी खस्ता खाऊन काम करणार्‍या दिनेश यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!



अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.