मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्ट रोड परिसरातील प्रसिद्ध जॉगर्स पार्क येथे प्रस्तावित असलेल्या 'पे अॅण्ड पार्क' विरोधात स्थानिक आमदार तथा मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. जॉगर्स पार्क समोर असणाऱ्या मोकळ्या जागेत मोफत पार्किंग असताना आता त्या जागेवर शुल्क आकारून पार्किंगची सुविधा देण्याबाबात पालिका विचार करत आहे. त्याला परिसरातील नगरसेवक, नागरिक यांनी विरोध केला आहे.
कार्ट रोड परिसरात समुद्र किनारी अत्यंत सुबक असे प्रसिद्ध "जोगस पार्क" असून या परिसराचे हे खास आकर्षण ठरावे असे हे उद्यान आहे. या उद्यानात वांद्रे, खार, सांताक्रूझ या परिसरातील अबालवृद्ध सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी जॉगिगसाठी येत असतात. मात्र पालिकेने पे अॅण्ड पार्कचा निर्णय घेतल्याने त्यांना पार्किंगचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळेच नागरिकांना या पे अॅण्ड पार्कचा त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्वाक्षरी मोहिम राबवत विरोध दर्शवला आहे. या मोहिमेला स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे आणि पदाधिकारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वर्षानुवर्ष उद्यानात जॉगिगसाठी येणाऱ्या नागरिकांना 'पे अॅण्ड पार्क'चा भुर्दंड पालिकेच्या या निर्णयामुळे बसू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही या स्वाक्षरी मोहिमेतून निषेध नोंदवला आहे. या मोहिमेत २५० हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करुन आपला विरोध अधोरेखित केला आहे.
स्वप्ना म्हात्रे , स्थानिक नगरसेविका (भाजप)