कमला हॅरिस जिंकू शकतील का?

    30-Jul-2024   
Total Views |
kamala harris presidential election


अमेरिकेच्या राजकारणात अनेक दशकांमध्ये जितके घडत नाही, तेवढे गेल्या दोन-तीन आठवड्यांमध्ये घडले. कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बनवून एक आठवडा होत नाही, तोवर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली विजयी आघाडी कमी करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच जो बायडन यांच्यासाठी अशक्यप्राय असलेला विजय कमला हॅरिस खेचून आणू शकतात, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटू लागला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड थेट जनतेतून होत असली, तरी तांत्रिकदृष्ट्या त्याची प्रक्रिया वेगळी आहे. अमेरिकेतील लोक राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारास मतदान करतात. पण, हे मतदान राज्यव्यापी असते. अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तेथील प्रतिनिधीगृहाच्या जागा अधिक सिनेटच्या दोन जागा इतकी मते असतात. त्यामुळे ५० राज्यांमध्ये मिळून प्रतिनिधीगृहाच्या ४३५ अधिक सिनेटच्या १०० मतांची विभागणी होते. कोलंबियाच्या केंद्रशासित प्रदेशासाठी तीन मते राखून ठेवली असतात. त्यामुळे एकूण मतांची संख्या ५३८ इतकी होते. २७० किंवा त्यांपेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार अध्यक्ष होतो. एखाद्या उमेदवाराला एका राज्यातील सर्वाधिक मते मिळाली, तर त्या राज्यातील सर्व प्रातिनिधिक मते त्या उमेदवाराला मिळतात.

कमला हॅरिस यांचे गृहराज्य असलेल्या कॅलिफोर्नियामध्ये ५४ मते असून, त्याखालोखाल टेक्सासमध्ये ४०, फ्लोरिडामध्ये ३० आणि न्यूयॉर्कमध्ये २८ मते आहेत. यातील काही राज्ये कायम डेमोक्रॅटिक पक्षाला कौल देतात, तर काही रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडून आणतात. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीचा निकाल अनेकदा फ्लोरिडा, नेवाडा, एरिझोना आणि पेन्सिल्व्हिनियासारखी कधी रिपब्लिकन, तर कधी डेमोक्रॅटिक पक्षाकडे कलणारी राज्ये ठरवतात.

२०१६ साली ट्रम्प यांनी अनपेक्षितरित्या अमेरिकेच्या औद्योगिक राज्यांमध्ये आघाडी घेऊन विजय संपादित केला होता. आजवर ही राज्ये श्रमिकांसाठी लढणार्‍या डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करत. २०२० साली मात्र ट्रम्प यांना यातील काही राज्यांत पराभव पत्करावा लागला होता. ट्रम्प यांना २१९ आणि बायडन यांना २२६ मते मिळण्याची खात्री व्यक्त केली जात होती. ९३ मते असलेल्या अशा या आठ राज्यांमध्ये चुरशीची लढत आहे. त्यांतील बहुतेक राज्यांमध्ये ट्रम्प यांना विजय मिळून ते ३०० हून अधिक प्रतिनिधींची मते मिळवतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

बायडन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यापूर्वी ट्रम्प त्यांच्यापेक्षा सहा टक्के मतांनी पुढे होते. बायडन ट्रम्पपेक्षा अवघ्या चार वर्षांनी वयस्कर असले, तरी ते थकले आहेत. कमला हॅरिस ५९ वर्षांच्या असून ट्रम्प यांच्या तुलनेत सुमारे १८ वर्षांनी तरुण आहेत. डेमोक्रॅटिक पक्ष त्यांच्या पार्श्वभूमीचा वापर करून कृष्णवर्णीय, तरुण, महिला आणि अल्पसंख्याकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या जोरावरच कमला हॅरिस यांनी आपली पिछाडी कमी केली असली, तरी ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नाही.

कमला हॅरिस आपण ‘लोकनेत्या’ असल्याची प्रतिमा निर्माण करत असल्या, तरी त्यांची आजवरची राजकीय प्रगती व्यवस्थेचे लाभ घेण्यातूनच झाली आहे. त्या कृष्णवर्णीय असल्या, तरी त्यांचे आईवडील आपापल्या देशातील उच्च वर्गात मोडत होते. कमला हॅरिस यांचे संगोपन मुख्यतः त्यांच्या आईने केले. वयाच्या १२व्या वर्षी त्या आईसोबत कॅनडाला स्थलांतरित झाल्याने आणि आपले शिक्षण त्यांनी मुख्यतः कृष्णवर्णीयांच्या महाविद्यालयातच पूर्ण केल्याने त्यांना स्वतःला वंशभेदाचा सामना करावा लागला का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. कमला हॅरिस यांचे सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर विली ब्राउन यांच्याशी प्रेमसंबंध होते. ब्राउन हॅरिस यांच्यापेक्षा सुमारे ३० वर्षांनी मोठे असून त्यांच्या वशिल्यामुळेच कमला हॅरिस यांना जिल्ह्याचे आणि नंतर राज्याच्या मुख्य सरकारी वकिलाचे पद मिळाले, असे म्हटले जाते. पदावर असताना त्यांनी मादक पदार्थ, देहदंड तसेच बेकायदेशीर स्थलांतराबद्दल घेतलेल्या भूमिका आणि राजकारणात उतरल्यावर घेतलेल्या भूमिका परस्परविरोधी असल्याचे दिसून येते. त्यांचे कृष्णवर्णीयांप्रमाणे हेल काढून बोलणे, तसेच अकारण मोठ्या आवाजात हसणे अनैसर्गिक वाटते.

कॅलिफोर्निया या सगळ्यात मोठ्या राज्यातून सिनेटवर निवडून गेल्यानंतर कमला हॅरिस २०२० सालच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्या असता, अमेरिकेतील पुरोगामी माध्यमांनी त्यांना उचलून धरले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या वादविवादात त्यांनी थेट जो बायडनवर वंशभेदासाठी जबाबदार असल्याचे आरोप करून प्रसिद्धी मिळवली. पण, जनतेने त्यांना न स्वीकारल्यामुळे त्यांना डिसेंबर २०१९ मध्येच माघार घ्यावी लागली.

दि. २५ मे २०२० रोजी अमेरिकेतील मिनियापोलिस येथे कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉएडचा पोलिसांच्या हातून मृत्यू झाला असता, त्याविरुद्ध कृष्णवर्णीय लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. लवकरच त्याचे ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ या आंदोलनात रूपांतर झाले. मिनिसोटा राज्य आणि तेथील मिनियापोलिस शहरात डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असूनही कृष्णवर्णीयांविरुद्ध होणार्‍या अन्यायासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला उपाध्यक्षपदासाठी कृष्णवर्णीय उमेदवार देण्याची गरज वाटू लागली. कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांच्यावर वंशवादात सहभागी असल्याचे आरोप करून त्यांचा रोष ओढवून घेतला होता. पण, डेमोक्रॅटिक पक्षात अन्य कोणी कृष्णवर्णीय नेता समोर नसल्याने कमला यांची निवड करण्यात आली. तिथेही कमला हॅरिस यांचा प्रभाव यथातथाच राहिला असला, तरी जो बायडन यांचा विजय झाल्याने कमला हॅरिस पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या. त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या, तर अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष तसेच पहिल्या भारतीय तसेच आफ्रिकन वंशाच्या राष्ट्राध्यक्ष बनतील.

जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात कमला हॅरिस यांची लोकप्रियताही बायडन यांच्याप्रमाणेच राहिली. ‘कोविड १९’चे संकट हाताळण्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याएवढेच अपयश बायडन यांनाही आले. या काळात त्यांच्या पर्यावरणवादी भूमिकेमुळे तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या आणि सामान्य अमेरिकन लोकांना त्याचे चटके सहन करावे लागले. चीनचे घटलेले उत्पादन आणि युक्रेन युद्धामुळे अमेरिकेमध्ये महागाईत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. २०२२ साली व्याजाचे दर ०.२५ टक्के होते. अवघ्या वर्षभरात ते वाढून ५.५ टक्के इतके झाले. २०२२ साली अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आले. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्यादृष्टीने महत्त्वाची अनेक विधेयके अडवून धरली. त्यात विद्यार्थ्यांच्या कर्जमाफी विधेयकाचाही समावेश होता.

दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला करून सुमारे १ हजार, २०० लोकांना मारले. हमासचा कायमचा नायनाट करण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या कारवाईत आजवर ३९ हजार लोक मारले गेले आहेत. जो बायडन या युद्धात इस्रायलच्या पाठी ठामपणे उभे राहिल्याने अमेरिकेतील मुस्लीम तसेच डाव्या विचारसरणीच्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. तसेच, रिपब्लिकन पक्षाने नेमलेल्या न्यायाधीशांच्या मदतीने अमेरिकेतील सर्वोच्चन्यायालयात गर्भपाताबद्दलचा ऐतिहासिक कायदा उलटवला गेला. त्यातूनच २०२४ सालच्या निवडणुकीत बायडन यांचा पराभव होणार, असे चित्र निर्माण झाले.

कमला हॅरिस यांची पाटी कोरी नसली, तरी गाझा युद्ध, गर्भपात आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेऊन त्या डेमोक्रॅटिक पक्षातल्या डाव्या मतदारांना साद घालत आहेत. त्यासोबतच, आपली कृष्णवर्णीय अशी प्रतिमा वापरून सामाजिक न्यायाचा मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही त्यांच्या विजयाची शक्यता विरळ असली, तरी त्यांच्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षीय लढतीमध्ये चुरस निर्माणझाली आहे.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.