मुंबई (विशेष प्रतिनिधी) - हरिणायामधून पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आलेल्या लांब चोचीच्या गिधाडांना 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या शास्त्रज्ञांनी 'जीपीएस टॅग' लावले आहेत (pench long billed vulture). येत्या आठवड्याभरात त्यांना व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे (pench long billed vulture). एकूण १० गिधाडांना 'जीपीएस टॅग' लावण्यात आले आहे. (pench long billed vulture)
देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी 'बीएनएचएस' गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. याअंतर्गत हरिणायातील पिंजोर येथे 'बीएनएचएस'ने गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे ही जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. ताडोबात १० पांढऱ्या पाठीची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे हलवण्यात आली. त्यांना याठिकाणी उभारण्यात आलेल्या जटायू संवर्धन केंद्रामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून ठेवण्यात आले होते. यामधील लांब चोचीच्या गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी मंगळवार दि. २ जून रोजी त्यांच्या शरीरावर एकूण 'जीपीएस टॅग' बसवण्यात आले.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञांनी मिळून गिधाडांच्या शरीरावर 'जीपीएस टॅग' बसवले. गिधाडांच्या दोन्ही पंखाच्या मधल्या भागात म्हणजेच त्यांच्या पाठीवर हे 'जीपीएस टॅग' बसविण्यात आले आहेत. देखरेखीसाठी या गिधाडांना 'प्रि-रिलीज' कक्षामध्ये ठेवण्यात आले असून येत्या आठवड्याभरात त्यांनी आम्ही नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती 'बीएनएसएस'चे संचालक किशोर रिठे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी (महा एमटीबी) बोलताना दिली. गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या 'जीपीएस टॅग'ची मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'जीपीएस- जीएसएम' यंत्रणा म्हणजे काय? पक्षी स्थलांतर अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पक्ष्यांवर लावले जाणारे उपकरण त्यांच्या वजनाच्या २ टक्के असणे अपेक्षित आहे. ’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ यंत्राचे वजन हे अनुक्रमे ३.५ ग्रॅम आणि १० ग्रॅम असते. त्यामुळे हे उपकरण लावण्यासाठी मोठ्या पक्ष्यांची निवड केली जाते. या दोन्ही उपकरणांमुळे वायरलेस पद्धतीने पक्ष्यांच्या स्थलांतरादरम्यानची माहिती संशोधकांना मिळते. ’जीपीएस’ उपकरणामुळे पक्ष्याचा स्थलांतरादरम्यानचा वेग, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक स्थानाची माहिती मिळते, तर अत्याधुनिक ’जीएसएम’ उपकरणामुळे वर नमूद केलेल्या तीन गोष्टींबरोबरच स्थलांतरादरम्यानचा कोनीय वेग, वार्याचा दबाव, स्थलीय चुंबकत्व, प्रकाशाची तीव्रता आणि तापमानाची माहिती मिळण्यास मदत होते. सौर उर्जेवर हे उपकरण चालते. नेटवर्क न मिळाल्यास त्या ठिकाणांचे संचयन करुन नेटवर्क आल्यानंतर ती माहिती ही यंत्रे संशोधकांपर्यंत पोहोचवतात.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.