२९ जुलै, २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत आजचा दिवस 'जागतिक व्याघ्र दिन' म्हणून घोषित करण्यात आला. आजमितीस जगातील ७० टक्के वाघांची संख्या ही एकट्या भारतामध्ये आहे. भारतातील वाघांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा चौथ्या क्रमांकाचा आहे (maharashtra tiger reserve). महाराष्ट्राची सद्यपरिस्थिती पाहता दर चार वर्षांनी राज्यातील वाघांच्या संख्येत १०० ते १३० वाघांची भर पडत आहे. यामधील खरी समस्या आहे ती संरक्षित क्षेत्राबाहेर वाढणाऱ्या व्याघ्र संख्येची. (maharashtra tiger reserve). त्यासाठीच राज्याने आता व्याघ्र स्थानांतरणासारखा प्रयोग हाती घेतला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. व्याघ्र संवर्धनामध्ये नवीन प्रयोग करू पाहण्याऱ्या महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांच्या सद्यपरिस्थितीची माहिती घेऊया आजच्या 'जागतिक व्याघ्र दिना'निमित्त... (maharashtra tiger reserve)
सुवर्ण महोत्सवी मेळघाट
महाराष्ट्रात पूर्वी वाघ म्हटलं की आठवायचा तो मेळघाट; कारण तो आपल्या राज्यातील पहिला आणि एकमेव व्याघ्रप्रकल्प होता. परंतु काही वर्षीपूर्वी मेळघाट म्हटलं की, आठवायचा तो एकच शब्द, तो म्हणजे कुपोषण. मेळघाटातील आदिवासी कोरकुंमध्ये होणाऱ्या बालमृत्यूमुळे मेळघाट दरवर्षी महाराष्ट्रभर चर्चेत असायचा. अलीकडे मात्र कुपोषणाचा प्रश्न मागे पडून मेळघाट हे वाघांचे खरं जंगल, म्हणून पुन्हा नावरुपास आले आहे. सातपुडा पर्वतरांगेतील गाविलगड डोंगर रांगात वसलेल्या राकट अशा मेळघाटच्या जंगलात महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प अधिकृतरीत्या स्थापन झाला तो २२ फेब्रुवारी १९७४ रोजी. या वर्षी मेळघाटने आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. आज मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा तर देशातील चौथ्या क्रमांकाचा व्याघ्रप्रकल्प म्हणून प्रसिद्ध आहे. मेळघाटात हा आज सुमारे ५५ ते ६० वाघांचे निवासस्थान आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेतील मेळघाटचे जंगल मध्य भारतातील इतर व्याघ्र अधिवास क्षेत्रांना जोडणारा एक महत्वाचा संचार मार्ग आहे. त्यामुळेच महत्त्वपूर्ण जनुकीय संचय (जीन पुल) साठी व अनुवंशिकता वाहक म्हणून मेळघाट चे महत्व अनन्यसाधारण आहे. मेळघाट आज वाघांचे खरे जंगल म्हणून जे नावारूपास आले त्यामागे आजवर येथे केले गेलेले अनेक यशस्वी प्रयोग कारणीभूत आहेत. मेळघाट प्रशासनाने २००३ ते २०२० दरम्यान सुमारे २० गावांचे यशस्वी पुनर्वसन केले असून, धोकाग्रस्त व्याघ्र अधिवासातील आणखी १२ गावे पुनर्वसनासाठी प्रतीक्षेत आहेत. याशिवाय मेळघाटच्या वान अभयारण्यातून जाणारी रेल्वे ब्रॉडगेज मध्ये रुपांतरीत होत असतांना येथील वन्यजीव प्रेमींच्या दबावामुळे आणि शासनाच्या सहकार्याने या रेल्वेचा मार्ग मेळघाटच्या बाहेरून वळविला गेला हा सुद्धा मेळघाटच्या संवर्धनातील एक महत्वाचा टप्पा ठरला. आता या भागातील मानवाचा वावर व पाळीव गुरे चराईचा ताण कमी झाल्यामुळे वन्यजीव बहरण्यास योग्य वातावरण निर्माण झाले आहे. २०१३ ला उघड झालेल्या वाघ शिकार प्रकरणाचा मेळघाटातील अधिकाऱ्यांनी लावलेला छडा आणि नंतर स्थापन झालेल्या ‘मेळघाट क्राईम सेल’च्या माध्यमातून देशभरातून अटक केलेल्या स्थानिक व परप्रांतातील अनेक कुख्यात शिकारी, यामुळे मेळघाटातील शिकारींवर निश्चितच आळा बसलेला दिसून येतो आहे. त्यामुळे वाघांच्या संख्येत निश्चितपणे वाढ होतांना दिसत आहे. वाघांची वाढती संख्या ही येथील जैवविविधता संवर्धनाचा मानक आहे.
- डॉ. जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती जिल्हा
तोडाबाचे भ्रमणमार्ग संकटात !
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांचे भ्रमणमार्ग हे बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, कन्हाळगाव अभयारण्य आणि तेलंगणामधील कावल व्याघ्र प्रकल्पाला जाऊन मिळतात. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून बोर व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा एक भ्रमण मार्ग. या ‘बॉटल नेक कॉरिडॉर’मध्ये ७५० मीटरचा उन्नत रस्ता बांधून उपशमन योजना राबविण्यात वनविभाग आणि वन्यजीव संस्थांना यश आले आहे. ताडोबामध्ये यापूर्वी फक्त गाभा क्षेत्रात पर्यटन होत असे. त्यावेळी पर्यटनासाठी केवळ सहा प्रवेशव्दारे होती. आज बफर क्षेत्रामध्ये पर्यटन वाढवून जवळपास २३ प्रवेशव्दारे पर्यटनासाठी खुली करण्यात आली आहेत. निमढेला येथे प्रवेशव्दार खुले करण्यात आले. या क्षेत्राच्या पश्चिमेस शेती, गाव, राष्ट्रीय महामार्ग आहे. हे प्रवेशव्दार खुले झाल्यानंतर याठिकाणी मानव-वाघ संघर्ष वाढला. वाघांनी अनेक लोकांचे बळी घेतले. परिणामी हे पर्यटन प्रवेशव्दार बंद करण्यात आले. पूर्वेस ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रामध्ये, तर महामार्ग आणि मोठे कालवे हे जंगलांना दोन भागात विभागत आहेत. या लगतच असलेल्या वडसामधून गडचिरोलीच्या जंगलात वाघांना जाण्यासाठी पोषक वातावरण नाही. ताडोबाच्या दक्षिणेस असलेला राष्ट्रीय महामार्ग आणि बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गामुळे वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकल्पांवर कोणत्याही प्रकारची उपशमन योजना राबविण्यात आलेली नाही. परिणामी वाघांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. ताडोबाला जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गांना संरक्षण देऊन त्याठिकाणी असणाऱ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये उपशमण योजना राबवणे हाच यावरील उपाय आहे.
महाराष्ट्रातील ‘पेंच व्याघ्र प्रकल्प’ हा मध्य भारतातील वाघांच्या संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु, मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत येथे वाघांच्या दर्शनाची संख्या कमी असल्यामुळे, या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले जाते. हे क्षेत्र दुर्लक्षित असले, तरी नैसर्गिक जंगलाचे अनुभवन कथन आणि अविश्वसनीय घटनांसाठी ओळखले जाते. यापैकीच एक घटना म्हणजे ‘टी ५३’ सांकेतिक क्रमांक असणाऱ्या ‘राजा’ नामक वाघाची. ‘राजा’ हा २०१४-१५ च्या सुमारास सालेघाट वनपरिक्षेत्रामध्ये जन्मलेला एक उमदा वाघ. जीवनातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आईच्या बेपत्ता होण्याच्या आणि आपल्या भावंडांच्या मृत्यूच्या कठीण परिस्थितीतून तो वाचला. या सर्व संघर्षांनी त्याला पूर्व पेंच क्षेत्रात नेले, जिथे तो इर्षा आणि महत्त्वाकांक्षेसह जगत आहे. तेव्हापासून तो या प्रदेशावर राज्य करत आहे. अलीकडेच, ‘राजा’च्या कपाळावर जखम झाल्याचे निदर्शनास आले. त्याची अवस्था खालावत असल्याचे पाहून, आम्ही त्याला १७ मे, २०२४ रोजी पकडले आणि उपचार करण्याचा निर्णय घेतला. ‘राजा’ एका सोडलेल्या संरक्षण कुटीजवळ दिसून आला. जिथे मी त्याला बेशुद्धीचे औषध दिले आणि त्याचे प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारांसाठी त्याला ‘गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रा’त हलविण्यात आले. त्याठिकाणी ‘राजा’वर करण्यात येणाऱ्या उपाचरांवर मी वैयक्तिकरित्या चार आठवडे निरीक्षण केले. या निरीक्षणादरम्यान मला जाणवले की, ‘राजा’ची जखम बरी होत असून तो स्वतः परत आपल्या राज्यात जाण्यास इच्छूक आहे. फक्त दहा दिवसांमध्ये ८० ते ९० टक्के दिसणारी सुधारणा दर्शवते की, आजच्या वैद्यकीय विज्ञानात इच्छाशक्ती किती महत्त्वाची भूमिका बजावते. चार आठवड्यांच्या उपचारानंतर २५ जून, २०२४ रोजी ‘राजा’ नैसर्गिक अधिवासात परत जाण्यासाठी सज्ज झाला. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परतताना पाहून समाधान वाटलं. ‘राजा’ची कथा वाघांच्या वर्तनाविषयीच्या आणि संवर्धनाविषयीच्या आपल्या समजुतीमध्ये भर घालणारी आहे. पावसाळ्याच्या विसाव्यानंतर राजाला भेटण्यासाठी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या.
- डाॅ. निखील बनगर, वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी, पेंच व्याघ्र प्रकल्प - नागपूर
सह्याद्रीचा राजा
2023 मध्ये डिसेंबरच्या थंडीत वनगस्ती करणार्या वनकर्मचार्यांना चांदोली वनपरिक्षेत्रामध्ये पट्टेरी वाघाचा ठसा दिसला. पाच वर्षांनंतर वाघाच्या वावराचा पुरावा मिळाल्याने वाघाच्या शोधाची विशेष मोहीम सुरू झाली. 104 कॅमेरा ट्रॅप जंगलात लावण्यात आले. अखेर, काही दिवसांनी कॅमेर्यात वाघाचा फोटो कैद झाला आणि त्यानंतर शोधमोहिमेला बळ मिळाले. यापूर्वी 2011 आणि 2018 ला आलेले वाघ याठिकाणी थांबले नाहीत. परंतु, गेल्या काही वर्षांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाढलेले काटेकोर संरक्षण, अधिवासाच्या संवर्धन आणि वाढलेल्या तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येमुळे हा वाघ प्रकल्पात स्थिरावण्याविषयी सर्वजण आशा बाळगून होते. या वाघाचे छायाचित्र त्याची ओळख पटवण्याच्या अनुषंगाने ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ला पाठविण्यात आले. त्यांनी या वाघाचे छायाचित्र पश्चिम घाट, मध्य भारत आणि पूर्व घाटामधील सर्व वाघांच्या छायाचित्रांसोबत जुळवून पाहिले. मात्र, छायाचित्र न जुळल्याने हा वाघ नवीन असून त्याची प्रथमच नोंद झाल्याचा अहवाल त्यांनी दिला. ही बाब व्याघ्र प्रकल्पातील वनकर्मचार्यांसाठी आनंदाची असल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी याचे नामकरण ‘डढठ-ढ1’ असे केले. हा वाघ डिसेंबर, 2023 ते आजवर व्याघ्र प्रकल्पात मुक्काम करून मुक्तसंचार करत आहे. जवळपास चार ते पाच वर्षाचा हा तरुण वाघ आहे. गेल्या आठ महिन्यात त्याने 600 कि.मी.पेक्षा अधिक क्षेत्रात भ्रमंती केली आहे. या वाघाने प्रामुख्याने गव्यांची शिकार केल्याची नोंद वनकर्मचार्यांनी केली असून काहींनी त्याची डरकाळीदेखील ऐकली आहे. यानिमित्ताने ‘डढठ-ढ1’ ने सह्याद्रीमधील वाघांच्या अस्तित्वाला आशेचा किरण दाखवला आहे.
- आकाश पाटील, एकोलोजिस्ट, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
बफर झोनचे नियोजन गरजेचे
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरित करण्यात आलेली ‘NT 1’ वाघिण पावसाळ्यात मध्यप्रदेशात निघून गेली आहे. ‘NT 2’ वाघिण प्रकल्पात असून तिचे नरासोबत मिलन झाले आहे. ‘NT 3’ वाघिण प्रकल्पात मुक्तसंचार करत आहे. प्रकल्प प्रशासन, संचालक जयरामे गौडा आणि उपसंचालक पवन जेफ या वाघांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत.
- सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया
देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प
महाराष्ट्रांतील ६ व्याघ्र प्रकल्पापैकी बोर हा एक असून तो आकाराने देशात सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. २०२२-२३ च्या गणनेनुसार येथे १० ते ११ वाघांची संख्या आहे. या प्रकल्पाला वर्धा आणि नागपूर वन विभागाचे जंगल लागून आहे त्यामुळे प्रकल्पाचे नैसर्गिकरीत्या क्षेत्र वाढते. मात्र, यामुळेच या प्रकल्पात सतत मानवी हस्तक्षेप होत असतो. यातून मानव वन्यजीव संघर्ष, वाघ-मानव संघर्ष आणि जंगलांना आगी लावण्याचे प्रकार प्रकल्पात होत आहेत. अलीकडे बोर अभयारण्याला सर्वात मोठा धोका वणव्या पासून आहे. गेल्या काही वर्षात ८०० ते १००० हेक्टर जंगल वणव्यामुळे प्रभावित झाले आहे. यामागची कारणे शोधली असता तेंदूपत्ता संकलन, मोहफुले गोळा करणे आणि लोकांचा जंगलात हस्तक्षेप या समस्या प्रामुख्याने दिसून येतात. यातून वाघांची जनावरे आणि मानवावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ झालेली दिसते. सर्व समस्या सोडवायच्या असतील तर ग्रामीण लोकांना रोजगार उपलब्ध दिल्यास आणि गावांचा विकास झाल्यास या समस्या कमी होऊ शकतात. या दृस्टीने वनविभागाने आणि शासनाने प्रयत्न करावे