ब्राझीलच्या किनारपट्टीवर अलीकडील काळात झालेल्या अभ्यासात एक धक्कादायक बाब उघडकीस आली. शार्क माशांमध्ये चक्क कोकेन आढळून आले आहे. ‘ओस्वाल्डो क्रूझ फाऊंडेशन’च्या शास्त्रज्ञांनी नुकताच यावर अभ्यास केला आहे. या अभ्यासातून पर्यावरण प्रदूषण आणि त्याचा सागरी जैवविविधतेवरील परिणाम स्पष्ट होतो. ‘सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्न्मेंट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात अधोरेखित करण्यात आले आहे की, बेकायदेशीर अमली पदार्थांची तस्करी ही केवळ मानवी समस्या नसून, महासागरांवर आणि त्यातील सजीवांवरही परिणाम करणारी गंभीर समस्या आहे.
सागरी जीवशास्त्रज्ञांनी 13 ब्राझिलियन शार्पनोज शार्कचे परीक्षण केले, ही प्रजाती रिओ डी जानेरोजवळ आढळून येते. हे शार्क मच्छिमारांच्या जाळ्यात पकडले गेले आणि विच्छेदन केल्यावर त्यांच्या स्नायूंमध्ये आणि यकृतामध्ये कोकेनचे प्रमाण दिसून आले. हे प्रमाण कोळंबी, शिंपले आणि ईल यांसारख्या इतर जलचरांमध्ये पूर्वी नोंदवलेल्या प्रमाणापेक्षा 100 पट जास्त आहे. लिरियाच्या पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीच्या ‘मरीन अॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस सेंटर’मधील सागरी ‘इको-टॉक्सिकोलॉजिस्ट’ यांच्या टीमने या निष्कर्षांवर चिंता व्यक्त केली आहे. सागरी वातावरणात कोकेन म्हण्जे ही प्रदूषणाची एक मोठी समस्या दर्शवते. प्रथम समुद्रात आणि त्यानंतर शार्कमध्ये कोकेन कोणत्या मार्गाने येते, हे अस्पष्टच. यासाठी संशोधकांनी अनेक संभाव्य स्रोतही तपासले. यामध्ये ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग आणि सीवेज लाईनमधून सोडलेले कोकेनमिश्रित पाणी शार्क माशांच्या शरीरापर्यंत पोहोचले असल्याची एक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच आणखीन एक शक्यता म्हणजे, बेकायदेशीर ड्रग्ज लॅबमधून किंवा ड्रग्ज वापरणार्यांच्या मलमूत्रातून कोकेन समुद्राच्या पाण्यात प्रवेश करते झाले. कोकेनचे अवशेष सांडपाणी प्रणालींमधून प्रवास करू शकतात आणि शेवटी समुद्रापर्यंत पोहोचू शकतात आणि हे शार्क जिथे राहतात, ते पाणी दूषित करते. आणखी एक सिद्धांत असा की, कोकेन तस्करांकडून मुद्दाम समुद्रात टाकले जाऊ शकते. ब्राझील हा देश जरी कोकेनचा प्रमुख उत्पादक नसला तरी, एक महत्त्वपूर्ण निर्यातदार आहे. ‘फर्स्ट कॅपिटल कमांड’ (पीसीसी) सारख्या शक्तिशाली टोळ्या युरोपला जाणार्या शिपिंग कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात औषधाची वाहतूक करण्यासाठी ओळखल्या जातात. यातील काही कार्गो ट्रान्सशिपमेंट दरम्यान किंवा तस्कर अधिकार्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हे कोकेन समुद्रात टाकतात.
आता एखाद्या प्राण्याच्या शरीरात कोकेन सापडणे हे सूचित करते की, ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी आणि विक्री केली जाते. साधारणतः कोकेनची ‘हाफ-लाईफ’ कमी असते, याचाच अर्थ ते लवकर नष्ट होते. म्हणून, शार्कमध्ये ते सापडलेले कोकेन हे सूचित करते की, मोठ्या प्रमाणात कोकेन या जलचरांच्या इकोसिस्टीममध्ये प्रवेश करत आहे. या अभ्यासातील सर्व मादी शार्क गर्भवती होत्या. परंतु, संशोधकांना अद्याप त्यांच्या न जन्मलेल्या पिल्लांवर कोकेनचे संभाव्य परिणाम दिसून आलेले नाहीत. मानवांमध्ये, कोकेनमुळे शारीरिक आणि वर्तणुकीतील बदल होऊ शकतात आणि त्याचा प्राण्यांवरही असाच दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोकेनच्या अंशामुळे अन्य सागरी जीवांमध्ये विषारी परिणाम होऊ शकतात. आणखीन एक चिंताजनक बाब म्हणजे, ब्राझीलमध्ये शार्पनोज शार्कचे सेवन केले जाते. म्हणूनच कोकेनचा अंश माशांपासून ते त्याचे सेवन करणार्यांच्या शरीरातही जाण्याची शक्यता दुर्लक्षित करता येणार नाही.
एकूणच या संशोधनांवरून असे सूचित होते की, सागरी वातावरणातील ड्रग्ज प्रदूषण ही जागतिक समस्या असू शकते, ज्यामुळे अनेक परिसंस्था आणि प्रजाती प्रभावित होतात. ब्राझीलमधील बेकायदेशीर अमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या आणि सांडपाणी प्रक्रिया सुधारण्याच्या प्रयत्नांमुळे ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. पाण्यात प्रवेश करणार्या कोकेनचे प्रमाण कमी करून, आम्ही सागरी परिसंस्थांचे संरक्षण करू शकतो आणि समुद्री खाद्यान्नाची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतो. यामुळे या दोन्हीचे संरक्षण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.