उरणच्या घटनेवर उबाठा गटाचे नेते म्हणतात! "राजकारण करायचं नाही!"
29-Jul-2024
Total Views |
मुंबई : आम्हाला राजकारण करायचं नाही, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. उरणमध्ये एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "आम्हाला यात राजकारण करायचं नाही. यावर राजकीय बोलण्याचीही मला आवश्यकता वाटत नाही. पण त्या मुलीच्या मारेकरीला ताबडतोब पकडण्यात यावं. बाकी भाजप किंवा अन्य पक्ष काय करतात याबद्दल मला काहीही देणंघेणं नाही. यात राजकारण आणावं असं मला वाटत नाही. फक्त पीडित मुलीला न्याय मिळायला हवं," असे ते म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
उरणमध्ये राहणारी यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची संपूर्ण शरीरावर चाकूने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. २७ जुलै रोजी तिचा मृतदेह सापडला असून दाऊद शेख नामक व्यक्तीने तिचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. दाऊद शेख हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.