श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या समितीतून हकालपट्टी करा!

हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी

    29-Jul-2024
Total Views |

Shyam Manav

मुंबई (प्रतिनिधी) :
"तत्कालीन काँग्रेस शासनाने जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) हे आजही त्या समितीवर कार्यरत आहेत. संतांवर जातीयवादी टीका करणार्‍या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या समितीतून हकालपट्टी करा!", अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने नुकतीच शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील सुप्रसिद्ध डॉ.प.वि.वर्तक यांच्याविषयी खोटे लिखाण प्रसिद्ध केल्याविषयी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पाध्ये यांच्या न्यायालयाने प्रा. श्याम मानव यांना एक दिवसाची कैद आणि आर्थिक दंड ठोठावला होता. ‘मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५०’च्या कलम ५६ अन्वये फौजदारी गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीला कोणत्याही सार्वजनिक समिती वा न्यासावर सदस्य म्हणून राहता येत नाही. तसे असल्यास ते पद आपोआप रहित होते. त्यामुळे शासनाने कायद्याच्या समितीत मानव यांना घेणे बेकायदेशीर आहे.

हे वाचलंत का? : आकाश बनून नसीमने केली महिलेची फसवणूक, वाचा संपूर्ण प्रकरण!

हिंदु धर्म, संत परंपरा यांविषयी द्वेष बाळगणारे मानव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात ‘ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे धादांत खोटे सांगितले जात आहे’, अशा प्रकारची अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. यापूर्वीही ‘कुलकर्ण्यांचं १२ वर्षांचं पोरं (संत ज्ञानेश्वर महाराज) भिंत काय चालवणार?’, ‘संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून झाला आहे’, अशा प्रकारची वारकर्‍यांसह महाराष्ट्राच्या धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधाने करत असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून हिंदु संतांची बदनामी करणार्‍या श्याम मानव यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे.

अशाच प्रकारचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करून समाजसेवकाचा मुखवटा घातलेल्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (‘अंनिस’ने) त्यांच्या ट्रस्टमध्ये अनेक आर्थिक घोटाळे केले आहेत. त्याच्या रितसर तक्रारी झालेल्या आहेत. ‘अंनिस’ने तर शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचे अंशदान बुडवले आहे. या सर्व प्रकारांची शासकीय स्तरावर सखोल चौकशी चालू आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी अटका देखील झाल्या आहेत. अशा भ्रष्ट, घोटाळेबाज, अर्बन नक्षली संघटनांना आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांना शासकीय समित्यांमध्ये स्थान मिळणे, अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे श्याम मानव यांच्याप्रमाणे या संघटनेतील पदाधिकार्‍यांनाही शासकीय समितीतून तात्काळ बाहेर काढावे व ती समिती बरखास्त करावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.