उबाठा गटाला ठाण्यात मोठं खिंडार! युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत प्रवेश
27-Jul-2024
Total Views |
ठाणे : ठाणे शहरातील उबाठा गटाचे शिवसेना आणि युवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठा गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, ठाणे शहराध्यक्ष किरण जाधव, शिवसेना शाखाप्रमुख अभिषेक शिंदे, विभाग अधिकारी राज वर्मा, शाखाधिकारी मनोज जाधव, युवासैनिक आदर्श यादव, युवासेना शाखा अधिकारी वेदांत सावंत यांचा यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, भावना गवळी, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, ठाणे जिल्हा युवासेना राज्य समन्वयक नितीन लांडगे, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ठाणे शहरातील उबाठाच्या युवासेनेचे महत्वाचे पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख, शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं. त्यानंतर विकासकामांचा धडाका लावला. त्याचं प्रतिबिंब राज्यभरात पाहतो आहोत. शिवाय आम्ही राबवलेल्या कल्याणकारी योजनाही लोकांसमोर आहे."
"महायूती सरकारच्या या सर्व कामांमुळेच राज्यभरातून ५० आमदार, १३ खासदार आणि लाखों शिवसैनिक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुंबई महापालिकेतील ५० नगरसेवक आतापर्यंत शिवसेनेत आलेले आहेत. आज ठाणे शहरातील युवा कार्यकारिनीही आपल्या पक्षात दाखल झाली आहे. यापुढेही हा सिलसिला असाच सुरु राहिल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.