पूजा खेडकर कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात!

    27-Jul-2024   
Total Views |
 
Pooja Khedkar
 
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससीची परिक्षा देणं, खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणं, नोकरीवर रुजू झाल्यानंतर खासगी गाडीवर लाल दिवा लावणं आणि वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं, असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. एवढंच नाही तर या प्रकरणात आता संपूर्ण खेडकर कुटुंबच अडकलंय. मग पूजा खेडकर यांच्या आईचं शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत धमकावणं असो किंवा मुलीला मनासारखी जागा न मिळाल्यानं त्यांच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना धमकावणं असो, त्यांच्या या मनमानी कारभारामुळे अख्ख्या कुटुंबाची कुंडलीच जणू हळूहळू पुढे येतीये. तर सध्या राज्यभर गाजत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? कुणावर कारवाई झाली आणि खेडकर कुटुंबावर कोणते आरोप आहेत? याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
 
पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर प्रशिक्षण काळात छळ केल्याचा आरोप केलाय. मात्र, सुहास दिवसेंच्या समर्थनार्थ सर्व शासकीय कर्मचारी एकवटले आणि पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करताहेत. याप्रकरणी पूजा खेडकर यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूजा खेडकर यांच्यावरचे वाढते आरोप आणि वादग्रस्त बाबी लक्षात घेता राज्य सरकारने त्यांचे वाशिम येथील प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश दिलेत. त्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीमध्ये २३ जुलैपूर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
 
एवढंच नाही, तर पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याची माहितीही पुढे आलीये. नियमानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६ वेळा युपीएससी परिक्षा देण्याची संधी असते. तर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी ९ वेळा ही परिक्षा देऊ शकतात. परंतू, या दोन्ही मर्यादा ओलांडून पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा परिक्षा दिल्याचं सांगण्यात येतंय. त्यांनी नाव बदलून ही परिक्षा दिलीये. पूजा यांनी सुरुवातीला 'पूजा दिलीप खेडकर' या नावाने परिक्षा दिली. त्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून 'पूजा मनोरमा दिलीप खेडकर' या नावाने परिक्षा दिली. त्यामुळे ९ वेळा प्रयत्न संपल्यानंतरही त्यांनी पुन्हा दोनदा कशी परिक्षा दिली? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. एवढं सगळं होऊनही पूजा खेडकर मात्र, नियम आणि अटींचं कारण देत याप्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देताहेत.
 
पूजा खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून यूपीएससची परिक्षा उत्तीर्ण केली आणि दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरीही मिळवली. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते. त्यांनी यावर्षी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचं उत्पन्न आणि मालमत्ता ४० कोटी रुपये असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांच्याकडे ११० एकर जमीन आणि ७ फ्लॅट्स असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे एका निवृत्त अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. याच बेहिशेबी मालमत्तेचा आता एसीबीकडून तपास सुरु करण्यात आलाय. मात्र, दिलीप खेडकर हे अद्याप फरार असून त्यांचा तपास लागलेला नाहीये.
 
दुसरीकडे, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना आज पहाटे अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. रायगड जिल्ह्यातील एका गावातून त्यांना अटक करण्यात आलीये. मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्याला धमकावल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मनोरमा खेडकर यांच्यावर मुळशीतील जमीन हडप केल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. पण गेल्या काही दिवसांपासून त्या फरार होत्या. आता रायगड जिल्ह्यातील एका गावातून त्यांना अटक करण्यात आलीये. हिरकणी वाडीतील पार्वती निवास या हॉटेलमध्ये त्या लपून बसल्या होत्या. एवढंच नाही तर या हॉटेलमध्ये त्यांनी खोट्या नावाने रुम बुक केल्याचीही माहिती पुढे आलीये. इंदू ज्ञामदेव ढाकणे असं नाव सांगून त्या हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या. त्यांना आता कोर्टात हजर करण्यात आलं असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आलीये. त्यामुळे आता या दोन दिवसांच्या चौकशीत आणखी कोणत्या नव्या बाबी पुढे येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
 
चुकीचा दाखला देऊन नोकरी मिळवणं आणि नोकरीवर रुजू झाल्यावर अवाजवी मागण्या करणं पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलंच महागात पडलंय. मात्र, अशा प्रकारे खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणं हा त्या पदासाठी किंवा नोकरीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या या खोटेपणाची त्यांना काय शिक्षा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....