अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग!

    27-Jul-2024   
Total Views |
 
Fadanvis & Shah
 
"जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण मिळतं आणि जेव्हा शरद पवारांचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे म्होरके आहेत. या देशात भ्रष्टाचार स्थापन करण्याचं काम शरद पवारांनी केलंय. देशाच्या सुरक्षेला एक औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करु शकत नाही. महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे तर उद्धव ठाकरे हे त्याचे नेते आहेत. स्वत:ला बाळासाहेबांचा वारस म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत," हे वक्तव्य आहे केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं. ४० मिनिटांच्या आपल्या भाषणात विरोधकांचा पर्दाफाश करत अमित शाहांनी विधानसभा निवडणूकांचे रणशिंग फुंकलेत. तर याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलंय. मराठा आरक्षण, विशाळगड, फेक नरेटिव्ह अशा अनेक विषयांवर विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांनी आगामी निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केलीये. आता फडणवीसांनी कार्यकर्त्यांना नेमकं कोणतं आवाहन केलंय आणि शहा आणि फडणवीसांनी विरोधकांची कशी पोलखोल केलीये, याबद्दल जाणून घेऊया.
 
रविवार, २१ जुलै रोजी अमित शाहांच्या उपस्थितीत पुण्यातील बालेवाडीमध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमले होते. याचवेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहूल गांधी या विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत अमित शाहांनी विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकलेत. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना आपली कामं आणि आपले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहनही केलं. विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा खुलासा करत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.
 
एवढंच नाही तर सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या विशाळगडाच्या मुद्यावरही त्यांनी विरोधकांना चांगलंच घेरलं. "भाजपचं हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजेच सहिष्णुता. पण हल्ली हिंदूंना दहशतवादी म्हटलं जातंय. विशाळगडावरील घटनेत शिवप्रेमींना दहशतवादी म्हटलं गेलं. तर राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटलं. त्यामुळे आताही आपण जागे झालो नाहीत, तर उद्या जागं होण्याची संधी मिळणार नाही. 'फेक नॅरेटीव्ह' हाच आजचा रावण आहे आणि त्याचा अंत करून महायुती पुन्हा सत्तेत येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार', असा खोटा नरेटीव्ह पसरवून विरोधकांनी मते मिळवली. पण विरोधकांचा हा विजय एखाद्या फुग्यासारखा आहे. एखाद्या कार्यकर्त्याने टाचणी लावली तरी हा फुगा फुटेल. विधानपरिषदेच्या निवडणुकीपासूनच हा फुगा फुटायला सुरुवात झालीये. खोट्याला खर्‍याने उत्तर देण्यासाठी, विचार करावा लागत नाही. त्यामुळे फेक नॅरेटीव्हला उत्तर देण्यासाठी, आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा, फक्त हीट विकेट होऊ नका वा सेल्फ गोल करू नका," असा आदेशच फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलाय.
 
शिवाय यावेळी फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही भाष्य केलं. मराठा आरक्षणावर आम्ही ठाम आहोत. मनोज जरांगेंबाबत माझं काहीही म्हणणं नाही. मराठा आरक्षणाची लढाई १९८२ साली सुरु झाली. तेव्हापासून २०१४ पर्यंत अनेक सरकारे आलीत. त्यात शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री झालेत. पण त्यांनी तेव्हा आरक्षण का दिलं नाही? असा सणसणीत सवाल फडणवीसांनी केलाय. आणि उद्धव ठाकरेंमुळेच मराठा आरक्षण टिकू शकलं नाही, असंही सांगितलं.
 
दरम्यान, वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन सरकार तयार केल्याने नाराज असलेल्या कार्यकर्त्यांचीही फडणवीसांनी समजूत काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या देशाच्या परिवर्तनाच्या लढाईत महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहावा, म्हणून मागील काळात आम्ही सत्तेत परिवर्तन घडवले, त्यामुळे कुठे तह आणि कुठे सलगी करावी लागली. ध्येय स्पष्ट असताना कधी दोन पावलं पुढे तर कधी दोन पावलं मागे टाकावीच लागतात. त्यामुळे आपल्या मनातील किंतू परंतू काढून टाका, असा सल्ला फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला. तसंच काहीही काम न करता निव्वळ सल्ला देणाऱ्या विरोधकांचे फडणवीसांनी कान टोचले. सल्ला देण्यासाठी अनेकजण मला मेसेज करतात. काम करणाऱ्यांनी सल्ला देण्यास हरकत नाही पण काम न करणारेही सल्ले देतात आणि काम करणाऱ्यांच्या मनात विष कालवतात, असा टोला त्यांनी लगावलाय.
 
महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वावर असलेली नाराजी आणि पक्षाला पडलेलं खिंडार यामुळे राज्यात काँग्रेसची परिस्थिती सध्या बिकट झालीये. याऊलट भाजप सुरुवातीपासूनच एकजूट दिसतीये. दुसरीकडे, महाविकास आघाडीत नेत्यांची कायम एकमेकांच्या विरोधातील वक्तव्य बघता लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाटपावरून त्यांच्यात फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, महायूती सरकार यावेळीही एकत्र निवडणुक लढवणारे. त्यामुळे आता भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या या कानमंत्राचा त्यांना निवडणूकीत निश्चितच फायदा होईल, असं म्हणण्यास हरकत नाही.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....