उद्धव ठाकरेंनी मला मातोश्रीवर बोलावून दर महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला, आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार करून तिचा खून केला, अनिल परबांचे गैरव्यवहार आणि अजित पवारांनी गुटखा व्यापाऱ्यांकडून दर महिन्याला इतके कोटी रुपये जमा करा असं सांगितलं, या चार प्रतिज्ञापत्रांवर सही करा. त्यानंतर ईडीच्या आरोपांतून तुमची सुटका होईल, अशी ऑफर देवेंद्र फडणवीसांकडून अनिल देशमुखांना देण्यात आली होती. पण अनिल देशमुखांनी ती ऑफर स्विकारली नाही आणि ते १३ महिने तुरुंगात राहिलेत, असा खळबळजनक दावा अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलाय. शिवाय अनिल देशमुखांनी भाजपची ऑफर नाकारल्याने मी त्यांचं जाहीररित्या कौतुक करतो, असंही त्यांनी म्हटलंय. एकीकडे हे प्रकरण गाजत असतानात अनिल देशमुखांनी एका एसीपीला धमकावल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आलाय. मात्र, अनिल देशमुखांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? देशमुख आणि श्याम मानव यांना इतक्या वर्षांनी याप्रकरणी बोलण्याची जाग का आली? आणि अनिल देशमुखांवर सीबीआयने नेमके कोणते आरोप केलेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असून ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. दरम्यान, आता हे प्रकरण अचानक चर्चेत आलंय. श्याम मानव यांनी याबाबत एक खळबळजनक दावा केलाय. ईडीने केलेल्या आरोपांतून सुटका मिळवण्यासाठी अनिल देशमुखांवर चार प्रतिज्ञापत्रांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यावेळी देशमुखांनी त्यावर सह्या केल्या असत्या तर ते सुटले असते. परंतू, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तुरुंगात गेले असते. त्यामुळे त्यांनी सह्या न करता ते १३ महिने तुरुंगात राहिले, असा दावा श्याम मानव यांनी केलाय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मार्च २०२१ रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीसांना मुंबईतील हॉटेल्स आणि बारमालकांमार्फत दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. या तपासात देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी सत्तेचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवत चार्जशीट दाखल केले होते. याच प्रकरणात देशमुखांविरोधात मनी लाँण्ड्रींगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये अनिल देशमुखांना अटक करण्यात आली. जवळपास १३ महिने तुरुंगात राहिल्यानंतर ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. वास्तविक गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांची कारकिर्द कायमच वादग्रस्त राहिलीये. त्यांच्या कार्यकाळात मनसुख हिरेन प्रकरण, अंबांनींच्या घराखाली स्फोटकं ठेवणं, महिन्याला शंभर कोटी जमा करणं, असे अनेक आरोप झालेत.
आता श्याम मानव यांनी केलेल्या दाव्याला अनिल देशमुखांनीही दुजोरा दिलाय. "श्याम मानव यांनी सांगितलेलं सत्य आहे. तीन वर्षांपूर्वी आमचं सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी एका व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क साधला. अनेकदा ते त्या व्यक्तीच्या फोनवरून माझ्याशी बोलले. त्यानंतर त्यांनी एक प्रतिज्ञापत्र पाठवलं. त्यामध्ये मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवारांवर आरोप करावे, असं सांगण्यात आलं. मी त्याला नकार दिला. कारण तसं केल्यास ते सगळे अडचणीत आले असते. त्यामुळे ईडी, सीबीआयला पुढे करुन त्यांनी माझ्यावर कारवाई केली," असं देशमुखांनी म्हटलंय.
यावर भाजपच्या नेत्यांनी अनिल देशमुखांना चांगलंच सुनावलंय. भाजप आमदार नितेश राणेंनी देशमुखांवर गंभीर आरोप केलाय. अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या मुलाला लपवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय दिशा सालियान प्रकरणातील सत्य तुम्हाला विचारण्यात आलं होतं. पण तुम्ही ते सांगितलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे, चित्रा वाघ यांनी तर या संपूर्ण प्रकाराचं शरद पवारांची इकोसिस्टिम असं वर्णन केलंय. आधी जरांगे आणि आता श्याम मानव. भाजपचा पराभव करा, हा त्यांचा एकच अजेंडा आहे. मोठ्या साहेबांची इकोसिस्टीम पुर्णपणे अॅक्टिवेट झालीये, असं त्या म्हणाल्या. तर अतुल भातखळकर यांनी निवडणूक आल्याने श्याम मानव यांना जाग आली असल्याचं म्हटलंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलंय.
या संपूर्ण घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर देशमुखांना थेट इशाराच दिलाय. "माझ्यावर सातत्याने आरोप करत असतानाही मी आजपर्यंत बोललो नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर त्याला सोडत नाही, हा माझा स्पष्ट सिद्धांत आहे. अनिल देशमुखांच्या पक्षातील लोकांनीच त्यांचे काही ऑडीओ व्हिज्युअल्स मला आणून दिलेले आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या लोकांसमोर आणाव्या लागतील. मी असं राजकारण करत नाही. पण रोज जर कुणी खोटं बोलून असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही," असा थेट इशाराच त्यांनी दिलाय.
शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमा आणि प्रभावशाली गृहमंत्री राज्याला लाभला असताना त्यांच्यावर राजकीय लालसेपोटी केलेले हे आरोप आहेत हे स्पष्ट दिसू लागलंय. त्यामुळे जामीनावर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जनता विश्वास कशी ठेवेल? याबद्दल श्याम मानव आणि देशमुखांनी विचार करायला हवा होता. विशेष म्हणजे देशमुख आणि श्याम मानव यांना इतक्या वर्षांनी याप्रकरणी बोलण्यासाठी जाग का आली? दिशा सालीयन प्रकरण चर्चेत आणून ते आदित्य ठाकरेंना अडचणीत आणू पाहाताहेत का? आणि उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा हा डाव आहे का?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित राहतात. मुख्य म्हणजे अनिल देशमुखांच्या या प्रकरणावर मविआच्या कुठल्याही नेत्याने थेट बोलणं टाळत मौन धरणंच योग्य समजलंय.
दुसरीकडे, हे प्रकरण ताजं असतानाच पुणे न्यायालयासमोर सीबीआयने एक कबुलीनामा दिलाय. जळगाव पोलिसांकडे आलेली गिरीश महाजन यांच्याविरोधातील खोटी तक्रार दाखल करु घ्या, असा दबाव अनिल देशमुखांनी तत्कालिन एसीपी प्रविण मुंडे यांच्यावर आणला होता, अशी कबुली प्रविण मुंडेंनी सीबीआयकडे दिलीये. त्यामुळे आता अनिल देशमुख पुन्हा अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झालीये.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....