रोमांचकारी ‘गल्फ रेल्वे’

Total Views |
Gulf Railways
 
मध्य-पूर्वेतील देशांकडून अर्थव्यवस्थेतील वृद्धीसाठी रेल्वे प्रकल्प विस्तारण्यावर भर दिला जात आहे. मध्य पूर्वेतील ‘गल्फ रेल्वे प्रकल्प’ हा त्यापैकीच एक प्रकल्प. हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा बांधकाम प्रकल्प. ही ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ (GCC)च्या सदस्यांना जोडणारी प्रस्तावित रेल्वे मार्गिक असून बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांना रेल्वेमार्गाने जोडेल. विशेषत: कुवेत आणि सौदी अरेबियामधील नियोजित रेल्वे जोड प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
 
सुमारे दोन हजार किमीपेक्षा अधिक विस्तार असणारा हा प्रकल्प शाश्वत वाहतूक उपायांद्वारे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे, आर्थिक विकासाला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे या उद्दिष्टांसह रेल्वे वाहतूक सुविधांना नवे आयाम देणारा असेल. जगभरातील नामांकित प्रमुख कंपन्यांसह कार्यक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी या प्रकल्पात हाय-स्पीड रेल्वे, प्रगत सिग्नलिंग सिस्टीम आणि अक्षयऊर्जा एकत्रीकरण यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मार्ग निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. हा मार्ग कुवेतच्या अल-शद्दादिया भागातून सुरू होईल आणि रियाध, सौदी अरेबियातून जाईल. या महत्त्वाच्या टप्प्यासाठीची प्रक्रिया आणि मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. पुढे, प्रकल्प आराखडा मंजूर केला जाईल, ज्याला अंदाजे एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर अंमलबजावणी आणि बांधकामाचा टप्पा तीन वर्षांचा असेल. कुवेत आणि सौदी अरेबियादरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी सुलभ करून सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे वाहतूक व्यवस्था स्थापन करणे हे या रेल्वे प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट. आखाती देशांमधील व्यापारविनिमय वाढवणे, आर्थिक वाढीला चालना देणे, प्रवासी आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करणे यासाठीही प्रकल्प महत्त्वाचा आहे.
 
२५० अब्ज डॉलर खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कुवेत आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांची वचनबद्धता अधोरेखित करतो. कुवेत सिटी (कुवेत) मध्ये सुरू होईल आणि मस्कत (ओमान) मध्ये संपण्यापूर्वी दमाम आणि अल-बाथा बंदर (सौदी अरेबिया), अबू धाबी आणि अल ऐन (युएई) आणि सोहरमधून जाईल. आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी सल्लागार सेवांच्या निधीचे दोन्ही देशांमध्ये समानरीतीने वाटप केले जाईल. सौदी रेल्वे कंपनीने प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा प्राथमिक अहवाल तयार करण्यासाठी फ्रान्स-आधारित वाहतूक आणि गतिशीलता विशेषज्ञ ‘सिस्ट्रा’च्या तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. व्यवहार्यता अभ्यासासाठी अंदाजे १०.५ दशलक्ष खर्च येण्याचा अंदाज आहे. प्रत्येक राज्य त्याच्या हद्दीत असलेल्या प्रकल्पाच्या भागाची अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे. ही राज्ये स्वतःचे रेल्वेमार्ग आणि स्थानके आणि मालवाहतूक टर्मिनल बांधतील.


हा प्रकल्प पहिल्यांदा २००९ मध्ये ‘जीसीसी’द्वारे प्रस्तावित आणि मंजूर करण्यात आला, त्यावेळी कोणत्याही रेल्वे पायाभूत सुविधा असलेला सौदी अरेबिया हा एकमेव सदस्य होता. या प्रकल्पाची मूळ अंतिम मुदत २०१८ होती, जी नंतर २०१६ ते २०२१ करण्यात आली. आता हा प्रकल्प २०२८ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा महत्त्वाचा विकास सौदी अरेबियाच्या वाहतूक पायाभूत सुविधा वाढविण्याच्या आणि देशांतर्गत आणि शेजारील देशांशी उत्तम कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देणारा आहे. कुवेत आणि रियाधमधील अंतर अंदाजे ६५० किमी. यासंबंधीचा प्रकल्प अभ्यास दर्शवितो की, रेल्वे लिंक प्रकल्प प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी करेल. प्रवाशांसाठी कार्यक्षमता आणि सुविधादेखील वाढवेल. रियाध ते कुवेत सिटी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये प्रादेशिक प्रवासात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. कुवेत आणि रियाध सध्या हवाई आणि रस्तेमार्गाने चांगले जोडलेले असले, तरी प्रस्तावित रेल्वेमार्ग पर्यटनाला चालना देण्यासह दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध मजबूत करेल. यासह प्रभावशाली आखाती देशांमधील मजबूत आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करण्यास मदत करेल.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.