मनोज जरांगे कुणाच्या बाजूने? महाराष्ट्रात भाजपला संपवण्याचं षडयंत्र!
आशिष शेलारांचा सवाल
25-Jul-2024
Total Views |
मुंबई : मनोज जरांगे तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? आरक्षणाच्या विरोधी राहणाऱ्यांच्या बाजूने आहात का? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी केला आहे. त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंना खडेबोल सुनावले. तसेच मविआच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही केले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, ": मनोज जरांगे तुम्ही कुणाच्या बाजूने आहेत? मराठा समाजाने या भूमिका तपासून घ्या. मराठा समाज अडचणीत आहे, गरीब आहे म्हणून देवेंद्रजींनी आरक्षण दिलं. मग जरांगे पाटील त्यांच्यावरच का टीका करत आहेत? आताच्या सरकारनेही १० टक्के आरक्षण दिलंय. तरीही मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवरच टीका का करतात? त्यांना घालून पाडून का बोलतात? ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्या काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा सेनेवर चकार शब्द काढायला ते तयार नाहीत. तुम्ही समाजाची बाजू मांडत आहात याचं स्वागत आहे. पण त्यात समानता ठेवा. समाजासाठीच बोला, आम्ही तुमच्यासोबत आहोत."
"लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जरांगे लढवत असतील तर स्वागतार्ह आहे. पण मनोज जरांगे तुम्ही म्हणजे संपूर्ण मराठा समाज नव्हे. या गैरसमजातून बाहेर पडा. काँग्रेस, शरद पवार गट, उबाठा सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यामध्ये आणि काही संस्था, संघटना, आंदोलक आणि जरांगे पाटील यांच्या बोलण्यात आता एकरुपता दिसत आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात एक षडयंत्र सुरु आहे. भाजपला संपवा हे कटकारस्थान रचलं जातंय. भाजपला संपवा याचा अर्थ महाराष्ट्रात हिंदू हिताची भूमिका मांडणारा पक्ष राहूच नये, असा होतो. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या रस्त्यावरून भरकटले आहेत. त्यामुळे जरांगेंनी आत्मपरिक्षण करावं," असा सल्ला त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, "जरांगेंनी आपल्या मागण्या मांडाव्या, यावर आम्हाला काहीच आक्षेप नाही. पण त्यांच्या भाषेत ओबीसीतूनच आरक्षण काढून द्या, अशी त्यांची मागणी आहे. शरद पवार, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, उद्धव ठाकरे या मागणीवर तुमची भूमिका काय आहे? हे सर्व पक्ष स्वत:ची भूमिका मांडण्यापासून पळ काढत आहेत. याचा अर्थ ते मराठ्यांच्या मागणीच्या विरोधात आहेत आणि ओबीसी समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहेत," अशी टीकाही आशिष शेलारांनी केली आहे.