पाकिस्तानात हास्यकल्लोळ

    24-Jul-2024
Total Views | 189
pakistan-launches-counterterrorism-operation


‘दहशतवाद्यांचे नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध पाकिस्तानात शांतता काही नांदत नाही. पाकिस्तानातील प्रत्येक शीर्षस्थ नेतृत्व एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून, कोणालाही देशाच्या भवितव्याची चिंता वगैरे खिसगणतीतच नाही. या सगळ्यावर आता चर्चा करण्याचे कारण म्हणजे, या सगळ्या अशांत वातावरणातही विनोदनिर्मिती करत, वातावरण सुसह्य राहील, याची खबरदारी पाकिस्तानातील लष्कराने घेतली. पाकिस्तान लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ‘अझ्म-ए-इस्तेहकाम’ ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेविरोधात अनेक उलटसुलट चर्चांना पाकिस्तानमध्ये सध्या पेव फुटले आहे. या गोष्टी पसरवण्यात पाकिस्तानातील ‘राजकीय माफिया’च कारणीभूत असल्याची टीकादेखील यावेळी लष्कराच्यावतीने करण्यात आली.

‘अझ्म-ए-इस्तेहकाम’ ही मोहीम काही पाकिस्तानी लष्कराचा दहशतवादविरोधी लढा नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता प्रदान करणारी ही मोहीम, सरकारच्या आशीर्वादाने लष्कराला सुरु करणे भाग पडले. चीनच्या दबावासमोर नांगी टाकून पाकिस्तानने हे पाऊल उचलले. मध्यंतरी पाकिस्तानात सुरू असलेल्या चिनी प्रकल्पांवर अनेकदा हल्ले झाले. अनेकदा चीनच्या अभियंत्यांवरही पाकिस्तानात हल्ले झाले आहेत. त्यामुळे चीनचे अभियंते सध्या पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी फारसे उत्सुक दिसत नाहीत. अर्थात, जीवाची भीती कोणाला नसते? मात्र, या सगळ्या प्रकारामुळे चीन पाकिस्तानवर नाराज असून, चिनी तंत्रज्ञ आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पाकिस्तानवर दबाव वाढवला आहे.

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला जायच्या मार्गावर वेगाने अग्रेसर असून, पाकिस्तानात दहशतवाद्यांना पोसले गेल्याने जगात पाकिस्तानला कोणीही अर्थसाहाय्य करण्यास धजावत नाही. त्यामुळे पाकिस्तानची भिस्त एकट्या चीनवर आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांना सुरक्षा देण्याचे कार्य करण्यातदेखील पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याने, चीन पाकिस्तानवर चांगलाच संतापला आणि त्याची मर्जी राखण्यासाठी पाकिस्तानने ‘अझ्म-ए-इस्तेहकाम’ही दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली.

खरी मेख इथेच आहे. जगात सर्वाधिक दहशतवादी संघटना या पाकिस्तानात कार्यरत आहेत. मात्र, पाकिस्तानने यावेळी चीनच्या अभियंत्यांवरील हल्ल्यांचा दोष पाकिस्तानमधील पाळीव दहशतवाद्यांवर न लावता, तालिबानवर ढकलण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानने उघडलेली ‘अझ्म-ए-इस्तेहकाम’ ही मोहीम दहशतवादाविरोधी नसून, तालिबानविरोधी आहे. या मोहिमेच्या जोरावर पाकिस्तानमधील दहशतवाद संपणार नाहीच. किंबहुना, जे पाकिस्तानी दहशतवादी आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तान काहीही करणार नाही. अर्थात, असे काही करणे आपल्याच अंगलट येऊ शकते, याची पाकिस्तानी लष्कराला पुरती जाणीव आहेच.

कारण, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेचे सुरक्षाकवच लाभले आहे. मध्यंतरी तर पाकिस्तानी सैनिकच दहशतवादी म्हणून भरती केले असल्याची बातमी चर्चेत आली होती. त्यामुळे या संस्थांवर कारवाई होणार नाही, हे निश्चित. मात्र, कित्येक दिवस तालिबानने पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या मर्यादा उघड झाल्याने, आजवर त्यांनी उभा केलेला, सैन्यताकदीचा बुरखा फाटायला सुरुवात झाली आहे. अशातच चीनने आणलेला दबाव ही आयतीच संधी पाकिस्तानला गवसली.

मात्र, यावेळी पाकिस्तानी जनतेला सैन्याच्या याआधीच्या ‘दझर्ब-ए-अझब’ आणि ‘रद-उल-फसाद’ या दहशतवादविरोधी मोहिमाही अपयशी झाल्याने ‘अझ्म-ए-इस्तेहकाम’विषयी विश्वास वाटत नाही. त्यामुळेच लष्कराविषयी अफवा या राजकीय माफियांकडून पसरविल्या जात असल्याची टीका लष्काराने केली आहे. मुळातच पाकिस्तानी लष्कराची ताकद जगाला माहीत आहे. पाकिस्तानमध्ये सरकार कोणाचे असावे? त्याने कसे वागावे? काय निर्णय घ्यावा? यावर लष्कराचीच कमांड असते, हे जगजाहीर. त्यामुळे याहीवेळी पाकिस्तानी नागरिकांच्या पदरी निराशा येणार आहेच. पण, सातत्याने चिंताग्रस्त पाकिस्तानी नागरिकांना लष्कराची ही असली विधाने ऐकून हास्यकल्लोळाची एक नामी संधी मिळाली, हेही नसे थोडके!

कौस्तुभ वीरकर 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121