"मांस हलाल आहे की झटका, हे दुकानाबाहेर लिहा"; प्रशासनाचे आदेश

    24-Jul-2024
Total Views |
 jaipur
 
लखनौ : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील खाद्यपदार्थांच्या दुकानांबाहेर हॉटेल मालकाचे नाव लिहिण्याचे प्रकरण अद्याप निकाली लागले नसून जयपूर महापालिकेनेही याबाबत आदेश जारी केल्याचे समोर आले आहे. प्रत्येक मांसाच्या दुकानाबाहेर हलाल मांस दुकानात मिळते की झटका हे स्पष्टपणे लिहावे, असे महापालिकेने आदेशात म्हटले आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महापालिकेने आपल्या आदेशात उघड्यावर मांस विकण्यासही बंदी घातली आहे. याशिवाय शहरातील मांस दुकानांसाठी परवाना घ्यावा लागणार असून व्यावसायिक जमिनीवरच मांसाची दुकाने सुरू करता येतील, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
 
महापौर सौम्या गुर्जर यांनीही यासंदर्भात निवेदन दिले. त्या म्हणाल्या की, जयपूरमध्ये १५० वॉर्ड आहेत, मी अनेकवेळा लोकांमध्ये गेली आहे, त्यावेळी लोकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. दुकानांमध्ये अस्वच्छता कशी आहे, हे सांगण्यात आले. आता कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे की लोक राहतात त्या ठिकाणी मांसाची विक्री करता येणार नाही.
  
ज्यांच्याकडे दुकानासाठी व्यावसायिक भाडेपट्टी आहे, त्यांनाच महापालिका मांस दुकानांसाठी परवाने देणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कावड यात्रेच्या मार्गांचे पावित्र्य लक्षात घेऊन यात्रेच्या मार्गावर आणि शिवमंदिराजवळ उघड्यावर मांसविक्रीला बंदी घालण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.
 
काहीदिवसांपूर्वी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर सरकारने आदेश जारी केले होते की दुकानदारांना त्यांची नावे सार्वजनिकपणे प्रदर्शित करावी लागतील. यानंतर दुकानदारांनी हे कृत्य केल्याचे अनेक चित्र समोर आले. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढून या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.